मुलींच्या लग्नाचं वय 18 नव्हे तर 21 वर्षे, प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुलींच्या लग्नासाठी सध्या किमान 18 वर्षे वयाची अट आहे. मात्र यामध्ये लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. कारण हे वय 21 करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर केलं जाण्याची आणि त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

विधेयकाला मंजुरी मिळाली तर मुलींच्या लग्नाचं वय किमान 21 असावं असा कायदाच अस्तित्वात येईल. सध्या मुलींच्या लग्नाचं वय 18 वर्षे आहे तर मुलाच्या लग्नासाठीचं किमान वय 21 आहे.

हे वाचलं का?

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विधेयक संसदेत मांडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केलं होतं त्यामधून त्यांनी हे विधेयक आणणार असल्याचे संकेत दिले होते. यासाठी आता केंद्र सरकार सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करणार आहे.

ADVERTISEMENT

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायद्यात बदल करण्याच्या दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या वर्षी या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सनं आपल्या अहवालात लग्नाचं किमान वय 18 वरून 21 वर्षे करण्याची शिफारस केली होती. माजी खासदार जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. टास्क फोर्सनं आपल्या अहवालात आई बनण्याची वयोमर्यादा आणि महिलांशी संबंधित इतर समस्यांबाबतही आपल्या शिफारसींचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये मुला-मुलींच्या लग्नाचं किमान वय 18 वर्षे आहे. भारतात 1929 च्या शारदा कायद्याच्या अंतर्गत मुलांसाठी लग्नाचं किमान वय 18 वर्षे तर मुलींच्या लग्नाचं किमान वय 14 निश्चित करण्यात आलं होतं. 1978 मध्ये या कायद्यात दुरूस्ती करण्यात आली. ज्यानुसार मुलांचं लग्नासाठीचं किमान वय 21 वर्षे तर मुलींच्या लग्नाचं वय 18 वर्षे असं करण्यात आलं. 2006 मध्ये आलेल्या बालविवाह प्रतिबंध कायद्यानेही ही वयोमर्यादा कायम ठेवत काही अधिक तरतुदींचा समावेश करत शारदा कायद्याची जागा घेतली.

लग्न आहे की लॉकडाऊन?; विकी-करतरिनाच्या लग्नातील नियम पाहून तुम्हीही चक्रावून जाल

युनिसेफ अर्थात United Nations International Children’s Fund यांच्या अहवालानुसार जगभरात बालविवाहाचं प्रमाण कमी होत आहे. गेल्या दहा वर्षात आशिया खंडात बालविवाह कमी झाले आहेत असं या अहवालात म्हटलं आहे. युनिसेफच्या मते 18 वर्षांपेक्षा कमी वयात लग्न करणं हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे. यामुळे मुलींचं शिक्षण कमी राहणं, घरगुती हिंसाचाराला बळी पडणं या सगळ्या घटना घडतात.

तरुणींच्या लग्नाचे वय सद्यस्थितीत 18 आहे. मात्र ते बदलून 21 करण्याचा सरकारचा विचार आहे. तरुण आणि तरुणींसाठी लग्नाचं किमान वय एकसमान म्हणजेच 21 वर्षे असावे, असा विचार आहे. त्यासाठी याबाबत सुधारणांचे विधेयक कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात येण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ‘मुलींना कुपोषणापासून वाचवायचे असेल तर त्यांचे लग्न योग्य वेळी होणे गरजेचे आहे. सध्या पुरुषांसाठी विवाहाचे किमान वय 21 आणि महिलांचे 18 वर्षे आहे. आता सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करून त्याला एक स्वरूप देणार आहे.’

नीती आयोगाने जया जेटली यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सने याची शिफारस केली होती. व्ही. के. पॉल हे देखील या टास्क फोर्सचे सदस्य होते. या व्यतिरिक्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव, महिला आणि बाल विकास, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण आणि साक्षरता अभियान आणि न्याय आणि कायदा मंत्रालयाचे विधेयक विभाग टास्क फोर्सचे सदस्य होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT