केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात नवी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पहिल्यांदा हिंसक वळण लागलं ते २६ जानेवारी दरम्यान…या रॅलीत हिंसाचारासाठी चिथावणी देण्याचा आरोप असलेल्या दीप सिद्धूला अखेरील दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने आंदोलनात आलेल्या शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकावल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता.
शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत पोलीस आणि आंदोलनकर्ते शेतकऱ्यांमध्ये हिंसक घटना पहायला मिळाल्या. आंदोलनकर्ते शेतकरी यावेळी पोलिसांनी केलेलं बॅरीकेटींग तोडून लाल किल्ल्यावर घुसले होते. यादरम्यान काही शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण केल्याचं समोर आलं होतं. अखेरीस जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या. या हिंसाचारानंतर तपासासाठी दिल्ली पोलिसांनी एक विशेष पथक तयार केलं होतं. ज्यात प्रमुख आरोपींच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी रोख रकमेचं बक्षीसही जाहीर केलं होतं.
काही दिवसांपूर्वी दीप सिद्धुचे भाजप खासदार सनी देओल, गृहमंत्री अमित शहा, खासदार हेमा मालिनी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे दीप सिद्धुला भाजपचा सपोर्ट असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. शांततेने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न दीप सिद्धुकडून करण्यात आला असाही आरोप विरोधी पक्षांनी केला होता. त्यामुळे दीप सिद्धुच्या चौकशीनंतर आता काय नवीन गोष्टी समोर येतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.