ताजमहालाच्या बंद खोल्यांमध्ये काय? विचारणारे तुम्ही कोण? हायकोर्टाने फेटाळली याचिका
ताजमहालाच्या २२ खोल्या उघडण्याची संमती द्या अशी मागणी करणारी याचिका अलहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ हायकोर्टाने फेटाळली आहे. सुनावणी दरम्यान फॅक्ट फाईंडिंग कमिटी स्थापण्याच्या कमिटीवरही कोर्टाने प्रश्न उपस्थित केला आहे. याचिकाकर्त्याला ही कमिटी तयार करून काय साधायचं आहे असाही प्रश्न कोर्टाने विचारला आहे. तसंच ज्या मुद्द्यांवर याचिका दाखल करण्यात आली आहे ते न्यायालयीन आधार असलेले मुद्दे नाहीत […]
ADVERTISEMENT

ताजमहालाच्या २२ खोल्या उघडण्याची संमती द्या अशी मागणी करणारी याचिका अलहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ हायकोर्टाने फेटाळली आहे. सुनावणी दरम्यान फॅक्ट फाईंडिंग कमिटी स्थापण्याच्या कमिटीवरही कोर्टाने प्रश्न उपस्थित केला आहे. याचिकाकर्त्याला ही कमिटी तयार करून काय साधायचं आहे असाही प्रश्न कोर्टाने विचारला आहे. तसंच ज्या मुद्द्यांवर याचिका दाखल करण्यात आली आहे ते न्यायालयीन आधार असलेले मुद्दे नाहीत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
जस्टीस डी. के. उपाध्याय आणि जस्टिस सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे. आम्ही तुमच्या दाव्यांशी सहमत नाही. ही याचिका न्याय सुसंगत नाही, जर ताजमहालातल्या खोल्या उघडायच्या असतील तर त्यासाठी ऐतिहासिक शोध घेण्याची एक योग्य प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेप्रमाणेच गेलं पाहिजे. या प्रक्रियेने सत्य शोधणं हे इतिहासकारांचं काम आहे. आम्ही अशा प्रकारच्या याचिकेवर विचार करू शकत नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे.
“ताजमहाल कुणी बांधला? आधी वाचून या” २२ खोल्या उघडण्याच्या याचिकेवरून कोर्टाने झापलं
जस्टिस डी. के उपाध्याय आणि जस्टिस सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू होती. कोर्टाने भाजपच्या याचिकाकर्त्याला हे विचारलं आहे की ताजमहाल हा शहाजहाँन ने बांधला नाही का? ताजमहाल कुणी बनवला? ताजमहाल बांधून किती वर्षे झाली हे सांगायला आम्ही इथे आलो आहोत का? तुम्हाला जो विषय माहित नाही त्यावर संशोधन करा, वाचन करा. MA करा, PHD करा. जर एखादी संस्था तुम्हाला रिसर्च करण्यापासून अडवत असेल तर आमच्याकडे या असंही हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे.
ताजमहाल पांढऱ्या संगमरवरपासून बनवण्यात आला आहे. ताजमहाल हे भारतातील उत्तर प्रदेश मधील आग्रा ह्या शहरात यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे. ताजमहाल म्हणजे सफेद रंगाची उत्कृष्ट आणि कलाकृती असलेली इमारत आहे. ही इमारत मोगल बादशाह शहाजहानने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ (1632ते 1653 दरम्यान) बांधली होती. मुमताज ही शहाजहानला त्याच्या इतर पत्नींपेक्षा प्रिय होती. आपल्या 14 व्या पुत्राला जन्म देताना तिने देहत्यागला आणि तिच्या आठवणीत ताजमहाल उभे राहिले. या इमारतीच्या बांधकामाला पूर्ण होण्यास एकूण 21 वर्षांचा कालावधी लागला. ताज महाल चे काम करण्यासाठी एकूण 20 हजार कामगार खर्ची पडले होते असंही इतिहासात सांगितलं जातं.