उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात उल्लेख केलेले माजी नगरसेवक मढवी दोन वर्षांसाठी तडीपार

मुंबई तक

• 03:13 PM • 08 Oct 2022

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात उल्लेख केलेले नवी मुंबईचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी आज याबाबतचे आदेश पारित केले. १८ गंभीर गुन्हे दाखल असल्याने मढवी यांना नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि मुंबईमधून तडीपार करण्यात आले आहे. अलिकडेच त्यांच्यावर गणेशोत्सवाच्या दरम्यान […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात उल्लेख केलेले नवी मुंबईचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी आज याबाबतचे आदेश पारित केले. १८ गंभीर गुन्हे दाखल असल्याने मढवी यांना नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि मुंबईमधून तडीपार करण्यात आले आहे. अलिकडेच त्यांच्यावर गणेशोत्सवाच्या दरम्यान मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केला होता उल्लेख :

उद्धव ठाकरे यांनी एम.के. मढवी यांचा दसरा मेळाव्यात उल्लेक केला होता. उद्धव ठाकरे म्हणाले होते, कोणत्या पद्धतीने तुम्ही कायदा चालवत आहात? मी मुद्दाम काही बातम्या घेऊन इकडे आलो आहे. आपल्या नव्या मुंबईचे मढवी. त्यांनी तर काल-परवा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. पोलिसांकडून धमक्या येत आहेत. तु या गटात ये नाही तर तुझा एन्काऊंटर करु. पैसे मागितले जात आहेत. आमच्या रायगडच्या बबन पाटील यांना त्रास दिला जात आहे. किती जणांची नावं सांगु? असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

शिंदे गटात जाण्यासाठी धमकी : मढवींचा आरोप –

काही दिवसांपूर्वी मढवी यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटात जाण्यासाठी आपल्याला धमकी येत असल्याचा आरोप केला होता. शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करु, तुमचा एन्काऊंटर करू, अशी धमकी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली असल्याचा आरोप मढवी केला होता. तसेच आपल्याकडे 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

मढवी म्हणाले होते, माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्याची हालचाल नवी मुंबई पोलिसांनी सुरू केली असल्याची माहिती मिळाली. याबाबत मी पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांना भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी त्यांनी मला थेट शिंदे गटात सामील होण्यास सांगितले. शिवाय जाताना विजय चौगुले यांच्या माध्यमातूनच जा, जास्त आढेवेढे घेऊ नका, नाही तर तुम्हाला तडीपार करु, तुमचा एन्काऊंटर करू, असाही दम दिला असल्याचा आरोप मढवी यांनी केला होता.

एकनाथ शिंदे यांनीही धमकावले :

मढवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्याला धमकावले असल्याचा दावा केला होता. “तुम्ही मातोश्रीवर जाऊ नका, माझ्याकडे या, माझ्याकडे आल्यानंतर तुमचे आणि कार्यकर्त्यांचे भलेच होणार आहे. तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तुम्ही मातोश्रीवर जाण्याचे थांबवा”, असा दम शिंदे यांनी फोनवरून दिला होता, असाही आरोप त्यांनी केला होता.

    follow whatsapp