Crime News : खोया मंडी परिसरात 25 फेब्रुवारीच्या रात्री 65 वर्षीय किरण पुरवार यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. दरम्यान, उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात या खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही हत्या त्यांच्याच जुन्या मोलकरणीने आपल्या मुलाच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
ADVERTISEMENT
नेमकं हत्याप्रकरण काय आहे?
मयत किरण पुरवार या अर्धांगवायूच्या (पॅरालिसिस) रुग्ण होत्या. त्या पूर्णपणे आशा रैकवार या मोलकरणीच्या सेवेवर अवलंबून होत्या. 25 फेब्रुवारीच्या रात्री किरण यांचे पती संतोष पुरवार हे त्यांच्या किराणा दुकानावर गेले होते. हीच संधी साधून मोलकरणीने (आशा) आणि तिचा 27 वर्षीय मुलगा सोनू यांनी घरात प्रवेश केला आणि उशीने तोंड दाबून किरण यांची निर्घृण हत्या केली.
हत्येमागचे कारण: वारंवार होणारा अपमान
पोलीस अधिकारी अरुण कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण पुरवार या आजारपणामुळे त्रस्त होत्या आणि कामात चूक झाल्यास त्या आशाला वारंवार हटकत असत. काही वेळा त्यांच्याकडून अपशब्दांचा किंवा शिवीगाळीचाही वापर होत असे. सतत होणाऱ्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी आशाने आपल्या मुलासह किरण यांना वाटेतून हटवण्याचा कट रचला.
असा झाला उलगडा
सुरुवातीला ही घटना लुटीच्या उद्देशाने झाल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी मयत महिलेच्या कानातील सोन्याचे टॉप्स काढून घेतले होते. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना तिथे काचेच्या बांगडीचा एक तुकडा सापडला. संशयावरून जेव्हा नोकराणीची चौकशी करण्यात आली, तेव्हा तिच्या हातातील बांगड्यांचा रंग आणि घटनास्थळी सापडलेला तुकडा तंतोतंत जुळला. या एका पुराव्यामुळे बनाव उघड झाला.
पोलीस कारवाई
एसपी प्रबल प्रताप सिंह यांनी या प्रकरणासाठी सर्व्हिलन्स, एसओजी आणि फॉरेन्सिकसह चार पथके तैनात केली होती. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी माय-लेकाने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद राखण्यासाठी काँग्रेसची उद्धव ठाकरेंना 'फोनाफोनी', नवी ऑफरही देऊन टाकली
ADVERTISEMENT











