Crime News: आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला जिवंत जाळून टाकण्याचा भयानक कट रचला, पण शेवटी नशिबाचा खेळ वेगळाच होता, प्रियकर आपल्या प्रेयसीला जाळून टाकण्यासाठी जे पेट्रोल वापरणार होता ते पेट्रोल त्याच्याच अंगावर पडलं आणि तरुणीला आग लावण्यासाठी गेला असता त्याचं स्वत:चं शरीर जळालं.
ADVERTISEMENT
हे वृत्त नेल्लोरमध्ये राहणाऱ्या एका विजय नावाच्या तरुणाचं आहे. गेल्या दोन वर्षांपासून विजयचं एका विधवे महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्या महिलेला दोन मुलं असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यात बऱ्याच काळापासून मतभेद सुरू होते आणि हा वाद इतका वाढला की पोलिसांनी दोघांना समजावून सांगितल्यानंतर देखील विजयच्या मनात त्याच्या प्रेयसीविषयीचा राग कायम होता.
नेमकं काय घडलं?
सोमवारी वियजने एक भयानक योजना आखली. त्याने आपल्या प्रेयसीला विश्वासात ऑटोरिक्षात बसवलं. त्यानंतर, तो आपल्या प्रेयसीला घेऊन ऑटोरिक्षामधून धनलक्ष्मीपुरम परिसरातील एका निर्जन ठिकाणी पोहोचला. त्यानंतर, आरोपीचा खरा चेहरा समोर आला. त्याने त्याच्याकडे असलेली पेट्रोलची बाटली काढली आणि त्या महिलेच्या अंगावर ओतली. परंतु, रागाच्या भरात विजयला हे कळलंच नाही की काही पेट्रोलचे थेंब त्याच्या स्वतःच्या कपड्यांवरही पडले.
हे ही वाचा: बायकोच्या माहेरी गेला अन् अल्पवयीन मेहुणीला बघून नियत फिरली; दाजीचं घृणास्पद कृत्य अन्...
विजयने आपल्या प्रेयसीला आग लावण्यासाठी लायटर लावताच, पेट्रोलने लगेचच पेट घेतला आणि विजयच्या कपड्यांवर सुद्धा पेट्रोल पडल्याने तो आगीच्या विळख्यात अडकला. बघता क्षणी ऑटोरिक्षा सुद्धा आगीचा गोळा बनली. शेवटी, जीव वाचवण्यासाठी हताश अवस्थेत दोघांनी जवळच्या कालव्यात उडी मारली. अखेर, कालव्याच्या पाण्यामुळे त्यांचे प्राण वाचले, पण दोघेही गंभीररित्या भाजले. आगीचे लोट पाहून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल केले. विजयची ऑटो पूर्णपणे जळून खाक झाली होती. प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी हत्येच्या प्रयत्नाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून विजयचा तपास सुरू केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











