प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ संशयित कार आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर याच कारमध्ये तब्बल 20 जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. त्याचबरोबर त्यात मुकेश यांना धमकीचं एक पत्रदेखील होतं. हे धमकीचं पत्र मुंबई तकच्या हाती लागलं आहे.
ADVERTISEMENT
हे पत्र मुकेश अंबनी आणि निता अंबनी यांना उद्देशून लिहिण्यात आलं आहे. ज्यामध्ये मुकेश यांना भाई आणि निता यांचा भाभी असा उल्लेख करण्यात आला आहे.
त्यात असं म्हटलंय की अशा त-हेने संशयित कार त्यांच्या घराबाहेर पार्क करुन त्यात जिलेटीनच्या कांड्या ठेवणं ही फक्त एक झलक आहे. पुढच्या वेळेस हे या जिलेटीनच्या कांड्या कनेक्ट करुन (म्हणजे त्यापासून स्फोटक बनवूनच) खऱ्या गाडीतून येईल. पूर्ण अंबनी कुटुंबाला उडविण्याचा बेत आहे असल्याचंही या पत्रात आवर्जून नमूद कऱण्यात आलं आहे.
मुकेश अंबानी यांचं अँटेलिया हे निवासस्थान हे मुंबईतील पेडर रोड येथे आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. पेडर रोड भागात मर्सिडिज, ऑडी, रॅण्ड रोव्हर यांसारख्या कार असतात. मात्र या भागात स्कॉर्पियो कार दिसल्याने पोलिसांनी संशय आला. ही कार लगेच तपासण्यात आली. ज्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक टीम लगेच घटनास्थळी दाखल झाली आणि त्याचवेळी कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास सुरु केला.
दरम्यान, या कारमध्ये फक्त जिलेटिनच्या कांड्याच सापडल्या होत्या. त्यामध्ये डिटोनेटर किंवा स्फोट घडवून आणणारे इतर साहित्य अद्याप सापडलेलं नाही. त्यामुळे फक्त जिलेटनची कांड्या ठेवणाऱ्यांचा नेमका हेतू काय होता याबाबत अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही.
ADVERTISEMENT
