Konkan Rain: मालवण, कुडाळमध्ये पूर.. सिंधुदुर्गातील पुराचे हे Video पाहून भरेल धडकी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सध्या येथे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर काही तालुक्यामध्ये वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब केला जात आहे.
ADVERTISEMENT

भारत केसरकर, कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल (2 जुलै) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. सह्याद्री पट्ट्यातील जोरदार पावसामुळे नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, भंगसाळ नदीचे पाणी कुडाळ शहरात घुसल्याने शहरात जाणारा मार्ग बंद झाला आहे. याशिवाय, मुंबई-गोवा महामार्गाच्या नजीकच्या पावशी आणि वेताळ बांबर्डे या गावांमध्येही पुरस्थिती निर्माण झाली आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने नद्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून, कुडाळ शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. भंगसाळ नदीच्या पुरामुळे परिसरातील गावांमध्ये पाणी शिरले असून, आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
हे ही वाचा>> Mumbai Weather: मुंबई आणि ठाण्यासाठी 'हा' अलर्ट, पाहा हवामान खात्याने काय वर्तवलाय अंदाज
वाहतूक आणि रस्ते परिस्थिती
कणकवली आगार: उर्सुला येथे आचरा मार्गावर रस्त्यावर पाणी आले असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. तर बोर्डवे-कळसुली मार्गावर पाणी असल्याने वस्तीची गाडी पलीकडे थांबवण्यात आली आहे.
मालवण तालुका: अजगणी मार्गावर बागायत येथे पाणी आल्याने वस्तीची गाडी थांबवण्यात आली आहे.
कणकवली तालुका: शिवडाव मार्गावर परबवाडी येथे पाणी आल्याने पर्यायी मार्गाने गाड्या पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान, आंबोली वाहतूक अद्याप सुरळीत चालू आहे.
कुडाळ: रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद असून, गुलमोहोरकडे पाणी असल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
हे ही वाचा>> कोकणातील 'या' जिल्ह्यात येलो अलर्ट, पुणे साताऱ्यात मान्सूनची परिस्थिती काय?
प्रशासनाची प्रतिक्रिया
जिल्ह्यातील वाढती पुरस्थिती लक्षात घेता, आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्या असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रस्ते आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.