उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का?, आदित्य ठाकरेंनी नाटकं बंद करावीत; सोमय्यांचा चढला पारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांकडून आरोपांच्या चकमकी झडत असून, त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा पारा आज चढल्याचं दिसून आलं. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देतानाच सोमय्यांनी आदित्य ठाकरेंनाही सवाल केला.

ADVERTISEMENT

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी साडे तीन लोकांना तुरुंगात पाठवणार असल्याचं विधान केलं आहे. त्यावरून किरीट सोमय्या यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत टीका केली. “कुणीतरी सकाळी उठून पाच पानी पत्र लिहिणार की ईडीने त्या डेकोरेटरला बोलावलं होतं. ज्याने माझ्या मुलीच्या लग्नाचं काम केलं, त्याच्या डोक्याला बंदूक लावली. ज्याच्या डोक्याला बंदूक लावली, त्याला त्यांनी प्रस्तुत केलं पाहिजे.”

“ताबडतोब पोलीस ठाण्यात तक्रार केली पाहिजे. पत्र लिहून पाच दिवस झाले. विषय डायव्हर्ट करण्यासाठी हे केलं जात आहे. कोविड घोटाळा इतका मोठा झालेला आहे. त्यात सगळे फसले आहेत, अडकले आहेत. जनतेला उत्तर देऊ शकत नाहीत म्हणून साडे तीन लोक, दीड लोक आणि एक लोक… अरे बाबा मी घोटाळा केला आहे. काही गुन्हा केला आहे, तर करा ना माझ्यावर कारवाई. वाट कसली पाहताय? साडे तीन लोकांना अटक करण्यासाठी उद्धव ठाकरे काय मुहूर्त शोधत होते काय?”, असा सवाल सोमय्यांनी केला.

हे वाचलं का?

“मला विषय डायव्हर्ट करायचा नाही. कोविड काळात ज्या पद्धतीने माफिया सेनेनं कमाई केली आणि लोकांच्या जिवाशी खेळ केला; त्याला जनता माफ करणार नाही आणि मी सोडणार नाही. राऊतांनी किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी, माझ्या प्रश्नांची उत्तरं अजून दिली नाहीत. लाईफलाईन हेल्थ केअरला तुम्ही परवानगी दिली. मी नाही दिली. त्याला ब्लॅकलिस्ट उद्धव ठाकरेंनी केलं, मी केलं नाही. कंत्राट पण मुंबई महापालिका अर्थात उद्धव ठाकरेंनी दिलं. 15 दिवसानंतर ही कंपनी बदमाश आहे, त्यांच्याकडे काही नाही. त्यांनी फसवणूक केली. तुम्हाला मी दिलेलं आहे. त्याचा सविस्तर अहवाल आहे. म्हणजे तुम्ही पैशासाठी हजारो कोविड रुग्णांच्या जिवाशी खेळलात. याचं उत्तर ते देत नाहीत.”

“ब्लॅकलिस्ट केल्यानंतर त्यांना कंत्राट मिळालं कसं? आणि ब्लॅकलिस्ट 15 दिवसांत झाली, त्याला तुम्ही कंत्राट दिलं कसं? मी पुणे महापालिका, पीएमआरडीए, मुंबई महापालिका सगळ्या ठिकाणी जाऊन आलो आहे. माहिती अधिकाराखाली सगळी कागदपत्रं माझ्याकडे आहेत. या कंपनीचा अर्जच नाही. ही कंपनी पार्टनरशिप अॅक्टमध्ये रजिस्टरच केलेली नाही, मग जी कंपनी अस्तित्वात नाही. ज्या कंपनीनं रजिस्ट्रेशन केलं नाही. ज्या कंपनीकडे अशा प्रकारची सिस्टीम नाही. त्या कंपनीला तुम्ही कोविड सेंटरचं कंत्राट कसं दिलं? याचं उत्तर उद्धव ठाकरेंना द्यावं लागेल. मग भाजपच्या साडे तीन लोकांना अटक करा किंवा साडे तीनशे लोकांना”, असं सोमय्या म्हणाले.

ADVERTISEMENT

“आदित्य ठाकरेंना सांगा नाटकं बंद करा. उद्धव ठाकरे यांनी कंत्राट दिलं आहे. त्याचं उत्तर आदित्य ठाकरे का देत नाहीत? ब्लॅकलिस्ट त्यांनी केली ना? मग आदित्य ठाकरेंच्या वरळीचं कंत्राट त्यांना कसं मिळालं? ही सगळी शेरो-शायरी आहे ना, ती लोकांच्या जिवाशी खेळण्यासाठी नाही. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे का कारवाई करत नाहीत?”, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT