विधानसभा, जिल्हा बँक आणि नगरपंचायत, साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या पराभवाची हॅटट्रीक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. सर्वात आधी विधानसभेत पराभव स्विकारावा लागल्यानंतर जिल्हा बँकेतही शशिकांत शिंदेचा पराभव झाला. यानंतर कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीतही शिवसेना आमदार महेश शिंदेंच्या पॅनलने राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा पराभव करत सत्ता स्थापन केली आहे.

ADVERTISEMENT

आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनलने १७ पैकी १३ जागा जिंकत नगर पंचायतीवर आपली सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत शशिकांत शिंदेंच्या पॅनलला या निवडणुकीत फक्त ४ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना आमदार महेश शिंदेंनीच शशिकांत शिंदेना पराभवाची धुळ चारली होती. यानंतर सातारा जिल्हा आणि जावळी तालुक्यातील राजकारणावर आपली पकड पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी शशिकांत शिंदेंकडून प्रयत्न सुरु होते. परंतू विधानसभा आणि जिल्हा बँकेपाठोपाठ नगरपंचायत निवडणुकीतही शशिकांत शिंदेंना धोबीपछाड देण्यात त्यांच्या विरोधकांना यश आलं आहे.

परिवर्तन पॅनलच्या विजयानंतर विजयी उमेदवारांनी आमदार महेश शिंदेंना खांद्यावर उचलून घेत मिरवणुक काढली. ढोल-ताशे आणि गुलालाची उधळण करत यावेळी महेश शिंदे समर्थकांनी जल्लोष साजरा केला. विजयानंतर आमदार महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंना टोला लगावला. “शशिकांत शिंदे हे राज्यातलं मोठं नेतृत्व आहे, त्यांनी राज्यात थांबणं गरजेचं आहे. हे नेतृत्व टेस्ट ट्यूब बेबीसारखं आहे. मुंबईत राहून मोठमोठ्या गप्पा मारायच्या. ताजमहाल बांधतो, विमानतळ बांधतो…याला जनता आता भुलणारी नाहीये. कोरेगावात यापुढे स्थानिक उमेदवारच विजयी होतील. गेल्या १० वर्षांमध्ये भ्रष्ट सत्तेला उलथवण्याचं काम आम्ही केलं आहे.”

हे वाचलं का?

राष्ट्रवादीने जिल्हा बँकेत आमच्याशी गद्दारी केली आणि आम्हाला बाजूला काढलं. यानंतर आम्ही कोरेगाव शहरात आम्ही विधानसभेप्रमाणे महायुतीत लढलो. हे सगळं श्रेय महायुतीचंच आहे, अशी प्रतिक्रीया महेश शिंदेनी दिली. स्थानिक विजय उमेदवारांनीही यावेळी बोलत असताना शशिकांत शिंदेंना टोला लगावत त्यांनी आता कोरेगावातून आपलं बस्तान हलवून जावळी किंवा मुंबई-नवी मुंबईत रहावं. इथल्या जनतेने दिलेल्या कौलातून त्यांना हा अंदाज आलाच असेल असंही विजयी उमेदवार म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT