Hotel Bhagyashree: 'नाद करती काय..' हॉटेल भाग्यश्री आता भलत्याच गोष्टीमुळे चर्चेत!
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी सोशल मीडियाच्या चतुर वापराने महाराष्ट्रात आपलं नाव पोहोचवलं, पण मागील दिवसांपासून हे हॉटेल आता वादविवादमुळे चर्चेत आलं आहे.
ADVERTISEMENT

तुळजापूर: तुळजापूरमधील हॉटेल भाग्यश्री हे “नाद करती काय, यावचं लागतंय” या हटके टॅगलाइनमुळे अवघ्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत आलं आहे. हॉटेल भाग्यश्री आणि त्याचे मालक नागेश मडके यांनी सोशल मीडियावर आणि महाराष्ट्रभर एकच धुमाकूळ घातलाय. फक्त 250 रुपयांमध्ये अनलिमिटेड मटण थाळी, झणझणीत चव, आणि मालकाची अनोखी मार्केटिंग स्टाईल यामुळे हे हॉटेल चर्चेचा विषय बनलं आहे. पण याबरोबरच वादविवाद, तोडफोड आणि हाणामारीच्या घटनांमुळेही हॉटेल भाग्यश्री सतत चर्चेत आहे.
हॉटेल भाग्यश्रीची यशोगाथा
हॉटेल भाग्यश्री तुळजापूर-धाराशिव रोडवर, बुरी गावाजवळ, पेट्रोल पंपासमोर आहे. नागेश मडके यांनी हे हॉटेल सुरू केलं तेव्हा कुणालाही वाटलं नव्हतं की एका साध्या धाब्याचं रूपांतर महाराष्ट्रातील सर्वात चर्चित हॉटेलमध्ये होईल. हॉटेलची खासियत आहे त्यांची अनलिमिटेड मटण थाळी जी फक्त 250 रुपयांमध्ये मिळते. यात मटण, रस्सा आणि झणझणीत चव यांचा समावेश आहे. याचबरोबर, स्थानिक उस्मानाबादी बोकड मटणाची चव ही या हॉटेलची खरी ओळख आहे. उस्मानाबादी बोकड हे देशभर प्रसिद्ध आहे, आणि याच मटणामुळे हॉटेल भाग्यश्रीला ग्राहकांची गर्दी वाढत गेली.
हे ही वाचा>> ताट, लाटणं, उलाथणं घेऊन बदडलं, तरूणाला घेरून चोपलं...हॉटेल भाग्यश्रीवर पुन्हा काय राडा?
नागेश मडके यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आपल्या हॉटेलचं मार्केटिंग केलं. त्यांच्या "नाद करती काय? यायलाच लागतंय!" या डायलॉगने इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो लोकांचं लक्ष वेधलं. त्यांच्या रील्समध्ये ते हॉटेल बंद असण्याची कारणं सांगतात - कधी वाढदिवस, कधी तब्येत, तर कधी बाहेरगावी जाणं. या रील्समुळे त्यांना काही लोकांनी ट्रोल केलं, पण याच रील्सनी हॉटेलला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली.
फॉर्च्युनर गिफ्ट आणि व्हायरल स्टोरी
हॉटेलच्या यशाचं शिखर तेव्हा गाठलं, जेव्हा नागेश मडके यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त 45 लाखांची टोयोटा फॉर्च्युनर गाडी गिफ्ट केली. "हत्ती घेतला हत्ती!" असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या गाडीच्या खरेदीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला. नागेश यांनी सांगितलं की, त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्या पत्नीच्या साथीला आहे, आणि म्हणूनच त्यांनी तिला ही भेट दिली.










