पुण्यात झालेल्या महाराष्ट्र कनेक्ट कॉनक्लेव्ह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांची मुलाखत घेण्यात आली. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी या तिघांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवारांनी ईडी कारवाया, महाविकास आघाडीचा प्रयोग यासह विविध विषयांवर आपली मतं मांडली. सध्याचे राज्यकर्ते सभ्य आणि सुसंस्कृत नाहीत असं म्हणत त्यांनी मोदींनाही टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत शरद पवार?
“सध्याचे राज्यकर्ते सभ्य आणि सुसंस्कृत असे राज्यकर्ते नाहीत, त्यांना असं वाटतं की ईडीच्या धाडी टाकल्या, विरोधकांवर आरोप केले की अशा पद्धतीने विचाराशी संघर्ष करणारा जो घटक आहे तो तातडीने शरणागती पत्करेल. ईडीची नोटीस निवडणुकीच्या आधी मलाही आली होती. मी त्यानंतर सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला सकाळी ईडीच्या कार्यालयात जायचं आहे. मी ईडीच्या कार्यालयात येतो असं सांगत त्यांना फोनही केला. तर ईडीचे अधिकारी हात जोडत आले आणि येऊ नका म्हणाले. त्यामुळे अशी संकटं आल्यानंतर आपलं नाणं खणखणीत असल्याने दडपशाहीला घाबरायचं नाही.”
या सगळ्या प्रवृत्तींना धाडसाने तोंड देण्याची भूमिका घ्यावी लागते. या लोकांनी कधी आयुष्यात संघर्षाला खऱ्या तोंड देण्याची भूमिका घ्यावी लागते. एवढंच नाही जाणीवपूर्वक नव्या पिढीत धर्मवादाचा प्रसार करण्याचं काम काही लोक करतात. माझं स्वच्छ मत आहे की त्यांना यश येणार नाही. लोक ऐकतील आणि दुर्लक्ष करतील आणि हा विषय सोडून देतील असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
काश्मीर फाईल्स या सिनेमावरही शरद पवारांनी भाष्य केलं. भाजपने काश्मीरमधील पंडितांची हत्या इतरांच्या कार्यकाळात झाला असा खोटा प्रचार केल्या. भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या सरकारच्या काळातही पंडितांच्या हत्या झाल्या. काश्मीर फाईल्स हा सिनेमा संपूर्ण देशातल्या लोकांवर काही वेगळा परिणाम करावा या वृत्तीने आणि खोटी स्थिती मांडलेला सिनेमा आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. आजही केंद्रात भाजपचं सरकार आहे हे असताना पंडितांना संरक्षण देण्यास ते पूर्ण अपयशी ठरले. चुकीचा विचार मांडून प्रचार करून लोकांची मतं बदलण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
तुमची स्मरणशक्ती इतकी दांडगी कशी? असं प्रश्न जेव्हा शरद पवार यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, मी यशवंतराव चव्हाण यांच्याकडून हे शिकलो. त्यांचे राजकारण आणि समाजकारण यशस्वी होण्यास ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्यामधे एखाद्या व्यक्तीचा पहिल्या नावाने उल्लेख करणं हे होतं. एकदा माझ्या मतदारसंघातील एक महिला मुख्यमंत्री असताना तिचे काम घेऊन मुंबईत आली. मी त्या महिलेला म्हटलं कुसुम काय काम काढलं? मी नावाने हाक मारल्यावर ती तिचं कामच विसरुन गेली आणि गावाकडे सगळ्यांना सांगितले की मला साहेबांनी नावाने ओळखले. आधी माझ्या मतदारसंघातील पन्नास टक्के लोकांना मी नावाने ओळखायचो. आता तसे नाही. आता त्याने आजोबांचे नाव सांगितलं की कळतं हा कोणाचा आहे असंही शरद पवार या मुलाखतीत म्हणाले.
ADVERTISEMENT
