Video : मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ बंगल्यावर हातोडा; सोमय्या म्हणाले ‘करून दाखवलं’
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील अलिशान बंगल्यावर हातोडा चालला. बंगल्याच्या बांधकामाबद्दल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बंगला पाडण्यात आला. या कारवाईनंतर ‘करुन दाखवलं’ असं म्हणत सोमय्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीमधील मुरुड येथे समुद्र किनारी अलिशान बंगला बांधला. […]
ADVERTISEMENT
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील अलिशान बंगल्यावर हातोडा चालला. बंगल्याच्या बांधकामाबद्दल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बंगला पाडण्यात आला. या कारवाईनंतर ‘करुन दाखवलं’ असं म्हणत सोमय्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
ADVERTISEMENT
मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीमधील मुरुड येथे समुद्र किनारी अलिशान बंगला बांधला. या बंगल्याच्या बांधकामाप्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी काही प्रश्न उपस्थित करत कारवाई करण्याची मागणी केली होती. सोमय्यांनी तशी तक्रार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे केली होती.
या तक्रारीनंतर रविवारी या बंगल्यावर जेसीबी चालवण्यात आला आहे. सकाळपासून बंगला पाडण्याचं काम सुरू असून, किरीट सोमय्या यांनी एक व्हिडीओ ट्विट करून याची माहिती दिली. जेसीबीच्या मदतीने हा बंगला तोडण्यात आला. बंगल्याच्या भिंती पाडण्यात आल्या असून, आता या कारवाईची पाहणी करण्यासाठीही सोमय्या दापोलीत जाणार आहेत.
हे वाचलं का?
करुन दाखवलं; बंगला तोंडल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया
ADVERTISEMENT
बंगल्यावर हातोडा चालवण्यात आल्यानंतर किरीट सोमय्यांनी पाडापाडीचा व्हिडीओ ट्विट केला. त्याचबरोबर आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली. ‘करून दाखविले! मिलिंद नार्वेकरचा बंगला तोडला. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले. पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा. उद्या मी दापोलीला जावून तोडकामाची पाहणी करणार’, असं सोमय्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
करून दाखविले !!!!
मिलींद नार्वेकर चा बंगलो तोडला.
मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले
पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा
उद्या मी दापोली ला जावून तोडकामाची पाहणी करणार pic.twitter.com/azpHTiFHlQ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 22, 2021
सोमय्यांचे आरोप काय?
नार्वेकर यांच्या या बंगल्याप्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. ‘मिलिंद नार्वेकर यांनी मुरुड गावात समुद्र किनारी ७२ गुंठा जागा घेतली, पण कोणतीही परवानगी न घेता दुमजली बंगल्याचं काम सुरू केलं. झाडांची कत्तल आणि मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जात आहे. या बंगल्याच्या बांधकामासाठी सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलं आहे’, असा आरोप सोमय्यांनी केला होता.
‘राज्यात कोरोनाचं संकट असताना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर व मंत्री अनिल परब हे लॉकडाउनच्या काळात रिसॉर्ट व बंगले बांधत आहेत. सरकार दोघांनाही पाठिशी घालत आहेत’, असंही सोमय्या यांनी आरोप करताना म्हटलं होतं.
अनिल परब यांच्या रिसॉर्टचं प्रकरण काय?
नार्वेकर यांचा बंगला तोडण्यात आला आहे. आता पुढचा नंबर शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असल्याचं सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘अनिल परब यांनी दापोलीत १० कोटींचं बेकायदेशीर रिसॉर्ट बांधलं आहे’, असा आरोप सोमय्यांनी केलेला आहे. याची माहिती तत्कालिन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना दिलेली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल विभागाकडे तक्रार केलेली असल्याचंही सोमय्यांनी म्हटलेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT