मुंबईत पावसाचा धुमाकूळ, दुपारच्या शाळा, कॉलेजला सुट्टी; पाहा कुठे-कुठे साचलंय पाणी
Mumbai Rain: मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज, सोमवार (18 ऑगस्ट 2025) रोजी दुपारच्या सत्रात सुटी जाहीर करण्यात आली आहे.

बातम्या हायलाइट

मुसळधार पावसामुळे मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर

सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, महापालिकेचं आवाहन
मुंबई: भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज, सोमवारी (18 ऑगस्ट 2025) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी 12 वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सोमवार (18 ऑगस्ट 2025) रोजी सुटी जाहीर केली आहे.
आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हे ही वाचा>> राज्यभरात पावसाचा हाहाकार, मुंबईत सलग तीन दिवस धो धो सुरूच, लोकल वाहतुकीवर परिणाम
काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात येत आहे.
मुंबईतील सांताक्रूझ, कुलाबा, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. यामुळे कुर्ला, सायन, चेंबूर, अंधेरी, मालाड, यासारख्या सखल भागांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. रडार निरीक्षणानुसार, दुपारी 2 वाजेपर्यंत पुढील 3-4 तासांत या भागात पावसाचा जोर वाढू शकतो. हवामान विभागाने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, याचा अर्थ अतिमुसळधार पावसाची शक्यता आणि स्थानिक पूरस्थितीचा धोका आहे.
हे ही वाचा>> Mumbai Rain: मुंबईत आज रेड अलर्ट! सांताक्रूझ, कुलाब्यासह 'या' ठिकाणी पाऊस करणार जोरदार बॅटिंग, तुमच्या भागात कसं असेल हवामान?
मुंबईत कसं असेल आजचं हवामान?
अलर्ट: भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, जो अतिमुसळधार पावसाचा आणि संभाव्य धोक्याचा इशारा देतो.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात बरंच पाणी साचलं आहे. यामुळे वाहतूक कोंडी, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातून येणारे वारे यामुळे आज आणि उद्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.