रेणु शर्मा प्रकरणी धनंजय मुंडे यांना दिलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या रेणु शर्मा प्रकरणात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे करुणा शर्मा या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहेत, ज्यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन मुलंही झाली आहेत. करुणा शर्मा यांची बहिण रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. पण काही दिवसांनी रेणु शर्मा यांनी ही तक्रार मागे घेतल्यानंतर मध्यस्थाच्या (Mediator) मार्फत याप्रकरणी तोडगा काढण्यात येणार आहे. दोन्ही बाजूच्या वकीलांनी मुंबई उच्च न्यायालयात असा अर्ज दाखल केला आहे.

मध्यस्थाच्या मार्फत याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी येणारा सर्व खर्च धनंजय मुंडे उचलणार आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर धनंजय मुंडे यांचे काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आले होते. याविरोधात मुंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना दिलासा देत असे फोटो पोस्ट करण्यात येऊ नयेत असे आदेश दिले होते. यानंतर रेणु शर्माने मुंडे यांच्याविरोधातली तक्रार मागे घेतल्यामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी रेणु शर्मा या महिलेने बलात्काराचे आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणु शर्मा या महिलेने पोलीस आणि कोर्टात धाव घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा राजीनामा घेणार अशाही चर्चांना सुरुवात झाली होती. परंतू काही दिवसांनी रेणु शर्माने धनंजय मुंडे यांच्याविरोधातली तक्रार मागे घेतली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT