बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा लवकरच ‘गर्ल ऑन द ट्रेन’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमात परिणीती चोप्रासोबत अभिनेत्री अदिती राव हैदरी देखील झळकणार आहे.
या सिनेमात परिणीती चोप्रा ही मीरा कपूर हिच्या भूमिकेत दिसणार असून कृति कुल्हारी एक पोलीस ऑफिसर असणार आहे. या चित्रपटात अदिती राव हैदरी आणि अविनाश तिवारी एका कपलची भूमिका साकारत आहेत. 2015 मध्ये प्रदर्शित आलेल्या पॉला हॉकिंस यांच्या नॉवलवरून या सिनेमाची कथा घेण्यात आली आहे.
या फिल्मच्या ट्रेलरमध्ये मीरा कपूरची कहाणी सांगण्यात आली आहे. मीरा कपूरने एका अपघातात तिच्या कुटुंबाला गमावलं आहे. यामुळे ती काही कारणाविना रोज ट्रेनने प्रवास करते. या दरम्यान तिला एका जोडप्याला पाहून तिच्या प्रेमाची आठवण येते. मात्र अचानक एक दिवस त्या जोडप्यातील मुलीची हत्या होते. या मुलीच्या हत्येच्या तपासामध्ये पोलीस परिणीतीपर्यंत पोहोचतात. या खुनाचे काही किस्से परिणीतीशीही संबंधित आहेत. परंतु तिच्या विसरण्याच्या समस्येमुळे तिला काही गोष्टी आठवत नाहीत.
दरम्यान परिणीतीचा हा सिनेमा ओटीटी प्लॉफॉर्मवर रिलीज होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी नेटफिक्सवर हा सिनेमा पाहता येईल. तर दुसरीकडे परिणीती सायना नेहवालच्या बायोपिकमध्येही दिसणार आहे. हा सिनेमा देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.