नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या खात्याचा कार्यभार देखील स्वीकारला. यानंतर त्यांनी ‘मुंबई तक’ला पहिलीच Exclusive मुलाखत देखील दिली. आपल्या या मुलाखतीत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला.
ADVERTISEMENT
‘शिवसेनेला काय टक्कर द्यायची.. भाजपसमोर शिवसेना काय आहे? 54 आमदारांवर मुख्यमंत्री म्हणजे राज्य काही त्यांच्या हातात नाही. ते आमच्याशी स्पर्धा करु शकत नाही. टक्कर कुठल्याही स्वरुपाची ते देऊ शकत नाही माझ्याशी, भाजपशी. (BJP)’ असं म्हणत राणेंनी शिवसेनेला डिवचलं आहे.
पाहा नारायण राणे यांनी दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय-काय म्हटलं आहे:
प्रश्न: आपण आतापर्यंत कायम मुंबई किंवा कोकणात कायम राजकारण केलं. पण आता थेट दिल्लीत आल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय?
नारायण राणे: मला फार आनंद होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम करायची मला संधी मिळते आहे याचा मला फार आनंद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दिल्लीत केंद्र सरकारमध्ये काम करायला मिळतं आहे याचं मला समाधान आहे आणि मी नक्कीच माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थक ठरवेल हा माझा आत्मविश्वास आहे.
प्रश्न: अशी चर्चा आहे की, शिवसेनेला आगामी काळात भाजपला टक्कर द्यायची आहे त्यासाठी राणेंना मंत्रिपद देण्यात आलं आहे, तुमचं म्हणणं काय?
नारायण राणे: हे काय खरं नाही… शिवसेनेला काय टक्कर द्यायची.. भाजपसमोर शिवसेना काय आहे? 54 आमदारांवर मुख्यमंत्री म्हणजे राज्य काही त्यांच्या हातात नाही. 54 आमदार आहेत फक्त आणि दगाफटका करुन मुख्यमंत्री बनलेले आहेत. ते आमच्याशी काय टक्कर देऊ शकतात, की माझ्याशी म्हणा.. शिवसेनेतून निघाल्यानंतर एवढे वर्ष मी त्यांना टक्करच देतोय ना.
ते आमच्याशी स्पर्धा करु शकत नाही. टक्कर कुठल्याही स्वरुपाची ते देऊ शकत नाही भाजपशी. भाजपने त्या कारणासाठी मला मंत्री बनवलेलं नाही. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होती, अनेक वर्ष मला वेगवेगळ्या मंत्रिपदांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना वाटलं की, मी इथे चांगलं काम करु शकेल म्हणून मला दिलेली संधी आहे.
प्रश्न: मराठा वोट बँकेसाठी आपल्याला मोठं मंत्रिपद दिलं असल्याची चर्चा आहे, हे कितपत खरं आहे?
नारायण राणे: कुठलाही हेतू ठेवून भाजपने मला मंत्री केलेलं नाही. एक सांगतो की, महाराष्ट्रातील मराठा समाज आजही माझ्यावर विश्वास करतो. कारण जेव्हा मला महाराष्ट्र्च्या मंत्रिमंडळाने एका समितीचा अध्यक्ष बनवलं होतं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी. तेव्हा माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पार पाडली होती.
मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. हायकोर्टात टिकलं देखील होतं. म्हणून कदाचित महाराष्ट्राची जनता माझ्या कामावर खुश आहे. माझ्या निर्णयावर खुश आहे. त्यांना वाटतं की, राणे महाराष्ट्रात किंवा देशात काही तरी करु शकतं. म्हणून ते माझ्या पाठी असतील ते आशिर्वाद देण्यासाठी.
प्रश्न: जिथे सत्ता असते तिथे राणे जातात का?
नारायण राणे: हे बघा… हे पक्ष काही मी स्वत: बदलेले नाहीत. शिवसेनेत 39 वर्ष राहिल्यानंतर माझं अंतर्गत जमलं नाही. बाळासाहेबांशी चांगलं जमत होतं. मी शिवसेना सोडली तेव्हा साहेब दु:खी झाले. मलाही वाईट वाटलं. पण उद्धवजींशी नाही जमलं माझं, मी सोडलं. काँग्रेसमध्ये गेलो म्हणजे.. काँग्रेसची लोकं माझ्याकडे आले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, आमच्यामध्ये या. अहमद पटले मला म्हणाले होते की, तुम्हाला सहा महिन्यात आम्ही मुख्यमंत्री बनवतो.
12 वर्षापर्यंत जेव्हा मला बनवलं नाही तेव्हा मी म्हटलं हे टोलवाटोलवी करतायेत. आपल्याला न्याय देणार नाही. म्हणून मी राहुल गांधीजी यांना घरी जाऊन सांगितलं की, मी पक्ष सोडतोय. सांगून निघालो मी.. काही फसवाफसवी करुन निघालो नाही.
त्यानंतर मी पक्ष काढला तेव्हा फडणवीस मला म्हणाले की, तुम्ही भाजपमध्ये या. शिवसेना आणि भाजप युतीत आम्ही अनेक निवडणुका लढवल्या होत्या. तेव्हा भाजपमधील नेत्यांशी माझे संबंध चांगले होते. त्यामुळे मला वाटलं की, पक्ष चालवण्यापेक्षा भाजप जर आपल्याला बोलावत आहे आणि आपल्याला मान-सन्मान मिळेल म्हणून प्रवेश केला.
मी काही मुद्दाम पदासाठी आलो नाही. मला एवढी पदं मिळाली. राज्याचा मुख्यमंत्री झालो. सहा वर्ष विरोधी पक्षनेता होतो. मी बेस्टचा चेअरमन होतो त्याची हॅटट्रिक केली. सगळे रेकॉर्ड तोडत आलो आहे. सगळ्यात तरुण कॅबिनेट मंत्री होतो मनोहर जोशींच्या.
प्रश्न: आपल्याला महत्त्वाचं खातं देण्यात आलं आहे, कोव्हिडच्या काळात अनेक छोटे उद्योग बंद झाले आहेत. त्यासाठी आपण काय कराल?
नारायण राणे: आपल्याला सांगतो की, कोरोनामुळे लघु उद्योग हे कोलमडले आहेत. बंद पडले आहेत. आर्थिक स्थिती त्या मालकांची गंभीर आहे. याची मला जाणीव आहे. मी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तात्काळ सचिव आणि संबंधित लोकांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की, मला सगळी माहिती द्या. काय स्थिती आहे लघु उद्योगांची. ती चर्चा मी उद्या ठेवलेली आहे.
ती चर्चा झाल्यानंतर माझ्यासमोर जे वास्तववादी चित्र आल्यानंतर मी ताबडतोब त्यासंबंधी उपाययोजना करायचं ठरवलं आहे.
प्रश्न: महाराष्ट्रातून जे 4 मंत्री झाले आहेत त्यापैकी 3 जण तर बाहेरुन आलेले आहेत. यामुळे भाजपमध्ये नेमका काय मेसेज जाईल?
नारायण राणे: भाजपमध्ये अनेक नेते आहेत. भाजपमध्ये विश्वास आहे, गुणवत्तेची कदर आहे. म्हणूनच भाजपमध्ये लोकं येतात कदर केली जाते त्याचं उत्तम उदाहरण मी तुमच्यासमोर आहे.
Narayan Rane: ‘राणेंची मंत्रिपदावरुन गच्छंती होण्यास वेळ लागणार नाही’, कोणी साधला राणेंवर निशाणा?
प्रश्न: तुमच्या खोलीत आता कुठेही बाळासाहेबांचा फोटो दिसत नाहीए?
नारायण राणे: मी आता एका वेगळ्या विचारसरणीमध्ये आहे. त्यांना आजही मी गुरु मानतो. मला घडवलं ते त्यांनीच घडवलेलं आहे. मी कधीही हे नाकारत नाही. आजही मी जो काही बनलो आहे ते त्यांच्या मार्गदर्शनामुळेच बनलो आहे. हे माझं आजही म्हणणं आहे. म्हणून माझं त्यांच्यावर प्रेम आहे. फोटो जरी नसला, आज वेगळ्या विचारसरणीमध्ये जरी असलो तरी त्यांचं हिंदुत्व होतं आणि आजही मोदी आणि अमित शाह यांच्याही हिंदुत्ववादी विचारसरणीमध्ये मी आहे.
ADVERTISEMENT











