लाइव्ह

Lok Sabha Maharashtra Live : "माढा जिंकणं जास्त कठीण", चंद्रकांत पाटलांनीच वाढवलं भाजपचं टेन्शन

मुंबई तक

ADVERTISEMENT

चंद्रशेखर बावनकुळे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, चंद्रकांत पाटील.
चंद्रशेखर बावनकुळे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, चंद्रकांत पाटील.
social share
google news

Lok Sabha election 2024 Maharashtra politics Live news : लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रातील बातम्या आणि सर्व घटना घडामोडींचे अपडेट्स...

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:11 PM • 17 Apr 2024

    Lok Sabha Election 2024 : "माढा जिंकणं जास्त कठीण", चंद्रकांत पाटलांनीच वाढवलं भाजपचं टेन्शन

    भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी केलेल्या एका विधानाची खूप चर्चा होतेय. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपसमोरील आव्हाने वाढली आहेत. 

    याची कबुलीच आता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा शहरात पाटलांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी माढा आणि सोलापूर लोकसभेबद्दल भाष्य केलं. 

    पाटील म्हणाले की, "सोलापूरची निवडणूक इतकी कठीण नाही. माढ्याची निवडणूक या आधी कठीण नव्हती, पण आता कठीण झाली आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागवं."

    माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. 

    दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. मोहिते-पाटील भाजपत असल्याने दोन्ही जागा भाजप राखेल, असे म्हटले जात होते. पण, मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडल्याने पूर्ण चित्र बदललं आहे. 

  • 03:49 PM • 17 Apr 2024

    महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह बसणार पावसाचा तडाखा!

     

    कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • 01:24 PM • 17 Apr 2024

    Lok Sabha Election 2024 : "...तर उद्धवजी राजकारण सोडाल का?", शेलारांचं ठाकरेंना चॅलेंज

    भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

    शेलारांनी म्हटलं आहे की, "उद्धवजींना जाहीर आव्हान आहे की, देशात भाजपाने 45 पेक्षा अधिक जागा जिंकल्यास उद्धवजी राजकारण सोडाल हा मर्दाचा शब्द द्या. मविआने राज्यात 18 हून अधिक जागा जिंकल्यास आशिष शेलार राजकारण सोडेल", असे आव्हान शेलारांनी ठाकरेंना दिलं आहे. 

     

  • 01:17 PM • 17 Apr 2024

    "...त्यामुळे संविधान बदलणं ही एकमेव गॅरंटी दिली जातेय", आव्हाडांची पोस्ट चर्चेत

    जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या चारशे पार घोषणेबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. 

    आव्हाड म्हणतात की, "आतापर्यंत भाजपच्या पाच उमेदवारांनी आपल्या प्रचार करताना, 'आम्हाला संविधान बदलण्यासाठी जास्त जागांवर विजयी करा,' असे  म्हटले आहे. म्हणजेच, यांच्या मनात काय आहे हे स्पष्ट होत आहे. यांना ४०० जागा याचसाठी हव्या आहेत की, यांना संविधान बदलायचे आहे, आम्हीही तेच म्हणत आहोत. बुरसटलेल्या विचारांचे हे मनुवादी भारताला आजही पाच हजार वर्ष मागे घेऊ जाऊ इच्छितात."

    "केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकाला प्रभाकर यांनी आपल्या मुलाखतीत बरोबर सांगितले आहे की, 'प्राचीन भारतात घेऊन जाणारा हा सत्ताधारी पक्ष आहे.' भाजपच्या प्रमुख मंत्र्यांचे पती जेव्हा अशी वाक्ये बोलतात; तेव्हा खासगीत त्यांची पत्नी त्यांना काहीतरी सांगतच असणार ना! त्यामुळे स्पष्ट होतंय की, संविधान बदलणं ही एकमेव गॅरंटी सध्या दिली जात आहे."

     

  • ADVERTISEMENT

  • 01:15 PM • 17 Apr 2024

    एकनाथ खडसेंनी धमकीप्रकरणी दाखल केली तक्रार!

    "परवापासून मला धमकीचे कॉल येत आहेत. त्यात दाऊद आणि छोटा शकीलचा उल्लेख करण्यात येत आहे. आपकी कोई खैर नहीं, आपको मार देंगे. आपको मारना है, अशी धमकी मला दिली जात आहे. कोणी खोडसाडपणा करत असेल असं मला आधी वाटलं होतं. पण नंतर मी पोलिसांना कळवलं तक्रार दाखल केली आहे," अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

  • 01:15 PM • 17 Apr 2024

    अनिल देसाई यांच्या प्रचाराला काँग्रेसची अनुपस्थिती!

    दक्षिण मध्य मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराला काँग्रेसचे नेते पदाधिकारी वारंवार अनुपस्थित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या ठाकरे गटाकडून दक्षिण मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसची नाराजी दूर होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • ADVERTISEMENT

  • 01:04 PM • 17 Apr 2024

    Eknath Khadse : आमदार खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

    भाजपच्या वाटेवर असलेले एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छोटा शकील व दाऊद असल्याचा दावा करत विदेशासह इतर ठिकाणाहून कॉल करून धमकी देण्यात आली आहे.

    दरम्यान याप्रकरणी एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली असून, नाउमेद करण्यासाठी अशा प्रकारचे प्रकार केले जातात, मात्र, सातत्याने धमकीचे कॉल आल्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. 

    या घटनेच्या मागे कुठलेही राजकीय संबंध असेल, असे वाटत नसल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले आहेत. कुठल्याही धमक्यांना आपण भीत नसून, त्यामुळे परिवारात कुठलेही भीतीचे वातावरण नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काळजी घेत आहोत", असे देखील एकनाथ खडसे यांनी सांगितले.

  • 10:11 AM • 17 Apr 2024

    उत्तम जानकर यांनी घेतली पवारांची भेट

    माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहे. स्थानिक धनगर नेते उत्तमराव जानकर यांना महायुतीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

    देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांच्यासोबत नागपूरला बोलवून चर्चा केली. पण, तेच जानकर आज (17 एप्रिल) शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

    उत्तम जानकर हे शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, "आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता तशीच चर्चा पवार साहेबांसोबत होणार आहे. या बैठकीत निर्णय होईल. आणि त्यासाठी मी आणि मोहिते पाटील शरद पवारांची भेट घेणार आहोत."

    शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेल्या उत्तमराव जानकर यांच्यासोबत माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील पाटीलही होते. उत्तमराव जानकर यांच्या या भेटीने भाजपची धडधड वाढवली आहे. 

    महायुतीवर उत्तमराव जानकर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठीच फडणवीस यांनी त्यांना भेटीसाठी बोलावलं होतं. त्यांच्यासाठी स्पेशल चार्टड विमान बारामतीला पाठवलं होतं. पण, जानकरांच्या मनात काय चाललंय, असा प्रश्न सध्या सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

  • 10:07 AM • 17 Apr 2024

    मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 82 वा स्मृतिदिन

    मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था गेली ३४ वर्षे पुणे येथे कार्यरत आहे. ही संस्था मंगेशकर कुटुंबियांनीच स्थापन केली असून त्याचा मुळ उद्देश हा दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदिन दि. २४ एप्रिल रोजी प्रतिवर्ष साजरा करणे हा आहे. मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आत्तापर्यंत सुमारे २१२ व्यक्तींना गेल्या ३४ वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच या दिवशी पुरस्कार सोहळ्यानंतर संगीत तथा नाट्य, नृत्य असे कलाक्षेत्रातील विविध कार्यक्रम केले जातात. तसेच २०२२ वर्षापासून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ एक विशेष म्हणजे "लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार" प्रदान करण्याचे सर्व विश्वस्तांनी ठरविले आहे. त्यानुसार २४ एप्रिल २०२२ रोजी भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला होता व २४ एप्रिल २०२३ रोजी मा. श्रीमती आशा भोसले यांना हा पुरस्कार दिला होता. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच अशा व्यक्तीला दिला जातो की ज्याने आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान दिले आहे. यंदाचा हा कार्यक्रम दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पु.), मुंबई येथे बुधवार २४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वा. असेल. 

follow whatsapp

ADVERTISEMENT