हिंदू मित्राच्या मुलाच्या निधनानंतर प्रेतयात्रेला मुस्लिम बांधवांनी दिला खांदा, पार पाडले अंत्यसंस्कार

मुंबई तक

• 04:34 PM • 22 Apr 2021

सध्या कोरोनाच्या काळात लोक फक्त आपल्यापुरता विचार करताना दिसत आहेत. माणसाने केलेल्या अनेक कृती त्याच्या माणूस का म्हणायचं हा प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेत. लोक आपल्या लोकांनाही आधार देत नाहीत. मृत्यू झाला तर कुणी खांदाही द्यायला येत नाही असेही प्रकार घडले आहेत. मात्र औरंगबादमध्ये घडलेली घटना माणुसकीचं दर्शन घडवणारी ठरली आहे. औरंगाबादमध्ये एका हिंदू मित्राच्या मुलाचा […]

Mumbaitak
follow google news

सध्या कोरोनाच्या काळात लोक फक्त आपल्यापुरता विचार करताना दिसत आहेत. माणसाने केलेल्या अनेक कृती त्याच्या माणूस का म्हणायचं हा प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेत. लोक आपल्या लोकांनाही आधार देत नाहीत. मृत्यू झाला तर कुणी खांदाही द्यायला येत नाही असेही प्रकार घडले आहेत. मात्र औरंगबादमध्ये घडलेली घटना माणुसकीचं दर्शन घडवणारी ठरली आहे.

हे वाचलं का?

औरंगाबादमध्ये एका हिंदू मित्राच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर प्रेतयात्रेला खांदा देण्यासाठी मुस्लिम बांधव पोहचले. त्यांनी हिंदू मित्राचं सांत्वन केलं, त्याच्या मुलाच्या प्रेतयात्रेला खांदा तर दिलाच पण स्मशानात जात अंत्यसंस्कारही पार पाडले. रमजान महिना सुरू असताना मुस्लिम बांधवांनी केलेलं हे कृत्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. अनेकजण या मुस्लिम बांधवांनी दाखवलेल्या माणुसकीचं कौतुक करत आहेत.

आपल्या खांद्यावर प्रेत वाहून नेत या सगळ्या मुस्लिम बांधवांनी माणुसकीचा एक नवा अध्याय लिहिला आहे. औरंगाबादच्या सिटी चौकात राहणारे दलाल हार्डी यांचा मुलगा सुबोधचा मृत्यू झाला. सुबोध पंधरा वर्षांचा होता. त्याच्या प्रेतयात्रेला कुणी पुढे येईना.. मग त्या भागात राहणारे हार्डी यांचे मित्र तिथे आले. त्यांनी या आपल्या मित्राच्या मुलाच्या प्रेतयात्रेला खांदा तर दिलाच शिवाय त्यांनी स्मशानात जाऊन अंत्यसंस्कारही पार पाडले.

हार्डी यांचा मुलगा सुबोध जन्मल्यापासूनच अपंग होता. त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर अनेक उपचार केले. मात्र अखेर मृत्यूने सुबोधला गाठलंच. सुबोधचा मृत्यू झाल्याची बातमी हार्डी यांच्या शेजाऱ्यांना समजली तेव्हा सगळेच मुस्लिम बांधव एकत्र आले त्यांनी सुबोधच्या प्रेतयात्रेला खांदा दिला आणि हिंदू स्मशानभूमीमध्ये जाऊन सुबोधच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने सगळे अंत्यसंस्कारही केले. औरंगाबादमध्ये आम्ही सगळेच मिळून मिसळून राहतो. हिंदू-मुस्लिम असा भेदाभेद करत नाही आम्ही एकमेकांच्या सुख दुःखात कायमच सहभागी होतो असं सुबोधच्या काकांनी आज तकला सांगितलं.

    follow whatsapp