सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीकडून हे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
१०० कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार अर्थात मनी लाँडरिंग केल्याचा आरोप असून, या प्रकरणी ईडीकडून तपास केला जात आहे.
या प्रकरणात अनिल देशमुख यांच्याबरोबरच अटकेत असलेले त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. ईडीकडून आज (२३ ऑगस्ट) हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे.
संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना मनी लाँडरिंग प्रकरणात २५ जून रोजी अटक केलेली आहे. खंडणीचे पैसे घेण्यात व ते अनिल देशमुख यांच्याकडे हस्तांतरित करण्यात दोघांची भूमिका होती, असं ईडीच्या तपासातून समोर आलेलं आहे.
खंडणी वसुल केल्याच्या या प्रकरणात ईडीने बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेचाही जबाब नोंदवला आहे. खंडणीपोटी ४.७० कोटी रुपये गोळा केल्याचं वाझेनं चौकशीत सांगितलं होतं. त्यापैकी ४.१८ कोटी अनिल देशमुख आणि कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेला देण्यात आले असल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं होतं.
दिल्लीतील शेल कंपनीच्या माध्यमातून देशमुख यांच्या शैक्षणिक संस्थेकडे पैसे वळवण्यात आल्याचंही ईडीला तपासात आढळून आलं आहे. दरम्यान, याप्रकरणाचा तपास करत असताना ईडीकडून देशमुख यांच्या कार्यालयं, घरं आणि विविध मालमत्तांची झाडाझडती घेण्यात आली आहे.
ईडीकडून अनिल देशमुख यांना सातत्याने समन्स बजावले जात आहे. मागील सोमवारी हजर राहण्यासाठी ईडीकडून अनिल देशमुखांना पाचव्यांदा समन्स बजावण्यात आलं होतं. त्यांचा मुलगा ऋषिकेश यालाही चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र, दोघेही गैरहजर राहिले.
अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. पण, या प्रकरणात पर्यायी कायदेशिर उपायांसाठी न्यायालयात जाण्यास अनुमती दिली असल्याचं अनिल देशमुख यांच्या वकिलानं म्हटलं आहे. त्यांच्या वकिलांनी ईडीला यासंदर्भात उत्तर दिलं आहे.