
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने सामान्य मुंबईकरांसाठी लोकल प्रवास बंद केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या लोकांनाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. परंतू मुंबई दुसरी लाट ओसरत असल्यामुळे मुंबई महापालिका येत्या काळात लवकरच सामान्यांसाठी लोकल प्रवास खुला करण्याचा विचार करत आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ही माहिती दिली.
पहिल्या टप्प्यात मुंबई महापालिकेने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना डोमेस्टिक विमान प्रवासादरम्यान कोरोनाच्या RTPCR चाचणीची अट शिथील केली आहे. यासंदर्भात महापालिकेने राज्य सरकारला पत्रही लिहीलं आहे. मुंबई लोकल ही सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लाईफलाईन ओळखली जाते. परंतू कोरोना काळात ही सेवा सामान्यांसाठी बंद असल्यामुळे अनेकांना कामावर जाताना त्रास सहन करावा लागत होता.
बस किंवा खासगी वाहनाने ऑफीस गाठताना ट्रॅफीकमध्ये मोडणारा वेळ, खर्च होणारा पैसा आणि त्यात वाढती महागाई यामुळे सामान्य मुंबईकर मेटाकुटीला आलेला असताना महापालिकेने हे संकेत दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रस्तावावर अंतिम निर्णय कधी होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.