अमित शाह आणि शरद पवार यांची कथित भेट आणि काही अनुत्तरीत प्रश्न
अमित शाह आणि शरद पवार यांची कथित भेट सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही भेट झालीच हे छातीठोकपणे सांगणारे महाराष्ट्रात एकच नेते आहेत, त्यांचं नाव आहे चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एकटे असे नेते आहे ज्यांनी रेकॉर्डवर सांगितलं आहे की होय अमित शाह आणि शरद पवार यांची भेट २६ मार्चला झाली. गौतम अदानी […]
ADVERTISEMENT

अमित शाह आणि शरद पवार यांची कथित भेट सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही भेट झालीच हे छातीठोकपणे सांगणारे महाराष्ट्रात एकच नेते आहेत, त्यांचं नाव आहे चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एकटे असे नेते आहे ज्यांनी रेकॉर्डवर सांगितलं आहे की होय अमित शाह आणि शरद पवार यांची भेट २६ मार्चला झाली. गौतम अदानी यांची उपस्थितीही या भेटीदरम्यान होती असं काही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलेलं नाही. पण चंद्रकांत पाटील वगळले तर सगळे नेते भेट झाल्याचंही सांगत नाहीत आणि नाकारतही नाहीत अशी स्थिती आहे.
अमित शाह-शरद पवार भेटीबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
या कथित भेटीबाबत अमित शाह यांना विचारलं असता, त्यांनीही सूचक वक्तव्य केलं. सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगायच्या नसतात असं अमित शाह यांनी सांगितलं. तर शरद पवारांनी मात्र या कथित भेटीबद्दल काहीही वक्तव्य केलं नाही, हा लेख लिहिण्याच्या क्षणी परिस्थिती अशी आहे की शरद पवार यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि त्यांना पित्ताशयाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया बुधवारी केली जाणार आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांनीही या कथित बैठकीबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही. मात्र त्यांच्या निकवर्तीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे की प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार हे अमहादाबादमध्ये होते. त्यांनी २६ मार्चला अदानी यांची भेट घेतली होती असं सांगितलं जातं आहे. मात्र अमित शाह आणि शरद पवार यांच्यात बैठक, भेट झाली का? याबाबत अधिकृतरित्या प्रफुल्ल पटेल यांनीही काहीही वक्तव्य केलं नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामार्फत मात्र राष्ट्रवादीने स्पष्टपणे सांगितलं आहे की अमित शाह आणि शरद पवार यांच्यात भेट झाली नाही. असं सगळं असूनही अनेकांना हा विश्वास वाटतो आहे की अमित शाह, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट झाली आहे. पण जर असं मान्य केलं की अशी भेट झाली तर त्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात?
राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे लोक एकमेकांना कधीही भेटत नाहीत. एकमेकांच्या राजकारणावर खासगीत भाष्य करत नाहीत हा विचार करणं आणि त्या विचारांवर विश्वास ठेवणं हे चुकीचं ठरेल. कारण मुरलेले मुरब्बी राजकारणी हे कायमच सगळे पर्याय खुले ठेवतात. शरद पवार यांच्या राजकारणाची पद्धत पाहिली तर लक्षात येतं की राजकारणात कधीही कुणाची दारं बंद होत नाहीत असा त्यांना ठाम विश्वास आहे. राजकारणात कुणीही कुणाचं कायमचं शत्रू नसतं या धारणेवर पवार यांचा विश्वास आहे. रामदास आठवले अहमद पटेल आणि बाळासाहेब ठाकरे ते अटलबिहारी वाजपेयी ते नरेंद्र मोदी यांच्याशी शऱद पवार यांचे चांगले संबंध होते, आहेत. त्यामुळे अमित शाह आणि शरद पवार यांच्यात जर बैठक झाली असेल तर त्यात आश्चर्याचा धक्का बसण्यासारखं काहीही नाही.
शरद पवार, प्रफुल पटेल अहमदाबादमध्ये कोणाला भेटले?
ही भेट का झाली असेल?
अनेकदा अनेक प्रश्नांची उत्तरं ही अनुत्तरीतच राहतात. २०१९ मध्ये शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोनिया गांधींची मनधरणी केली जात होती. त्याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे महाविकास आघाडीचा प्रयोग शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्याशिवाय शक्य नव्हता. मात्र ही बाबही तेवढीच खरी आहे की त्याचवेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपबरोबरही चर्चा सुरू होती. हे तेव्हा बाहेर आलं जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटे शपथविधी झाला. हे सरकार ७२ तासांचं ठरलं यात शंका नाही मात्र यामुळे राष्ट्रवादीला हे मान्य करावं लागलं की भाजपसोबत चर्चा झाली होती.
पहाटेचा शपथविधी झाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तो दिवस उजाडण्याच्या एक दिवस आधीपर्यंत तेच नवाब मलिक हे सांगत होते की आम्ही भाजपसोबत कोणतीही चर्चा नाही. चंद्रकांत पाटील यांनीही त्यावेळी हे सांगितलं नव्हतं की अशी काही चर्चा झाली आहे. या कथित बैठकीची बातमी मात्र एका दिवसातच बाहेर आली. याचा अर्थ आपल्यासोबत असलेल्या पक्षांना गर्भित इशारा देण्यासाठी तर नव्हता ना? की अजूनही काहीही होऊ शकतं. शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. मात्र शरद पवार हा राजीनामा घ्यायला तयार नाहीत त्या पार्श्वभूमीवर जी बातमी समोर आली आहे ती काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षांचं टेन्शन वाढवणारी आहे.
शरद पवार त्यांचा शब्द फिरवतील का?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आठवतोय का? शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा निकालाच्या दिवशीच करून टाकली होती. राजकीय स्थैर्यासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहोत असं पवारांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. त्यांनी अशी भूमिका निकालाच्या दिवशीच घेऊन शिवसेनेची कोंडी करून टाकली होती. ती एकमेव वेळ होती जेव्हा शरद पवारांनी उघडपणे भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला होता. अर्थात यापूर्वी जेव्हा जेव्हा सत्तास्थापनेची वेळ आली आहे तेव्हा शरद पवारांनी काँग्रेस हाच पर्याय निवडला आहे. गांधी परिवारासोबत मतभेद असले तरीही शरद पवारांनी काँग्रेसला सोबत घेऊनच राजकारण केलं आहे. २०१९ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांनी राजकारणाचं केंद्र स्वतःभोवती ठेवलं. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापनेचा वेगळा प्रयोग त्यांनी करून दाखवला. आता त्यांनी वयाच्या ज्या काळात करिअरच्या संधीकाळात जातात त्यावेळेस हा प्रयोग यशस्वी करून पवारांनी स्वतःच्या करिअरला नवी उभारी दिली आहे. अशा परिस्थितीत भाजपसोबत जाऊन आत्तापर्यंत ते जे करू शकतील अशी शंका उपस्थित करणाऱ्यांचा त्यांच्यावरील आक्षेप हे ते आपल्या कृतीने खरा साबित करतील का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
भाजपच्या अनेक दिग्गजांनी असं सांगितलं होतं की २०१९ मध्ये सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर देऊन शरद पवारांनी भाजपला पाठिंबा द्यायचा यावर चर्चा झाली होती. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी नको होते एवढ्या एकाच अटीवर ही बोलणी फिस्कटली. समजा, फडणवीसांना वगळून जर इतर कुणाला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपने घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस त्या सरकारला पाठिंबा देईल. आता हे सगळं घडेल का? हा प्रश्न अजूनही कायम आहे. असं असलं तरीही हा प्रश्न उतरतोच शरद पवार जे करू शकत नाहीत असं वाटतं तसंच ते का करतात? वयाच्या ८१ व्या वर्षीही त्यांच्याबाबत अशी शक्यता का वर्तवली जाते?
जेव्हा एखाद्या राज्यात आघाडीचं सरकार असतं तेव्हा सत्तेतल्या एका भागीदाराला असं वाटलं की त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय, त्याचं हित नाही.. तर तो पक्ष बाजूला होऊ शकतो. म्हणजेच सरकार कोसळू शकतं. सध्याचं राजकारण हे शॉर्ट टर्म आहे. मात्र राजकीय महत्वाकांक्षा ही कशाहीपेक्षा मोठी असते हे वास्तव नाकारता येणार नाही. शॉर्ट टर्म राजकारणात बाजू बदलणं हे काही विशेष नाही. महाविकास आघाडीतले तीन पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं म्हणून सत्तेत आहेत. भाजपला पूर्ण सत्तेपासून बाजूला ठेवण्याचा उद्देश जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत महाविकास आघाडीला धोका नाही. तोपर्यंत अशा कथित बैठकांच्या बातम्या समोर आल्या तरीही परिस्थिती बदलणार नाही. अशा बैठकांची कारणं अनेक असू शकतात.