काँग्रेसने बेगडी निधर्मीवादाचा ‘हिजाब’ दूर करायला हवा; शिवसेनेचे काँग्रेसला डोस
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव स्वीकाराव्या लागलेल्या काँग्रेसमध्ये सध्या चिंतन सुरू आहे. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली, तर काँग्रेसमधील जी २३ नेत्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. काँग्रेसच्या सध्या झालेल्या अवस्थेवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. जी २३ नेत्यांवर निशाणा साधत शिवसेनेनं […]
ADVERTISEMENT

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव स्वीकाराव्या लागलेल्या काँग्रेसमध्ये सध्या चिंतन सुरू आहे. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली, तर काँग्रेसमधील जी २३ नेत्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. काँग्रेसच्या सध्या झालेल्या अवस्थेवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. जी २३ नेत्यांवर निशाणा साधत शिवसेनेनं काँग्रेसला सुधारणांचे डोस दिले आहेत.
काँग्रेसच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना शिवसेनेनं म्हटलं आहे की, “काँग्रेसचे नेतृत्व यापुढेही गांधी परिवारच करत राहील यावर काँग्रेस कार्यसमितीत शिक्कामोर्तब झाले आहे. पाच राज्यांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पंजाबात सत्ता होती ते एकमेव राज्यही काँग्रेसने गमावल्यावर नेहमीप्रमाणे पक्षातील ‘जी २३’ गटाने उचल खाल्ली. कपिल सिब्बल यांनी तर स्पष्टच सांगितले की, ‘काँग्रेसबाहेरील व्यक्तीने आता काँग्रेसचे नेतृत्व करावे.’ सिब्बल हे वकील आहेत व ते आपल्या अशिलाची बाजू चोखपणे मांडत असतात. या विषयात त्यांचा अशील कोण व ते कोणाची बाजू मांडत आहेत?”, अशी शंका शिवसेनेनं सिब्बल यांच्या भूमिकेबद्दल उपस्थित केली आहे.
“गांधींनी नेतृत्व सोडावे हे ठीक, पण काँग्रेसला पुढे घेऊन जाणारा, जिंकून देणारा नेता त्यांच्या ‘जी २३’ गटात आहे काय? काँग्रेसच्या ताटातले आणि वाटीतले खाऊन-पिऊन अनेकदा ढेकर देऊन स्वस्थ झालेले नेते ‘जी २३’मध्ये आहेत व काँग्रेस पराभवाचा ते विलाप करीत आहेत. यापैकी किती नेते पाच राज्यांतील निवडणुकांत जमिनीवर उतरले होते? किती जणांनी प्रत्यक्ष प्रचारात झोकून दिले होते? पी. चिदंबरम, केसी वेणुगोपाल, सचिन पायलट, भूपेश बघेल असे काही मोजके नेते दिसत होते.”
“प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशात होत्या. राहुल गांधी गोवा, उत्तराखंड, पंजाबात होते, पण गुलाम नबी, कपिल सिब्बल व २३ कॅरेटचे नेते या रणधुमाळीत कधी दिसले नाहीत. हे सर्व नेते बाहेर राहुन गांधी परिवाराची तारांबळ ‘एन्जॉय’ करीत होते व मनोमन काँग्रेसच्या अपयशाची मनोकामना करीत होते असेच वाटते. हे खरे की, आता काँग्रेस पक्षाला नवी उभारी देणारे आणि नवा विचार रुजवून तरुणांना आकर्षित करणारे नेतृत्व हवे आहे.”










