Crime News : झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. येथील खूंटपानी भागात सुरुवातीला मुलांच्या चोरीची अफवा वाटणारी घटना प्रत्यक्षात एका चार वर्षांच्या निष्पाप बालकाचे अपहरण आणि अत्यंत निर्घृण हत्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 26 फेब्रुवारी रोजी बालेमा हेम्ब्रम यांनी आपला मुलगा निर्मल बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीचे गांभीर्य ओळखून पश्चिम सिंगभूमच्या पोलीस अधीक्षकांनी तातडीने एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : विवाहित प्रेयसीने मध्यरात्री घरी भेटायला बोलवलं... पण सकाळी 'त्या' अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह!
अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न
तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी चक्रधरपूरमधील देवेंद्र बोदरा नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपीने आपला गुन्हा मान्य केला, ज्यामुळे या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आले. आरोपीने अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण केले होते. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याने मुलाला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या निष्पाप मुलाने या कृत्याला विरोध केला आणि आरडाओरडा सुरू केला.
दगडाने ठेचले डोके
स्वतःचे कृत्य उघड होईल या भीतीने आरोपी देवेंद्र बोदरा याने क्रूरतेची सीमा ओलांडली. मुलाचा आवाज दाबण्यासाठी त्याने जवळच असलेला एक मोठा दगड उचलला आणि त्या चार वर्षांच्या मुलाचे डोके दगडाने ठेचून त्याची जागीच हत्या केली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवून मुलाचा मृतदेह आणि रक्ताने माखलेला तो दगड हस्तगत केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
हे ही वाचा : हातांवर मांस नाही, डोळा 15 मीटर लांब... शेतात सापडला विदारक अवस्थेतील मृतदेह; साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचं काय झालं?
आरोपीला न्यायालयीन कोठडी
मुफ्फसिल पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या घटनेने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, केवळ संशयावरून मुलांच्या चोरीच्या अफवांकडे दुर्लक्ष न करता पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगाराला पकडण्यात यश आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, न्यायालयात भक्कम पुरावे सादर करून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
ADVERTISEMENT











