Crime News : फेसबुकवर झालेली मैत्री, त्यानंतर लिव्ह-इन रिलेशनशिप, बलात्काराचा गुन्हा आणि अखेर मंदिरात झालेला विवाह... एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असा हा प्रवास रविवारी रक्ताच्या थारोळ्यात संपता संपता वाचला. पिपलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर येथील 'कोमल पॅलेस' हॉटेलमध्ये एका महिलेने आपल्या पतीवर ब्लेडने वार करून त्याला संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आरोपी पत्नी सध्या फरार आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
पुणे येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेला ललित राजपूत (30) हा मूळचा पिपलानी येथील गोपाल नगरचा रहिवासी आहे. त्याची पत्नी देनंदनी तोमर ही खंडवा येथील असून शाजापूर जिल्हा रुग्णालयात परिचारिका (नर्स) म्हणून कार्यरत आहे. शनिवारी देनंदनी ललितला भेटण्यासाठी आली होती. ललितने तिला राहण्यासाठी आनंद नगरमधील कोमल पॅलेस हॉटेलमध्ये खोली बुक करून दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ललित झोपेत असताना ही घटना घडली. ललितची झोप उघडली असता, देनंदनीने त्याच्या छातीवर चढून हातावर आणि पोटावर ब्लेडने सपासप वार करण्यास सुरुवात केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ललितने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाथरूममध्ये धाव घेतली आणि आतून कडी लावून घेतली. मात्र, संतापलेल्या पत्नीने तिथेही त्याचा पाठलाग केला आणि काचेच्या ग्लासने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. सुदैवाने, या हल्ल्यात ललितचा जीव वाचला असला तरी तो गंभीर जखमी झाला आहे.
फेसबुक मैत्री ते पोलीस कोठडी
ललित आणि देनंदनी यांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र, ललितने लग्नास नकार दिल्याने देनंदनीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या कायदेशीर कचाट्यानंतर दोघांमध्ये तडजोड झाली आणि मे 2025 मध्ये आर्य समाज मंदिरात त्यांनी लग्न केले.
लग्नानंतरही त्यांच्यातील वाद मिटले नाहीत. ललित भोपाळमध्ये तर देनंदनी शाजापूरला राहत होती. ललितच्या मते, "पत्नीला सोबत राहायचे नाहीये," तर देनंदनीचा आरोप होता की, "पती तिला सोबत ठेवायला तयार नाही." याच वादातून शनिवारी रात्री हॉटेलमध्ये पुन्हा खडाजंगी झाली आणि त्याचे रूपांतर भीषण हिंसेत झाले.
पोलीस तपास आणि कारवाई
घटनेनंतर आरोपी देनंदनी घटनास्थळावरून फरार झाली आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमी ललितला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पिपलानी पोलिसांनी ललितच्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
"आम्ही हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तिचे लोकेशन ट्रेस केले जात आहे," अशी माहिती पिपलानी पोलिसांनी दिली. वैवाहिक वादातून एका सुशिक्षित महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याने या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











