उल्कापिंड की रॉकेट?; चंद्रपुरात सापडलेले यंत्राचे अवशेष कशाचे? ते कुठून आले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विकास राजूरकर, चंद्रपूर/सुरेंद्र रामटेके, वर्धा

ADVERTISEMENT

विदर्भातील काही जिल्ह्यात शनिवारी रात्री अचानक आकाशात आगीचे गोळे पृथ्वीच्या दिशेनं येताना दिसले. वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यातील अनेक भागातील नागरिकांना ही घटना बघायला मिळाली. या घटनेचे व्हिडीओ काही वेळातच सर्वत्र व्हायरल झाले. त्यामुळे उल्कापिंड असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, नंतर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी मोठी वर्तुळाकार रिंग आणि गोळे आणि इतर सामान असं अवशेष सापडलं. या सामानावरून हे रॉकेटचं साहित्य असल्याची माहिती समोर आली.

चंद्रपूर आणि वर्धासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री उडत्या तबकड्या सदृश्य वस्तू आकाशात दिसून आल्या. याचा वेग प्रचंड असल्याने उल्कापिंड असावे, अशी शक्यताही व्यक्त केली जात होती. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावामध्ये काही निखळलेले भाग पडले. ८ ते १० इंच रुंदी असलेल्या गोलाकार रिंग सापडली.

हे वाचलं का?

या रिंगाचं वजन जवळपास ४० किलो असून, अनेक धातूंचा वापर करून ही रिंग तयार करण्यात आलेली आहे. सुरूवातीला ही रिंग सापडल्यानंतर या परिसरात इतर ठिकाणी इतर वस्तूही आढळून आल्या. गावकऱ्यांना चेंडूच्या आकारातील लोखंडी गोळा मिळाला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

वर्ध्यातही मिळाले अवशेष

चंद्रपूरप्रमाणेच रविवारी सकाळी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा आणि धामणगाव या दोन ठिकाणी अवकाशातून पडलेल्या यंत्रांचे सुटे भाग मिळाले. नितीन सोरते हे सकाळी शेतात गेले होते. त्यावेळी त्यांना एक सिलेंडरसारखी आकृती असणारी काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेली वस्तू दिसली. तिचं वजन अंदाजे ३ ते ४ किलो आहे.

सोरते लागलीच याची माहिती समुद्रपूर पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक राम खोत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन हे अवशेष ताब्यात घेतलं. धामणगाव येथील शेतकरी भाऊराव ननावरे यांच्या गावाशेजारच्या शेतामध्येही अशाच स्वरूपाचे अवशेष सापडले. या प्रकरणाची चौकशी आता जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे.

ईलेक्ट्रॉन रॉकेटचे सुटे भाग असल्याचा दावा

दरम्यान, शनिवारी आकाशातून जमिनीच्या दिशेनं येणारे आगीचे गोळे आणि त्यानंतर आढळून आलेल्या या अवशेषांबद्दल चंद्रपूर येथील स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी माहिती दिली. शनिवारी सायंकाळी ६.११ वाजता न्युझीलंडमधील माहिया बेटावरून रॉकेट लॅब कंपनीने ईलेक्ट्ऱ़ॉन रॉकेट लॉन्च केलं होतं. या रॉकेटमध्ये ब्लॅकस्काय इन कॉर्पोरेशनचं सॅटेलाईट लावलेलं होतं. जे पृथ्वीच्या सर्वात खालच्या कक्षेत सोडलेलं होतं म्हणजे ४३० किमी उंचीवर, असं चोपणे यांनी सांगितलं.

त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही रिंग रॉकेटचाच भाग आहे. त्याचबरोबर जे गोलाकार यंत्र सापडले आहेत, ते बुस्टरचा भाग असू शकतात. पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर हे भाग जळत पृथ्वीच्या दिशेने आले आणि चंद्रपूरमध्ये कोसळले, असं ते म्हणाले.

औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनीही चोपणे यांच्याप्रमाणेच माहिती दिली आहे. न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्यानं आज सायंकाळी उत्तर-पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन रॉकेटचे बुस्टरचे असावेत. आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्‍या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या वर्षी चीनचं एक अनियंत्रित झालेलं रॉकेट न्युझीलंडजवळच्या समु्द्रात कोसळलं होतं. या घटनेची आंतरराष्ट्रीय स्तरावर बरीच चर्चा आणि विरोधही झाला होता. चंद्रपूरमध्ये आढळून आलेले यंत्र ईलेक्ट्रॉन रॉकेटचेच सुटे भाग आहेत की नाही, याबद्दल अजून खात्रीशीर माहिती समोर यायची आहे. मात्र, अशा स्वरुपाचे रॉकेट आणि सॅटेलाईटचे सुटे भाग कोसळण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT