गर्लफ्रेंडनं लग्नाला नकार दिला म्हणून हत्येचा कट, गावठी पिस्तूल घेऊन निघाला पण रस्त्यात... थरकाप उडवणारी घटना
चौकशीदरम्यान गौरवने सांगितलं की, त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते आणि दोघांनी प्रेमविवाहाचा निर्णय घेतला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्या तरुणीने लग्नास नकार दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गर्लफ्रेंड लग्नाला नाही म्हणून बॉयफ्रेंडला राग

बिहारहून मागवला गावठी कट्टा

गर्लफ्रेंडला मारून स्वत:लाही संपवण्याचा होता कट
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमिकेनं लग्नास नकार दिल्यानं संतप्त झालेल्या एका तरुणानं तिची हत्या करून स्वतःचाही शेवट करण्याचा कट रचला होता. मात्र, मूल पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही संभाव्य दुर्घटना टळली. आरोपी गौरव नितीन नरूले (वय 26, रा. वार्ड क्रमांक 12, मूल) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, मोबाइल आणि मोटरसायकलसह 1 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घटना काय आहे?
30 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मूल-ताडाळा मार्गावरील महाबीज केंद्राजवळ ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव नरूले हा त्याच्या प्रेमिकेची हत्या करण्याच्या उद्देशाने तिची वाट पाहत होता. त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसं होती. पोलिसांच्या गस्ती पथकाला संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या गौरववर शंका आली. तपासणीदरम्यान त्याच्या प्लास्टिक पिशवीतून पिस्तूल आणि काडतुसं सापडली, ज्यामुळे पोलिसही चक्रावून गेले.
हे ही वाचा >> कोकणातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, पुणे आणि साताऱ्यातील एकूण मान्सून परिस्थिती?
प्रेमिकेच्या नकारानंतर बनवला हत्येचा कट
चौकशीदरम्यान गौरवने सांगितलं की, त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते आणि दोघांनी प्रेमविवाहाचा निर्णय घेतला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्या तरुणीने लग्नास नकार दिला. यामुळे गौरव उदासीनतेच्या गर्तेत गेला आणि त्याने प्रेमिकेची हत्या करून स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने बिहारमधून देशी पिस्तूल आणि दोन काडतुसे खरेदी केली. सोमवारी तो हत्येच्या उद्देशाने महाबीज केंद्राजवळ प्रेमिकेची वाट पाहत होता, परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा डाव उधळला गेला.
पोलिसांची कारवाई
प्रभारी उपविभागीय पुलिस अधिकारी सुधाकर यादव आणि प्रभारी थानेदार सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पुलिस निरीक्षक अमितकुमार आत्राम, पुलिस हवालदार भोजराज मुंडरे, चिमाजी देवकते आणि पंकज बगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीवर भारतीय शस्त्र कायदा 1959 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला मंगळवारी तालुका न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांच्या न्यायिक कोठडीत पाठवले.
हे ही वाचा >> कर्जाच्या बदल्यात 4 फ्लॅट लिहून घेतले, पोलीस आणि दलालाच्या त्रासाला कंटाळून बिल्डरने स्वत:ला संपवलं
शस्त्र कुठून आले?
आरोपीने बिहारमधून शस्त्र कसे आणि कोणाकडून खरेदी केले, याबाबत पोलिसांनी अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही. मात्र, या प्रकरणाने मूल शहरात चर्चांना उधाण आले आहे. जिल्ह्यात शस्त्रांचे एजंट सक्रिय आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस म्हणाले, "आमचं गस्ती पथक महाबीज केंद्राजवळ गस्त घालत असताना संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या गौरव नरूलेला पकडलं. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. त्यानं गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशानं हे शस्त्र आणल्याचं सांगितलं. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे."ही घटना मूल शहरात चर्चेचा विषय बनली असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.