Lok Sabha Election 2024: पवारांचा मल्ल.. शशिकांत शिंदेंना हलक्यात घेणं उदयनराजेंना जाणार जड?
Satara Lok Sabha Election 2024: उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना साताऱ्यात रंगणार हे ठरलं आहे.. आता हा सामना नक्की कसा असणार?
ADVERTISEMENT

सातारा: ज्या ठिकाणच्या लोकसभा पोटनिवडणुकीमुळं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवेळी वातावरण फिरलं आणि सिटींग खासदार असलेल्या उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला, त्या सातारा लोकसभा मतदारसंघाकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. एकीकडे उदयनराजेंचं नाव युतीकडून फिक्स मानलं जात असताना अद्याप जाहीर मात्र होत नाही. अशात राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. आमदार शशिकांत शिंदे हे साताऱ्याच्या मैदानात शड्डू ठोकणार आहेत.
महायुतीकडूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसली, तरी खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळपास निश्चिीत मानली जात आहे. म्हणजे उदयनराजेंनी अनेकदा स्वत:च्या उमेदवारीबाबत घोषणा केली आहे, त्यामुळं आता उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना साताऱ्यात रंगणार हे ठरलं आहे.. आता हा सामना नक्की कसा असणार? शशिकांत शिंदे उदयनराजेंना कशी फाईट देणार? शशिकांत शिंदेंची बलस्थानं नक्की कोणती आहेत हेच आपण जाणून घेऊयात...
शशिकांत शिंदे यांचं गाव तसं तर साताऱ्यातल्या जावळी तालुक्यातलं हुमगाव. वडील माथाडी कामगार असल्यामुळं लहानपणापासून ते मुंबईत राहिले. आण्णासाहेब पाटील यांच्याशी त्यांच्या वडीलांचा अत्यंत जवळचा संबंध होता. बीकॉमपर्यंतंचं शिक्षण घेतलेले शशिकांत शिंदे हे माथाडी बोर्डात क्लार्क म्हणून नोकरीला लागले. माथाडी कामगार आंदोलन, चळवळी त्यांनी लहानपणापासूनच पाहिलेल्या. याच माथाडी कामगार चळवळीत शिवाजीराव पाटील हे आण्णासाहेब पाटील यांच्यानंतर माथाडी संघटनेची धुरा हाती घेतली होती.
शिवाजीराव पाटील आणि बाबूराव रामिष्टे यांच्यात इथं जोरदार संघर्ष झाला. यावेळी शशिकांत शिंदेंनी महत्त्वाची आणि आक्रमक भूमिका घेतली. आणि शिवाजीरावांच्या गटाचा विजय झाला आणि इथेच शशिकांत शिंदे हे नेतृत्व उदयास आलं. यानंतर त्यांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतरची वेगवेगळी आंदोलनं आणि कामगाऱांच्या लढ्यात शशिकांत शिंदे आघाडीवर दिसून आले आणि चर्चेत आले.