महाराष्ट्रातील जनतेला डिवचणारे भाजपचे दुबे आहेत तरी कोण? दुबेंचं ते विधान जसंच्या तसं...
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करून भाषा व महाराष्ट्रावरून वाद पेटवला आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी आज (7 जुलै) रोजी महाराष्ट्रातील मराठी भाषा वादावरून एक वादग्रस्त विधान केले, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. झारखंडमधून लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे दुबे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. पण यावेळी त्यांनी केवळ राज ठाकरेंवर टीका केली नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाला देखील डिवचलं.
दुबे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, "मराठी लोकांकडे काय आहे? ते आमच्याच पैशांवर जगत आहेत. जर मराठी माणसाने महाराष्ट्राबाहेर यावे, तर त्यांना आपटून आपटून मारू." हे विधान राज ठाकरे यांनी मराठी भाषेसाठी केलेल्या आंदोलनाला आणि त्यांच्या अलीकडील वक्तव्यांना प्रत्युत्तर म्हणून त्यांनी केलं आहे.
हे ही वाचा>> 'आमच्या दोघांमध्ये अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी केला दूर', उद्धव ठाकरेंनी का केली अशी टीका?
भाजप खासदार निशिकांत दुबेंचं चिथावणीखोर वक्तव्य...
'बघा तुम्ही काय म्हणताय की, मराठी बोलावं लागेल? अरे तुम्ही कोणाच्या भाकऱ्या खात आहात? तिथे टाटा आहे, बिर्ला आहे, रिलायन्स आहे.. पण कोणतंही युनिट महाराष्ट्रात नाही. टाटाने तर पहिली फॅक्टरी बिहार-झारखंडमध्येच सुरू केली होती. तुम्ही आमच्या पैशांवर पाळले जात आहात. तुम्ही कोणता टॅक्स लावता, कोणती इंडस्ट्री आहे तुमच्याकडे? खाणी आमच्याकडे आहेत. झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओडिशा यांच्याकडे खाणी आहेत. तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत? रिफायनरी रिलायन्सने बसवल्या आहेत त्या गुजरातमध्ये बसवल्या आहेत. सगळ्या सेमी कंडक्टरच्या इंडस्ट्री या गुजरातमध्ये येत आहेत.'
'तुम्ही तरीही रुबाब करत आहात. याउपर तुम्ही आमचं शोषण करत आहात. जर तुमच्यात हिंमत आहे.. जर तुम्ही हिंदी भाषिकांना मारत आहात तर उर्दू भाषिकांनाही मारा.. तामिळींना देखील मारा.. तेलगू भाषिकांना पण मारा. तुम्ही जी घाणेरडी कृत्य करत आहात.. मी नेहमी म्हटलंय की, तुम्ही तुमच्या घरात आहात, महाराष्ट्रात आहात.. खूप मोठे बॉस आहात ना.. तर चला बिहारला, चला उत्तर प्रदेशला.. चला तामिळनाडूला.. तुम्हाला आपटून-आपटून मारू..'
'आम्ही मराठीचा सन्मान करतो. मराठी एक आदरणीय भाषा आहे. आम्ही छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज.. पेशवे.. तात्या टोपेंपासून सगळ्यांना आम्ही सन्मान करतो.'
'टिळक असो, लाजपत राय असो.. सगळ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात.. गोपाळ कृष्ण गोखले असो.. सर्वांनी मोठं योगदान दिलं आहे. आम्ही सगळ्या मराठी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करतो. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यात, भारताच्या स्वातंत्र्यात मोठं योगदान आहे.'