Maharashtra News Live : राज ठाकरेंनी जाहीर केला उमेदवार; आता महायुती काय करणार?
Lok Sabha Election Maharashtra Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या बातम्यांसह महाराष्ट्र आणि देशातील इतर महत्त्वाच्या घटनांचे लाईव्ह अपडेट्स...
ADVERTISEMENT
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live News : लोकसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण किती जागा जिंकणार, या भोवतीच चर्चा होत आहे. निवडणूक विश्लेषक वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत.
ADVERTISEMENT
भाजप प्रणित एनडीएला किती जागा मिळणार? काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला किती यश मिळणार, याबद्दल सगळीकडे चर्चा सध्या सुरू आहे. पण, ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून, त्यानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रात राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात घडामोडी सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्र आणि देशभरातील लोकसभा निवडणुकीचे लाईव्ह अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
- 03:10 PM • 27 May 2024
Maharashtra News Live : दोन डॉक्टरांना अटक, अजित पवार म्हणाले...
पुण्यातील अपघात प्रकरणावर अजित पवार यांनी भूमिका मांडली. "पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळं हे सगळं घडलं, अग्रवालच्या मुलानं जे केलं अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणात नातवावर, वडिलांवर आणि आजोबांवर कारवाई केली गेलीय. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर सक्त अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल. नागपूर, जळगाव किंवा पुणे, याठिकाणच्या घटनांमध्ये कारवाई होईल", असे ते म्हणाले.
- 02:03 PM • 27 May 2024
Maharashtra Live : राष्ट्रवादीची पारंपरिक न मतं मिळाल्याने खूप मोठे नुकसान झाले; प्रफुल पटेलांचं आश्चर्यकारक विधान
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई मुंबईतील गरवारे क्लबमध्ये बैठक झाली. या बैठकीत बोलताना प्रफुल पटेल यांनी एक मोठं विधान केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपरिक मते मिळत नसल्याने पक्षाला फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रफुल पटेल काय बोलले? वाचा...
"लवकरच लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आहेत. या निवडणुकीत संविधानाबद्दल आपल्या कार्यकर्त्यांच्या तसेच सर्वसामान्यांच्या बाबतीत प्रश्न निर्माण केला गेला. मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सभेदरम्यान बोललो, महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात संविधानाबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे."
"४०० चा नारा आपला असल्याने चारशे पार करण्यासाठी आपल्याला हा मुद्दा आणि अपप्रचार यावर नियंत्रण राखलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसला आपली पारंपरिक मतं आपल्याला मिळत नसल्यानं खूप मोठे नुकसान झाले आहे."
"मात्र हे विसरता कामा नये याआधी आपल्या हिशाची जी मते आपल्याला मिळत नव्हती किंवा दुसऱ्या बाजूची मतं देखील या निवडणुकीत आपल्याला मिळाली आहेत. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची म्हणजेच एनडीए सरकार स्थापन होणार याचा आम्हाला विश्वास आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एनडीए चा एक भाग आहे."
"छगन भुजबळ या निवडणुकीत राहणार होते. केंद्रीय नेत्यांनी छगन भुजबळ हे निवडणूक लढले पाहिजेत याकरता आग्रह केला होता. दुर्दैवाने शिंदे यांनी आग्रह केला त्यामुळे आम्हाला ती जागा सेनेला सोडावी लागली. आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे. आपल्या पक्षाला मजबूत करायचं आहे. महायुतीत आपण आहोत. त्यामुळे त्या महायुतीला देखील मजबूत करण्याचं आपलं काम आहे."
"विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभे सारखी परिस्थिती होणार नाही याकरिता खबरदारी घेणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकाधिक जागा आपल्या वाट्याला येतील यासाठी आपण प्रयत्न नक्कीच करू. छगन भुजबळ जे म्हणाले त योग्यच. निर्णयप्रक्रियेत भुजबळ सुद्धा सोबत असतील", असे प्रफुल पटेल म्हणाले.
"यावेळेस सीटिंग-वेटिंग वर जागावाटप होणार नाही. आपल्याला जास्त जागा मिळतील हि खात्री आहे. आपली ताकद जास्त आहे. त्यानुसार जागा घेऊ. पण इलेक्टिबिलिटी आणि विनेबिलिटी पण महत्वाचं आहे. त्यानुसार जागावाटप झाल्यास आपल्या महायुतीचे सरकार पुन्हा येईल", असेही त्यांनी सांगितले.
- 01:47 PM • 27 May 2024
Maharashtra News : राज ठाकरेंनी जाहीर केला उमेदवार; महायुती पाठिंबा देणार का?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
महायुतीने या चार जागांसाठी अद्याप कोणताही उमेदवारी जाहीर केलेला नाही. दुसरीकडे राज ठाकरेंना कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराला महायुती पाठिंबा देणार की, आपला उमेदवार रिंगणात उतरवणार हे बघावं लागेल.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीमध्ये चार जागांवरून पुन्हा पेच निर्माण होताना दिसत आहे. मुंबईतील दोन्ही जागा शिवसेनेकडे होत्या. त्यावर आता भाजप दावा करताना दिसत आहे. त्यामुळे महायुती या जागांबद्दल काय निर्णय घेणार आणि राज ठाकरेंना पाठिंबा देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
- 10:07 AM • 27 May 2024
Maharashtra News Live : "शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच खूप पैसे वाटले", राऊतांपाठोपाठ तुपकरांचाही आरोप
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रूपये वाटले. महायुतीत असलेल्या अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि त्यांची यंत्रणा काम करत होती", असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता.
त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले रविकांत तुपकर यांनी गंभीर आरोप केला आहे.
"लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप पैसे वाटले. मंत्री उदय सामंत हे फक्त पैसे वाटायला होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत हजारो कोटी रुपये वाटले. हेलिकॉप्टरने पैसेच घेऊनच फिरत होते आणि हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले", असा आरोप तुपकर यांनी केला आहे.
- 08:38 AM • 27 May 2024
Maharashtra News Live : शरद पवारांना दोन धक्के! दोन नेते जाणार अजित पवारांसोबत!
लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच अजित पवारांनी शरद पवारांना दोन धक्के दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या पक्षातील दोन नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज (२७ मे) प्रवेश करणार आहेत.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह जिल्हाप्रमुख, आजी-माजी आमदार, खासदार यांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे.
या बैठकीतच शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
धीरज शर्मा यांनी आधीच पदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी सोशल मीडियावरून त्याबद्दल माहिती दिली आहे. सोनिया दुहान यांनी याबद्दल अद्याप कोणतेही भाष्य केले नसले, तरी त्या अजित पवारांसोबत जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच शरद पवारांना दोन नेते सोडून जाणार असल्याने हा मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT