मुंबई तकः पुण्याला लागूनच असलेल्या चिखलीमध्ये पोलिसांनी एका मांत्रिकाला अटक केली आहे. गौतम मोरे असं या मांत्रिकाचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एक धारदार चाकू, लिंबू आणि एका मृत प्राण्यांच्या हाडाचा सापळा जप्त केला आहे. गौतमनेही तो अघोरी पूजा करत असल्याचे कबूल केले आहे.
पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना गौतम संदिग्ध अवस्थेत फिरत असताना आढळला होता. संशयावरुन पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांना त्याच्या झोळीत एक धारदार चाकू, काही लिंबू, एका मृत प्राण्यांच्या हाडांचा सापळा आणि जादू टोणा करण्यासाठी वापरली जाणारी काही सामग्री सापडली आहे.
गौतमला पोलिसांनी पकडल्यानंतर केलेल्या चौकशीत तो चिखलीमधलाच असल्याचे समोर आले. ४० वर्षांच्या गौतमने तो अघोरी पूजा करत असल्याचे कबूल केले. तसंच भूत, प्रेत, काळी जादू, धन वृद्धी, आत्म्यापासून मुक्ती यासाठी लोकांच्या घरी जाऊन अघोरी पूजा करत असल्याचं गौतमने पोलिसांना सांगितलं आहे.
सध्या गौतमवर जादू-टोणा कायद्यांतर्गत गुन्ह्याती नोंद करण्यात आली असून त्याच दिशेने पोलिस तपास करत आहेत. गौतमने किती लोकांना जादूटोणा करण्याच्या नावाखाली फसवलंय यादिशेने तपास सुरू आहे.