-कृष्णा पांचाळ, पिंपरी चिंचवड
Sushma Andhare news : अजित पवारांनी धरणातील पाणी साठ्यासंदर्भात केलेलं विधान पुन्हा चर्चेत आलंय. सुषमा अंधारे यांनी यावरूनच देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठी अमित शाह यांनी अजित पवार यांच्या एन्ट्री चा कार्यक्रम घेतला. फडणवीस आता मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात दिसणार नाही”, असं मोठं विधान केलं आहे.
“महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नकारात्मकता वाढत चाललेली आहे. आणि ती बदलण्यासाठी भाजपाने अजित पवारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांना शह दिला आहे”, असा दावा त्यांनी केला.
“देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातील दुकानदारी बंद होण्याची वेळ निश्चित आलेली आहे. महाराष्ट्रात व्यक्तिगत राजकारण करत मुख्यमंत्रीपदाच्या महत्वकांक्षेसाठी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावली. भाजपाला अडचणीत आणलं. भाजपाचे नकारात्मक छबी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच तयार झाली. त्यामुळे आता त्यांचं दुकान ‘इंडिया’ मूळ बंद होणार आहे”, असं विधान अंधारे यांनी केलं आहे.
अजित पवारांवरून फडणवीसांना घेरलं
“एकेकाळी देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर टीका टिप्पणी करायचे. त्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप देखील त्यांनीच केला. धरणग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस वारंवार बोलायचे आणि आता त्याच धरणातील पवित्र तीर्थ डोळ्याला आणि डोक्याला लावून ते पवित्र झाले आहेत”, असं म्हणत सुषमा अंधारेंनी फडणवीस यांना सुनावलं.
नवनीत राणा मराठी कळत नाही म्हणून…
यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावरती देखील शेलक्या शब्दात निशाणा साधला आहे. “नवनीत राणा उद्धव ठाकरे यांना म्हणत आहेत की तुमच्यात दम नाही… नवनीत राणा यांना मराठी कळत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेमध्ये दम नाही, हे त्यांना कसं सांगायचं हा प्रश्न आमच्या पुढे आहे. दम हा मराठीतील शब्द आहे. नेमका त्यांना कसं सांगायचं आणि कसं नाही हा प्रश्न आहे. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत. आमच्यावर चांगले संस्कार आहेत”, अशा शब्दात त्यांनी नवनीत राणा यांना टोला लागलाय.