योगेश काशीद - बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील नादलगाव गावातील काही गावगुंडांनी आदिवासी समाजातील ग्रामरोजगार सेवक जालिंदर सुरवसे (35) यांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना त्यांच्या थेट घरातून बाहेर ओढत आणलं आणि दुचाकीला बांधून चौकात फरफटत नेलं. इतकंच नव्हे तर, त्यांना लोखंडी रॉड तसेच लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात सुरवसे यांचे दोन्ही पाय मोडले असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या गंभीर घटनेनंतर तलवाडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबियांनी केला आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
6 डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अश्रुबा उत्तम राऊत, गोविंद सखाराम राऊत, भगवान अश्रुबा राऊत, विष्णू अश्रुबा राऊत यांच्यासह गावातील 10 ते 12 गावगुंडांनी जालिंदर सुरवसे यांना त्यांच्या घरात घुसून 'तू लय माजलास', 'तुला सोडणार नाही', 'जिवे मारून टाकू' अशा धमक्या दिल्या. त्यानंतर, जातीवाचक शिवीगाळ करत या गुंडांनी सुरवसे यांना बाहेर ओढत आणलं आणि दुचाकीला बांधून गावातील चौकात फरफरट नेलं. चौकात लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करत त्यांचे दोन्ही पाय तोडून टाकले. आरोपी एवढ्यावरच न थांबता, त्यांनी सुरवसे यांच्या खिशातील 50 हजार रुपये रोख आणि मोबाईल देखील हिसकावून घेतला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: 402 घरांसाठी म्हाडाची बंपर लॉटर! तुमच्या स्वप्नातलं घर मिळवा अगदी स्वस्तात...
गुन्हा नोंद करण्यास पोलिसांची टाळाटाळ
या बेदम मारहाणीनंतर पीडित सुरवसे यांची बहीण उषा साळुंके आणि आई यांनी तातडीने तलवाडा पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि तिथे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी राजकीय दबावापोटी या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यास स्पष्टपणे टाळाटाळ केली. इतकेच नव्हे तर, पोलिसांनी त्यांना दमदाटी करून पोलीस स्टेशनच्या बाहेर काढल्याचा धक्कादायक आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे.
हे ही वाचा: मोठी बातमी : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडलं, इन्स्टाग्राम स्टोरीतून सगळं सांगितलं
ग्रामरोजगार सेवक जालिंदर सुरवसे हे आदिवासी समाजाचे असून त्यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराबद्दल आणि पोलीस प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि संबंधित गावगुंडांवर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित कलमांखाली तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून पीडित आदिवासी कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ADVERTISEMENT











