राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी चिंताजनक वाढ पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत, नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. येत्या ८ ते १० दिवसांमध्ये लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. लोकांनी बाहेर पडताना मास्क लावावा, गर्दी करणं टाळालं, सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवावं, सॅनिटायजरचा वापर करावा असं आवाहन ठाकरे यांनी केलं. परंतू मुख्यमंत्र्यांच्या याच आवाहनाला उप-मुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत हरताळ फासला जात असल्याचं चित्र पहायला मिळालं.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सोमवारी उप-विभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गर्दी झालेली पहायला मिळाली. या गर्दीचं नियोजन करण्यासाठी कोणतीही व्यवस्था यावेळी उपलब्ध नव्हती. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या इच्छुकांनी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग नावाची कोणतीही गोष्ट या कार्यालयात पहायला मिळाली नाही. त्यामुळे खुद्द उप-मुख्यमंत्र्यांच्या गावातच जर सरकारच्या नियमांचं पालन केलं जात नसल्याचं विदारक चित्र राज्यातील जनतेसमोर आलं आहे.
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर शासकीय अधिकारी कारवाई करत आहेत. रस्त्यावर फिरत असताना मास्क न घालणारी लोकं, लग्न समारंभात गर्दी जमवून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात सरकारी कार्यालयांनाच अपयश येत असल्यामुळे सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अवश्य वाचा – ‘पुढील 8 ते 10 दिवस मी वाट पाहणार, नंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार’