नाशिक: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता नाशिक जिल्ह्यात उद्यापासून (22 फेब्रुवारी) संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. यामधून फक्त आपात्कालीन सेवांशी संबिधत असणाऱ्यांनाच सूट मिळणार आहे. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज (21 फेब्रुवारी) दिली. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
तसेच मास्क न वापरणाऱ्यांना तब्बल 1000 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश देखील छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.
ही देखील बातमी पाहा: अमरावतीत उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊन, पालकमंत्र्यांची घोषणा
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत घोषणा केली की 22 फेब्रुवारी नाशिक मध्ये रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू राहील. कोरोना विषयक नियम उल्लंघन केल्याm थेट गुन्हा नोंदविण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आलेले आहेत. नाशिक शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस व महापालिका ह्यांनी संयुक्त कारवाई करावी तसेच 1000 रु दंड ठोठावण्यात यावा असे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लग्न समारंभातील वाढती गर्दी कोरोना वाढीस कारणीभूत ठरत असून लॉन्स व मंगल कार्यालय मालकांना गोरज मुहूर्तावरील लग्न टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या 5 दिवसात नाशिकमध्ये 544 रुग्ण वाढले असून 410 रुग्ण शहरातील आहे. त्यामुळे सध्या केवळ शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कडक नियम लागू करण्याची सरकारची इच्छा नाही पण जनतेने नियम पाळले नाहीतर कटू निर्णय घ्यावे लागतील असंही भुजबळ यावेळी म्हणाले.
नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.