बिनविरोध निवडून आलेल्या महिला सदस्याला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या महिलेला ग्रामस्थांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील वायचळ पिपंरी गावात घडली आहे. सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त असताना देखील महिलेला मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करण्यात आलेल्या महिलेचं नाव सुमन सातकर असं आहे.

सुमन सातकर ह्या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर उर्वरित 8 जागांसाठी गावात दोन पॅनल आमनेसामने होते. त्यापैकी एका पॅनलकडून सुमन ह्या बिनविरोध निवडून आल्या होत्या आणि सुमन यांच्या पॅनलने उर्वरित 8 पैकी चार जागा मिळवून बहुमत मिळविल्याचा दावा केला होता. मात्र, बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवार सुमन ह्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून गायब होत्या. सुमन ह्या विरुद्ध पार्टीच्या पॅनलबरोबर सहलीला गेल्या असल्याची शंका त्यांच्या गटाला होती. त्याच दरम्यान, अचानक सरपंच पदाच्या निवडीच्या वेळी त्या ग्रामपंचायतीत हजर झाला.

सुमन सातकर या विरुद्ध पॅनलच्या गटाला मिळाल्याचा राग मनात बाळगून, गावातील काही महिलांनी जमाव करून सुमन सातकर यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर या वादाचं पर्यवसन तुंबळ हाणामारीत झालं. अखेर घटना स्थळी दाखल असलेल्या पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद सोडविण्यात आला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या सगळ्या प्रकारामुळे गावातील एकूणच वातावरण तापलं असून आणखी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी एसआरपीएफच्या दोन तुकडया देखील गावात तैनात करण्यात आल्या आहे. सध्या गावात तणाव पूर्ण शांतता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता अनेक ठिकाणी सरपंच पदावरुन वाद निर्माण होत असल्याचं चित्र दिसत आहे.

दरम्यान, वायचळ-पिंपरी येथील ग्रामपंचायत सदस्याला झालेल्या गंभीर मारहाणीनंतर देखील अद्यापही पोलीस स्थानकात कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT