NCP Ajit Pawar List of National Working Committee Members : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नव्या कार्यकारिणीची यादी समोर आली आहे. यामध्ये प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांचा समावेश नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. तसेच राष्ट्रवादीचा अंतर्गत कलह समोर आल्याची चर्चादेखील रंगली आहे. व्हायरल झालेल्या या यादीवर 29 एप्रिल 2026 ही तारीख असून भारतीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली ही यादी आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत या यादीमध्ये कारकूनी चूक (clerical mistake) झाल्याचे म्हटले आहे.
ADVERTISEMENT
व्हायरल यादीतील प्रमुख नावे आणि जबाबदाऱ्या :
या यादीनुसार पक्षात मोठा फेरबदल झाल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये एकूण 13 पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
सुनेत्रा अजित पवार : राष्ट्रीय अध्यक्ष
शिवाजीराव गर्जे : खजिनदार (ऑडिट आणि अकाउंट्स)
पार्थ अजित पवार : सरचिटणीस (पक्षाचे समन्वय)
सुबोध मोहिते : सरचिटणीस (पक्ष संघटनात्मक आणि प्रशासकीय कामे)
जय अजित पवार : राष्ट्रीय सचिव (राष्ट्रीय शिस्तपालन समितीचे अध्यक्ष आणि सह-खजिनदार)
अविनाश आदिक : राष्ट्रीय सचिव (सहकार, आयटी, विज्ञान-तंत्रज्ञान)
सना मलिक : राष्ट्रीय सचिव (अल्पसंख्याक आणि महिला विभाग)
धीरज शर्मा : राष्ट्रीय अध्यक्ष, युवक राष्ट्रवादी (युवक कल्याण)
याशिवाय संजय प्रजापती, राणा रणधीर सिंग, डॉ. रमण प्रीत सिंग, धनंजय शर्मा आणि डॉ. अभिषेक बोके यांचीही राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाल्याचे या पत्रात दिसत आहे.
हे ही वाचा : 'दारू प्यायल्यावर जे मनात येईल ते करतो..' माजी सैनिकाने 26 तासात केल्या तीन हत्या; नेमकं प्रकरण काय?
दिग्गजांना डच्चू?
या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांना डच्चू देण्यात आला आहे का असा प्रश्न आता विचारला जात आहे. तसेच पक्षाने आपल्या जुन्या नेत्यांची फळी बाजूला केल्याचेही बोलले जात आहे. मात्र यावर सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
हे ही वाचा : यवतमाळ : बायकोचा दुसऱ्याच पुरूषावर जडला जीव, नवऱ्याला संपवण्यासाठी दंडावर शॉक देऊन...
सुनेत्रा पवार यांची एक्स पोस्ट
सुनेत्रा पवार यांनी रात्री एक वाजून पाच मिनीटांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी या व्हायरल झालेल्या यादीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं की, ' माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत कारकूनी चूक (clerical mistake) असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल. ही खरंच कारकूनी चूक होती का याविषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
ADVERTISEMENT











