Shashikant Warishe murder case: “उदय सामंत म्हणाले की, प्लान करून खून करण्यात आला, तर प्लान एकट्याचा नसतो. आणखी कोण कोण यात आहेत. घटनास्थळावरील तीनही सीसीटीव्ही एकाच वेळी बंद कसे”, असे प्रश्न करत खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले. या प्रकरणाची निष्पक्षपणे आणि स्वतंत्रपणे तपास होईल, याबद्दल शंकाच आहे, असंही राऊत म्हणाले. (Sanjay Raut Raised questions over Shashikant Warishe murder case)
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या गावाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी भेट दिली. कुटुंबीयांचं सांत्वन केल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले, “बातमी देणारा कोकणातील पत्रकाराला अशा प्रकारे मारण्यात आलं, हे आपल्या सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. बाळशास्त्री जांभेकर कोकणातील आहेत. त्याच भूमीत एका पत्रकाराला भूमिका पटत नसल्यानं गाडीखाली चिरडून मारला. पूर्वी असं बिहारमध्ये घडायच्या आणि असं घडलं की, तुमचा बिहार झालाय का? आता बिहार म्हटलं जातंय की, तुमचा महाराष्ट्र झालाय का?”
Crime : सकाळी बातमी आली, दुपारी गाडीने उडवलं; हा पत्रकाराचा खूनच! कोणी केला आरोप?
“कोकणातील काही प्रकल्पांबद्दल जनमत वेगळं असू शकतं. काही लोक समर्थनार्थ काही विरोधात. ही लोकशाही आहे. पण, शेवटी काय हवंय, नको हे लोक ठरतात. पण लोकांची भूमिका मांडणारा एक पत्रकार मारला जातो. त्याच्यामागे कोण आहे, याचा तपास करण्याची मागणी प्रत्येकाने केली आहे”, असं राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.
“हा तपास स्वतंत्रपणे, निष्पक्षपातीपणे होईल का याबद्दल आजही शंका आहे. मी मुख्यमंत्र्यांना… उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. माझ्या तोंडात त्यांचं नाव मुख्यमंत्री म्हणूनच येतंय. काय नियतीचे संकेत आहेत माहिती नाही”, असं मिश्कील भाष्य राऊतांनी केलं.
वारिशे हत्या प्रकरणी बोलताना राऊत म्हणाले, “फडणवीसांसमोर काही बाबी मांडल्या. यामागे राजकीय षडयंत्र आहे. ज्या रिफायनरीच्या विरोधात शशिकांत हा लिहित होता, बोलत होता त्यातून ही हत्या झाली आहे. बाहेरून येऊन ज्यांनी जमिनी खरेदी केल्या. त्यांचे संबंध हत्येत आहेत का हा तपासाचा विषय आहे.”
तीन सीसीटीव्ही एकाचवेळी बंद कसे? राऊतांचा सवाल
“जो संशयित मारेकरी तुरुंगात आहे, त्याचे लागेबांधे नक्की कोणत्या सत्ताधाऱ्यांशी होते. हा तपासाचा विषय आहे. 11 अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन केली. 11 अधिकारी कोण आहेत. देशात कोणतीही यंत्रणा स्वतंत्र नाही. अशात या खूनाचा तपास होईल का?”, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.
“शशिकांत वारिशे यांच्या खूनाची जागा पेट्रोलपंप आहे, तेथील तिनही सीसीटीव्ही एकाच वेळी बंद कसे? त्या भागात तीन ते चार सीसीटीव्ही होते. एकाच वेळी ते बंद पडले. पेट्रोलपंपावर 8 कर्मचारी होते. त्यांच्यावर जबाब देऊ नये म्हणून दबाव आणला जात आहे”, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
उदय सामंतांच्या विधानावर राऊतांचं बोट
“जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणतात की, प्लान करून खून केला. प्लान एकट्याचा नसतो. मग आणखी कोण कोण आहे. पेट्रोलपंपावर पोहोचला, निघाला… यात सहभागी होते, त्यांच्यापर्यंत पोलीस का पोहोचले नाहीत”, अशी शंका राऊतांनी उपस्थित केली.
“अटकेत असलेला आंबेरकर जमिनीचा दलाल होता. त्याने जागांचे व्यवहार केलेले आहेत. त्याच्यात अनेकांचे बेनामी व्यवहार आहेत. राजकीय लोकांचे. त्यातून ही हत्या झालीये का? वारिशेची हत्या होण्याआधी ज्या चार लोकांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, त्यात पहिला क्रमांक होता, नरेंद्र जोशींचा. जोशींवर कोर्टाच्या आवारात हल्ला झाला होता आणि तो आंबेरकरने केला होता”, असं मुद्दा राऊतांनी यावेळी उपस्थित केला.
एकनाथ शिंदेंना संजय राऊतांचा टोला…
“सत्यजित चव्हाण, नरेंद्र जोशी, अमोल बोळे, नितीन जठार, दिपक जोशी, सतीश बाणे हे रिफायनरी विरोधी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यातील काही लोकांना धमक्या आल्या होत्या. त्यांना तडीपारीच्या नोटिसा आल्या. यात पहिला बळी शशिकांत वारिशेचा गेला. मुख्यमंत्री गेल्या दोन दिवसांपासून येऊन जाऊन कोकणात आहे. त्यांनी हा विचार केला पाहिजे”, असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.