महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर काही शहरांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. मुंबईत लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्नही विचारला जातो आहे. याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? जाणून घ्या परिस्थिती
नेमकं काय म्हणाले आहेत अस्लम शेख?
मुंबईत लॉकडाऊनची आवश्यकता भासली तर लॉकडाऊन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंदर्भातला अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. मुंबईत कोरोना रूग्ण वाढत आहेत. इतर ठिकाणीही वाढत आहेत. अशात नाईट क्लब सर्वात आधी बंद करण्यात येतील अशी शक्यता आहे. अधिवेशन झाल्यानंतर मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया, चौपाटी या ठिकाणी रात्री जी विनाकारण गर्दी होते तिथे बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागेल. नाईट कर्फ्यू लावायचा की लॉकडाऊन करायचा याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं आहे.
पाहा मुंबई तकचा खास व्हीडिओ
औरंगाबादमधल्या कोरोना सेंटरमध्ये महिलेबरोबर नेमकं काय घडलं?
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईत गर्दी होणाऱ्या ठिकाणी म्हणजे जसे की मुंबईतील भाजी मार्केट, लोकल, बेस्ट, बसेस, विवाह मंगल कार्यालयं, पब आणि बार या ठिकाणी निर्बंध येऊ शकतात असं म्हटलं आहे. मुंबईत विवाह सोहळ्यांमध्ये ५० लोकांचीच संमती आहे तरीही गर्दी होते आहे त्यामुळे यावर कडक निर्बंध येऊ शकतात असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली कारण मुंबईत लोकल सेवा सगळ्यांसाठी सुरू झाली. तसंच विवाह सोहळ्यांना गर्दी होऊ लागली, हे निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुंबईतल्या वाढत्या कोरोना रूग्णांवर आणि एकंदरीत परिस्थितीबाबत आढावा घेतला. आता मुंबईत लॉकडाऊनची घोषणा सध्या तरी करण्यात आलेली नाही मात्र कुठे लॉकडाऊन किंवा निर्बंध लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.