महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये हेलिपॅड होणार : CM शिंदेंचे प्रशासनाला निर्देश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये हेलिपॅड करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे, ज्यामुळे भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन सुरू करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील विमानतळे आणि काही ठिकाणी असलेल्या धावपट्ट्यांविषयी चर्चा करण्यात आली.

राज्यात एकूण १५ विमानतळ असून २८ धावपट्ट्या (एअर स्ट्रीप्स) आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर होत असून शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे पाठविण्यात आल्याचे यावेळी दीपक कपूर यांनी सांगितले.

हे वाचलं का?

तर विमानतळांच्या विस्तारीकरणासोबतच राज्यात असलेल्या धावपट्ट्यांचे देखील विस्तारीकरण आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसंच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड तयार करण्यात यावे, त्यासाठी जागांची निश्चीत करावी. गंभीर रूग्णाला एअर लिफ्ट करण्याकरिता, वैद्यकीय मदतीसाठी देखील हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

शिवाय पर्यटनदृष्ट्या गोसीखुर्द, कोयना, कोकण समुद्र किनारपट्टी याभागात सी – प्लेन सुरू करण्याबाबत चाचपणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी अमरावती, शिर्डी, गोंदिया, रत्नागिरी, सोलापूर येथील विमानतळांबाबतही चर्चा करण्यात आली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT