'मराठीचा माज नाही, गद्दारीची लाज नाही', वैभव जोशींच्या कवितेचं विडंबन... ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंना डिवचलं!
शिवसेना UBT ने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात अशी टीका केली आहे. ट्विटरवर एक फोटो आणि विडंबन काव्य पोस्ट करून ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंना डिवचलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाने आता मराठीवरून सुरू असलेल्या टीका-टिप्पणीवर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील जनेतबाबत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी अत्यंत चिथावणीखोर आणि वादग्रस्त विधान केलं आहे. अशावेळी शिवसेना UBT महायुतीत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर अत्यंत बोचऱ्या शब्दात निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेल्या वैभव जोशी यांच्या कवितेचं विडंबन काव्य करत त्यांनी थेट एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं आहे.
शिवसेना UBT पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये, शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पोस्टमध्ये एक प्रतिकात्मक चित्र तयार करण्यात आलं असून त्यावर विडंबन काव्य तयार करत एकनाथ शिंदेंवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.
हे ही वाचा>> Raj-Uddhav: बाळासाहेबांच्या मनातलं चित्र कॅमेऱ्यात झालं कैद, ठाकरेंच्या शिवसेनेने शेअर केलेला 'हा' फोटो पाहिलात का?
पोस्टमध्ये नेमकं काय?
पोस्टमध्ये एक काळ्या रंगात चित्रित केलेली दाढी असलेली व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे, ज्याच्या कपाळावर लाल टीका आहे. या प्रतिमेसोबत खाली मराठी कविता लिहिली आहे:
"चाल तुझी फसवी आणि
मन दगाबाज राही,
मराठीचा माज नाही,
गद्दारीची लाज नाही!"
ही कविता एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करणारी आहे. एकनाथ शिंदे यांनी 2022 साली शिवसेना पक्षातून बंड करून महाविकास आघाडी सरकार पाडले होते. दरम्यान, ठाकरे गटाने या कवितेत शिंदे यांच्या राजकीय चालींना "फसव्या" आणि "दगाबाज" असे संबोधले असून, त्यांच्यावर मराठी भाषेचा सन्मान नसल्याचा आणि गद्दारीची लाज नसल्याचा आरोप केला आहे. ही टीका विशेषतः मराठी भाषा आणि संस्कृतीवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.














