खरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशाचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आले तेव्हा, नवा व आधुनिक भारत घडवण्यासाठी म्हणजे सर्व प्रकारच्या विषमता व सर्व प्रकारचे वैरभाव नष्ट करून, एकसंध व एकात्म आणि सुखी समाधानी भारत घडवणे हे आपले ध्येय असले पाहिजे, त्यासाठी लढत राहणे हे आपले कर्तव्य आहे, अशी साने गुरुजींची पक्की धारणा होती. त्यासाठी त्यांना अस्पृश्यता निर्मूलन विशेष महत्वाचे वाटत होते आणि म्हणून त्यांनी पहिला कृती कार्यक्रम हाती घेतला, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला पाहिजे. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे म्हणून त्यांनी जानेवारी ते एप्रिल 1947 अशी चार महिने महाराष्ट्राचा दौरा केला, एकट्या पश्चिम महाराष्ट्रात 400 सभा घेतल्या, त्यातून गावोगावची 300 मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली झाली. पंढरपूर मंदिराच्या बडव्यांनी मात्र दाद दिली नाही…

ADVERTISEMENT

अखेरीस 1 मे रोजी साने गुरुजींनी पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू केले, महाराष्ट्रात खळबळ माजली. उपोषण मागे घ्यावे अशी तार म. गांधीनी केली. भारताच्या हंगामी लोकसभेचे सभापती दादासाहेब मावळंकर यांना मध्यस्ती करायला पाठवले. पण गुरुजी आपल्या निश्चयावर ठाम राहिले… आणि मग बडव्यांनी माघार घेतली आणि 10 मे च्या रात्री उपोषण सुटले. 11 मे च्या सकाळी विठ्ठल मंदिरात स्पृश्य व अस्पृश्य यांनी एकत्रित प्रवेश केला. त्या घटनेला आज 75 वे वर्ष सुरू होत आहे. त्या उपोषण काळात म्हणजे 9 मे च्या रात्री आचार्य अत्रे यांनी पंढरपूर येथील सभेत केलेले हे अफलातून भाषण आहे, हशा आणि टाळ्या यांनी सजलेले, मात्र मार्मिक व उद्बोधक!

आज पहिल्यानंच मी पंढरपूरला आलो आहे. मी आज जो आलो तो देवळातल्या तुमच्या पांडुरंगाच्या दर्शनाला काही आलो नाही; पण देवळाबाहेर मरणाच्या दारी बसलेल्या आमच्या एका पांडुरंगाच्या भेटीसाठी इथं आलो आहे (टाळ्या). तुम्ही माझे व्याख्यान ऐकायला जमला आहात; पण मी काही तुमच्यापुढं व्याख्यान द्यायला आलो नाही. व्याख्यान द्यायची ही वेळ नाही. दुपारी तनपुरे महाराजांच्या मठात जाऊन मी साने गुरुजींना पाहिलं. नऊ दिवसांच्या उपोषणानं त्यांचं शरीर थकून गेलेलं आहे. त्यांची जीवनशक्ती अगदी क्षीण झालेली आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांची प्राणज्योत मंद होत चाललेली आहे. त्यांचे प्राण कसे वाचतील?-हा तुमच्या-आमच्यापुढे आता प्रश्न आहे. बोला,- महाराष्ट्रामधला एक महात्मा तुमच्या ह्या गावामध्ये मृत्यूच्या मांडीवर येऊन तडफडत आहे. त्याला तुम्ही वाचवणार आहात की नाही? ह्या एकाच प्रश्नाचा जबाब मला आज तुमच्याकडून पाहिजे आहे. साने गुरुजींची ती करुण मूर्ती पाहिल्यापासून माझ्या डोक्यात आता दुसरा विचार नाही. दुसरं काही सुचत नाही की रुचत नाही. ह्या एकाच विचारानं माझी नाडी उडते आहे. छाती धडधडते आहे, आणि काळीज तडफडते आहे. मी आनंदी आणि हसरा मनुष्य आहे. मी स्वतः हसतो आणि दुसऱ्यांना हसवतो. पण आज मला हसू येत नाही. साने गुरुजींना पाहिलं आणि माझं हसूच आटून गेलं. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

हे वाचलं का?

साने गुरुजींचं वाङ्ममय वाचलं की काळीज विरघळतं आणि डोळ्यांत पाणी येतं, असा सर्वांचा अनुभव आहे तो खरा आहे. साने गुरुजी म्हणजे करुणरसाचा हृदयस्पर्शी झरा आहे. साने गुरुजी म्हणजे मूर्तिमंत कारुण्य. त्याचा अनुभव आज मला आला. मी त्यांना पाहिलं आणि मला रडूच कोसळलं! कधी न रडणारा माणूस मी,- पण आज रडलो मी. म्हणून हसण्याच्या अपेक्षेनं जर कुणी ह्या सभेत आलं असेल तर त्याची निराशा होईल. आपण हिंदुस्थानातील हिंदू फार मठ्ठ डोक्याचे लोक आहोत. गोष्टी घडून गेल्यानंतर त्या आपल्याला कळतात. त्या घडत असताना आपल्या ध्यानात येत नाहीत. तीनशे-चारशे वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात मोठमोठे साधू आणि संत होऊन गेले. ते जिवंत असताना त्यांचं माहात्म्य आपल्याला कळलं नाही. त्यांचा आपण त्या वेळी अनन्वित छळ केला, आणि मग ते मेल्यावर त्यांच्या पालख्या खांद्यावर घेऊन आपण ‘ग्यानबा तुकाराम’ करुन नाचायला लागलो. जिवंतपणी माणसाला पायाखाली तुडवायचं आणि मेल्यानंतर त्याला खांद्यावर नाचवायचं हा आपला नेहमीचाच शिरस्ता आहे! आणि तोच शिरस्ता आजही ह्या घटकेला इथं पंढरपूरला आपण चालवलेला आहे. मागं एवढा इतिहास घडून गेला, त्यानं आपल्याला शहाणपणा आलेला नाही, की आपले डोळे उघडले नाहीत.

तुम्हा पंढरपूरच्या लोकांना तरी खरा संत कोण हे कळायला पाहिजे. मोठमोठे संत तुमच्या चंद्रभागेच्या वाळवंटावर नाचून गेले आहेत. संत तुम्ही डोळ्यांनी पाहिले आहेत. असं असून इथे विठ्ठलाच्या दारी प्राणांतिक धरणं धरून बसलेल्या ह्या महाराष्ट्राच्या नव्या संताला तुम्ही कसं बरं ओळखलं नाही? संत तुकाराममहाराजांचा मंबाजी, तुंबाजी आणि सालोमालो ह्यांनी जसा छळ केला तसा इथले काही सनातनी सालोमालो आणि दाढीवाले मंबाजी-तुंबाजी संत साने गुरुजींचा आज छळ करत आहेत, हे तुम्हांला डोळ्यांनी पाहवतं तरी कसं? इतिहासाची तीच आंधळेपणानं पुनरावृत्ती होऊ देण्यांत काय हशील आहे? आपण विचार करणारी माणसं आहात;- बिनबुध्दीची जनावरं नाहीत. मी साने गुरूजींना संतच म्हणतो. सेनापती बापट त्यांना ज्ञानेश्वराचा अवतार मानतात (टाळ्या). खरोखर, गुरुजी संतांच्या परंपरेत शोभण्यासारखेच आहेत. मी त्यांना ‘महाराष्ट्राचा महात्मा’ म्हणतो. त्यांच्या निर्मळ साहित्याचं आणि पवित्र चारित्र्याचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रामधले सारे बाळगोपाळ आज साने गुरुजींच्या वाङ्मयानं वेडे होऊन गेले आहेत. ती बाळगोपाळ मंडळी आज रडत बसली असतील, आणि स्फुंदत स्फुंदत आपल्या आयांना म्हणत असतील की, ‘आई, गुरुजी बरे होऊन पुन्हा गोड गोड गोष्टी सांगायला केव्हा ग आपल्या घरी येतील?’ आईचं प्रेम काय असतं हे गुरुजींनी महाराष्ट्राला शिकवलं. त्यांची ‘श्यामची आई’ हा अमृताचा झरा आहे. मातृप्रेमाची ती जिवंत पुष्करिणी आहे. गुरुजींची पुस्तकं घरात आली म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी घेऊन आपला एखादा भाऊच घरात आला, असं आमच्या भगिनींना वाटतं. साने गुरुजी म्हणजे आपला आवडता श्याम-आहे असंच महाराष्ट्रातल्या साऱ्या माय-माउलींना वाटतं. तो हा महाराष्ट्राचा लाडका श्याम मरणाच्या मांडीवर आज तळमळत पडलेला आहे! महाराष्ट्रातल्या आयांनो आणि बायांनो, तुमच्या ह्या लेकराला वाचवण्यासाठी तुम्ही आपल्या कायेची कुरवंडी करणार का नाही, ते मला सांगा. गुरुजी म्हणजे साक्षात प्रेममूर्ती. प्रत्यक्ष सेवामूर्ती. दुसऱ्यांवर प्रेम करावं दुसऱ्यांची सेवा करावी हेच मुळी त्यांचं जीवन आहे. त्यांना स्वत:चं जीवनचं उरलेलं नाही. त्यांचं स्वत्व त्यांनी पार पुसून टाकलं आहे. आगगाडीतून प्रवास करताना लहान मुलं रडू लागली म्हणजे आयांच्या कडेवरुन ते त्यांना उचलून घेतात आणि खांद्यावर घेऊन त्यांना जोजावतात. मुलांवर प्रेम कसं करावं आणि त्यांची समजूत कशी काढावी हे स्त्रियांपेक्षा गुरुजींना जास्त कळतं.

ADVERTISEMENT

एकदा आईनं आपल्या मुलाच्या तोंडात मारली. ते दृश्य बघून गुरुजींच्या डोळ्यांत एकदम आसवं आली. ते तीरासारखे धावत गेले आणि त्या मुलास चटकन कडेवर उचलून घेऊन ते आईला रागानं म्हणाले, ‘माझ्या मुलाला मारू नकोस.-माझ्या मुलाला मारू नकोस.-‘ (कौतुकाच्या प्रचंड टाळ्या. स्त्रीवर्ग स्फुंदून रडू लागतो.) प्रत्यक्ष मुलाच्या आईशी प्रेमाची चढाओढ करणारे असे हे आमचे अलौकिक साने गुरुजी आहेत.

आमचे मित्र ‘लोकमान्य’कार पां. वा.गाडगीळ परवा सांगत होते, त्यांचा लहान मुलगा एकदा आजारी पडला. आजारात त्याला कुणाची आठवण व्हावी बरं? त्याला दुसऱ्या कुणाची आठवण झाली नाही. त्याला साने गुरुजींची आठवण झाली. त्यानं हळूच गुरुजींना एक पत्र लिहिलं की, ‘मी आजारी आहे आणि मला तुम्हांला भेटायचं आहे.’ गुरुजी त्या लहान मुलाची हाक ऐकून तीरासारखे धावत आले. एका संध्याकाळी गाडगीळ कामाहून घरी परत येत आहेत तो मुलाच्या बिछान्यापाशी गुरुजी त्याचं अंग चेपीत बसले आहेत! (टाळ्या). मुलांवर एवढं प्रेम करणारा महाराष्ट्रात दुसरा कोणी महात्मा आहे काय? असलाच तर त्याची गाठ मला घ्यायची आहे (हशा). आई मुलावर जसं प्रेम करते, तसं गुरुजी समाजावर प्रेम करतात. आपल्या कुटुंबाचे कष्ट उपसताना जसे आईला श्रम होत नाहीत तसेच समाजातील भावंडांची सेवा करताना गुरुजींनाही श्रम होत नाहीत. उलट त्यांची सेवा करताना गुरुजींना प्रेमच वाटतं.

आपल्या हरिजन बंधूंना विठोबाच्या मंदिरात प्रवेश नाही, ह्याचं दुःख म्हणूनच इतरांपेक्षा गुरुजींना जास्त झालं. मुलाला जखम झाली तर आईचं हृदय रक्तबंबाळ होतं. अस्पृश्य बंधूच्या उरातल्या जखमा गुरुजींना दिसल्या म्हणूनच त्यांच्या जीवाची एवढी उलघाल झाली. त्यांच्या त्या जखमा जोपर्यंत बुजल्या जात नाहीत, तोपर्यंत जगण्यात गुरुजींना काय गोडी वाटणार? पेक्षा मरण पत्करलेलं बरं अशी त्यांची भावना आहे! गुरुजींच्या प्राणान्तिक उपोषणाची ही खरी भूमिका आहे. आपल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून ही आई आपले प्राण पणाला लावून तुमच्या दाराशी बसलेली आहे (टाळ्या). त्यामुळं साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष आज पंढरपुराकडे लागलं आहे. गेल्या तीनशे वर्षांमध्ये पंढरीला जेवढं महत्त्व मिळालं नव्हतं तेवढं ते आज मिळालेलं आहे. पंढरीच्या आघाडीवर आज एक मोठी लढाई लढली जात आहे. पंढरीच्या पुण्याईची आज कसोटी लागणार आहे. नाही तर माझ्यासारख्या माणसाला पंढरीला यायचं काही कारण नव्हतं! (हशा). मघाशी मी चंद्रभागेवर स्नान करून आलो. म्हटलं तीर्थात आंघोळ करून पावन व्हावं! (हशा). पण तुमच्या चंद्रभागेत ढोपरभर देखील पाणी नाही हो! (हशा). मग सांगा, माझ्या आकाराच्या माणसाला तिच्यात कशी बरं आंघोळ करता येणार? (हशा). कशीबशी आंघोळ करून मी देवळात गेलो. कुणी म्हणालं, “हरिजनांना ज्या मंदिरात प्रवेश नाही, तिथं तुम्ही कशाला जाता?”

मी म्हणालो, “विठोबानं माझं काय वाकडं केलं आहे? (हशा). मी विठोबाला जाऊन भेटणार.” म्हणून मी देवळात गेलो. काय सांगू मित्रहो, विठोबाच्या देवळात खरोखर भुताचा बाजार भरला आहे – बाजार! (हशा). यमपुरीतदेखील असे भयंकर चेहरे पाहायला मिळाले नसते. एक जिवंत माणूस मला तिथं दिसला तर शपथ! (हशा). इथून तिथून सारे चार-दोन दिवसांचे सोबती (हशा). त्यापैकी काहीजण जर झोपी गेले तर त्यांना चुकून कोणी ताटीवर चढवायचे! (प्रचंड हशा). आणि त्यात मुळीच चूक व्हायची नाही. (हशा.) मंदिराबाहेरच्या पायऱ्यांवर उभ्या असलेल्या महारोगी भिकाऱ्यांचा ‘गार्ड ऑफ ऑनर’ घेत घेत मी कसाबसा आत गेलो तर तिथंही जराजर्जर भक्तांचा भेसूर तांडा आपला उभाच. (हशा). मी विठोबाच्या पायांवर डोकं ठेवून त्याला विनवणी केली की, हे वृद्ध तुझ्या दाराशी इतकी दाटी करून बसले आहेत, का त्यांचा आता अंत पाहतो? (हशा). सोड यांना भवसागरातून! (हशा.) म्हणजे तेही सुटतील आणि आम्हीही सुटू. (प्रचंड हशा). विठोबाच्या भोवतालचे हे सनातनी बाजारबुणगे नाहीसे झाल्यावाचून खऱ्या भक्तांना त्या मंदिरात प्रवेश मिळणं अशक्य आहे. विठोबाचं दर्शन घेतल्यानंतर मी त्या क्षीऱ्यांच्या दर्शनाला गेलो (हशा). दुपारी गुरुजींचं दर्शन घेऊन आलोच होतो. तुकारामाचं दर्शन घेतल्यावर मंबाजीला नको का भेटून यायला? (हशा). मला पहिल्यानं त्यानं ओळखलंच नाही. मग मी अत्रे आहे असं समजताच तो बसल्या जागेवरून दोन इंच उंच उडाला! (हशा). एक गलेलठ्ठ बोका त्याला वारा घालीत होता. (हशा. श्रोत्यांमधून आवाज-‘त्याचं नाव टाणपे’) टाणपे? वाहवा, अगदी योग्य नाव (हशा). क्षीऱ्यांच्याबरोबर रात्री हाही चापून फराळ करीत असला पाहिजे (हशा). नऊ दिवसांचे प्राणांतिक उपोषण करून हा माणूस अगदी खणखणीत आवाजात गप्पा ठोकीत बसला होता (हशा). आणि तिकडे आमच्या बिचाऱ्या गुरूजींच्या तोंडून एक अक्षर देखील उमटत नव्हतं. इतकी त्यांना उपोषणानं ग्लानी आलेली आहे. मंबाजीप्रमाणं त्या क्षीऱ्याला दाढी पण आहे (हशा). मी आपल्याला असं विचारतो की, हा खानदेशातला प्लेग तुमच्या पंढरपूरला कसा आला? (हशा). तुमच्या इथं रोग काही कमी नाहीत! प्लेगचा उंदीर जसा चिमट्यानं शेपटी धरून फेकून देतात त्याप्रमाणे ह्या क्षीऱ्यांची दाढी पकडून त्याला अगदी अहिंसात्मक पद्धतीनं आधी पंढरपूराबाहेर सोडून द्या पाहू. (प्रचंड हशा).

तो पुण्याचा आमचा डावरेही इथं खूप धुमाकूळ उडवून राहिला आहे म्हणे (हशा). कुणी मला म्हणेल की, या सनातनी मंडळींचा उल्लेख मी एकवचनी का करतो आहे? कुणाला एकवचनानं संबोधावं आणि कुणाला बहु वचनानं संबोधावं हे सभ्यतेचं व्याकरण मी पार चांगलं जाणतो (हशा). डावऱ्याला मी फार चांगला ओळखतो. मीही पुण्याचाच! (हशा). ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी!(हशा). डावऱ्याची सारी अंडीपिल्ली मी जाणतो (हशा). मित्रहो, याच्या वडिलानं की आजोबानं खोटया नोटा छापल्या म्हणून त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती! या धर्मवीर डावऱ्यांचा जन्म अंदमान बेटात झालेला आहे हे तुमच्यापैकी किती जणांना ठाऊक आहे? (हशा).

तसाच तो जेरे स्वत:ला शंकराचार्य म्हणवून घेतो. पण मित्रहो, हा डिसमिस झालेला शंकराचार्य आहे! (टाळ्या). तो खरा शंकराचार्य नाही. तो टाळके भादरलेला एक सामान्य संन्यासी आहे (हशा). मला कळत नाही- की क्षीरे, जेरे आणि डावरे हे तीन ‘रे’कारान्त रेमेडोके नेमके या पंढरपुरात कसे जमा झाले? (प्रचंड हशा).

बंधूनो, अलीकडे माझा नरकावर विश्वास बसू लागला आहे (हशा). आणि ह्या मंडळींना पाहिल्यावर तर आता नरक असतो या गोष्टीबद्दल माझी जास्त खात्री झाली आहे (अधिक हशा). या मंडळींची अखेर कुठं रवानगी होणार हे का मी तुम्हांला सांगायला पाहिजे? (हशा.) नरकाची निर्मितीच मुळी ह्या लोकांसाठी आहे. (हशा). नाही तर नरकाची जरूर काय होती हो? (प्रचंड हशा). हे नरकात गेल्यावर मी देखील नरकात जाणार आहे (हशा); अर्थात वर्तमानपत्राचा रिपोर्टर म्हणून हो! (प्रचंड हशा). हे तिथं गेल्यावर काय करतील हे बघण्याची मला फार उत्सुकता आहे (हशा). मी नाटककार आहे हे तुम्हांला माहीत आहे. क्षीऱ्यांचं हे पात्र मी एखाद्या नाटकात जरूर रंगवून दाखवीन (टाळ्या). ह्या ना त्या रीतीनं मी त्याला अमर करून सोडल्यावाचून राहणार नाही (हशा). हे ‘रे’कारान्त रेमेडोके म्हणतात की, साने गुरूजी रात्री पेढे खातात. आणि तुम्ही हो चोरून काय खाता? शेण?-(हशा).

साने गुरूजींसारख्या महात्म्यावर तुम्ही पेढे खाल्ल्याचा आरोप करता? कुठं फेडाल रे हे पाप? (हशा). तुमच्या तोंडाला किडे पडतील किडे! (टाळ्या). चंद्रभागेत स्नान करून पवित्र झालेल्या ह्या आधुनिक ब्राम्हणाचा शाप आहे शाप- (हशा). मी फक्त एकाच शंकराचार्यांना मानतो, डॉ. कुर्तकोटींना. शंकराचार्याचं भगवं कातडं पांघरलेल्या त्या जेऱ्याला मी ओळखीत नाही. ह्यानं आजपासून इथं म्हणे प्राणांतिक उपोषण केलं आहे. गुरूजींच्या उपोषणाची थट्टा करताहेत हे लोक. यांची तोंड वाकडी झाल्यावाचून राहणार नाहीत, हे मी सांगून ठेवतो! (हशा).

विठोबाच्या चमत्कारावर माझा विश्वास आहे. परवाच इथं एक चमत्कार झाला म्हणतात.- मला ठाऊक नाही तो खरा आहे का खोटा. (श्रोत्यांमधून ‘खरा आहे तो’) खरा आहे? मग तसंच काही तरी ह्या लोकांचं होणार बघा. (हशा). अंमळनेरचा तो कोण एक महाराज आहे म्हणे. हरिजन मंदिरात शिरले तर चंद्रभागेच्या पाण्यात जीव देण्याची त्यानं प्रतिज्ञा केलेली आहे. मला ह्या महाराजाला असं विचारायचं आहे की, ज्या वेळी नौखालीतील तुझ्या आयाबहिणींवर अत्याचार होत होते, आणि तुझ्या शेकडो बंधूंचं जबरदस्तीनं धर्मांतर होत होतं तेव्हां तुझं हिंदुधर्मावरचं प्रेम कुठं नाहीसं झालं होतं? त्या वेळी तुम्ही लोकांनी आपले अगडबंब देह नदीच्या डोहामध्ये का लोटून दिले नाहीत धडाधड? (हशा). आता तुम्हांला तुमच्या धर्माची आठवण झाली होय रे?

बडव्यांच्याविरूद्ध ह्या ठिकाणी मला काहीही बोलायचं नाही. आमच्या महाराष्ट्राचे प्राण आज त्यांच्याकडे गहाण आहेत. महाराष्ट्राचा उजवा हात पंढरीच्या देवळाखाली अडकलेला आहे. तो आम्हांला अलगद सोडवून घ्यायचा आहे. म्हणून बडव्यांना दुखवून आम्हांला चालायचं नाही. पण त्याचा असा अर्थ नव्हे की, बडव्यांच्या समाधानासाठी मंदिर-प्रवेशाच्या प्रश्नाला आम्ही मुरड घालू. नरसोपंत केळकर आणि सोनोपंत दांडेकर म्हणतात की, विठोबापुढे एक नवीन दांडा बांधावा, आणि तेथपर्यंत स्पृश्य-अस्पृश्य भक्तांना येऊ द्यावं. आमची ह्या दांडेकर मंडळींना विनंती आहे, की मेहरबानी करा आणि हिंदुधर्माच्या पायात आणखी नवीन कोलदांडे घालू नका. (हशा आणि टाळ्या). बडव्यांना मला कळकळीनं असं सांगायचं आहे की, अस्पृश्यतेमुळं आतापर्यंत हिंदुधर्माचं केवढं नुकसान झालेलं आहे ह्याचा तुम्ही नीट विचार करा. आमचा हिंदुधर्म गळक्या पखालीसारखा आहे. गेली पाच हजार वर्षे ह्या पखालीमधून पाणी एकसारखं गळतं आहे. अस्पृश्यता आणि जातिभेद ही ह्या पखालीला पडलेली दोन भगदाडं आहेत. हिंदुधर्मात अस्पृश्यता नसती तर एकही माणूस हिंदुधर्म सोडून परधर्मात गेला नसता, किंवा ख्रिस्ती झाला नसता. आज ह्या देशात चाळीस कोटीचे चाळीस कोटी लोक हिंदु राहिले असते. (प्रचंड टाळ्या). हिंदु समाजानं हजारो वर्ष अस्पृश्यतेचं पाप केलं म्हणून आज हिंदुस्थानच्या मानगुटीवर पाकिस्तानचा आग्यावेताळ थैमान घालत आहे. म्हणून बडव्यांना मी म्हणतो की, अजून तुम्ही जागे व्हा. विठ्ठल मंदिरात हरिजनांनी शिरणं हा केवळ पंढरपुरचा प्रश्न नाही. हा नुसता महाराष्ट्राचाही प्रश्न नाही.- हा भारतवर्षाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे! (प्रचंड टाळ्या).

साहेब पुढच्या वर्षी ह्या देशातून जाणार. स्वदेशी जाण्याचा त्याला एव्हापासून वेध लागून राहिला आहे (हशा). त्यांनी आपल्यापासून जे जे काही लुटून घेतलं ते ते परत करायची त्यांची आता तयारी आहे. गांधीजी म्हणाले, “टाक आमचं स्वातंत्र्य.” साहेब तुमचं स्वातंत्र्य द्यायला कबूल आहे. आझाद म्हणाले, “टाक आमचा कोहिनूर.” साहेब तुमचा कोहिनूरही द्यायला तयार आहे (हशा). पण लक्षात ठेवा, विठ्ठल मंदिरात जोपर्यंत तुम्ही हरिजनांना बंदी केलेली आहे तोपर्यंत साहेबांनी खुल्या करून दिलेल्या स्वातंत्र्याच्या मंदिरात तुम्हांला पाऊल टाकता यायचं नाही. तुमच्या स्वातंत्र्याचा मार्ग विठ्ठलाच्या मंदिरामधून जातो आहे हे ध्यानात घ्या (प्रचंड टाळ्या). बारा महिन्यांच्या आत देशातल्या सर्व जातींचं आणि जमातींचं ऐक्य झालं पाहिजे, नाही तर तुमच्या हातात पडलेल्या स्वातंत्र्याच्या जरीपटक्याच्या चिंध्या-चिंध्या होऊन जातील! आणि ह्या चिंध्यादेखील बाहेरची कोणी तरी माणसं येऊन तुमच्यापासून बळकावून जातील !

बत्तीस साली महात्माजींनी उपोषण केलं हे तुम्हांला माहीत आहे ना? ते उपोषण सोडताना डॉ. आंबेडकरांना गांधीजींनी काय वचन दिलं? की, दहा वर्षांत अस्पृश्यता नाहीशी करून टाकतो. त्या गोष्टीला आज दहा नाही चांगली पंधरा वर्ष होऊन गेली. महात्माजींनी अस्पृश्यांना दिलेलं वचन पाळलं गेलं नाही. अस्पृश्यांचा आपण विश्वासघात केलेला आहे. त्याबद्दल प्रायश्चित्त घेण्यासाठी आज साने गुरुजींनी हे उपोषण सुरू केलेलं आहे. महात्माजींच्या त्या प्राणांतिक उपोषणामधून गुरूजींचं हे उपोषण निर्माण झालेलं आहे. महात्माजींच्या उपोषणाची ही सांगता आहे. ‘उपोषण सोडा!’ असं नुसतं शब्दांनी गुरूजींना सांगून भागायचं नाही. अस्पृश्यता नष्ट करण्याचा तुम्ही प्रत्यक्ष काही प्रयत्न केला तर गुरूजींचे प्राण वाचतील. मागं गांधीजी म्हणाले की, एका वर्षाच्या आत स्वराज्य मिळेल. तेव्हा लोक आपापल्या घराच्या सज्जात येऊन उभे राहिले. त्यांना वाटलं की, ताबूताप्रमाणं किंवा गणपतीप्रमाणं स्वातंत्र्य वाजत गाजत येणार आहे! (हशा). तसे-बडवे आपण होऊन सह्या करतील आणि मंदिराची दारं हरिजनांना आपोआप उघडली जातील, असं सामान्य लोकांना वाटतं, म्हणून जो तो आपल्या जागेवर बसून पुढं काय होतं ते बघतो आहे. (हशा). मंदिराची दारं अस्पृश्यांना उघडण्यासाठी प्रत्येकानं उठून प्रयत्न केला पाहिजे. जनतेच्या झुंडीच्या झुंडी मंदिराची दारं बाहेरून ठोठवायला लागल्यावर ती बंद ठेवण्याची बडव्यांची काय छाती आहे? खुद्द महात्माजींनी बडव्यांना आता विनंती केलेली आहे. बडवे महात्माजींना नकार देतील काय? बत्तीस साली ह्या जगद्वंद्य महात्म्याचे प्राण महारांनी वाचवले मग ह्या महाराष्ट्राच्या महात्म्याचे प्राण ब्राम्हण बडवे वाचवणार नाहीत काय? चाळीस कोटी लोक ज्याला गेली पंचवीस वर्ष डोक्यावर घेऊन नाचताहेत, त्या थोर महात्म्याची विनंती बडवे मंडळी मानणार नाहीत काय? हरिजन देवळात येतील की नाही हा प्रश्न नाही, – ते कदाचित देवळात येणारही नाहीत. पण तो प्रश्न नाही. देऊळ हे तुमच्या अंतःकरणाचं एक प्रतीक आहे. देवळाची दारं तुम्ही उघडलीत म्हणजे तुमच्या अंत:करणाची कवाडं तुम्ही उघडी केलीत असाच त्याचा अर्थ होतो. तुम्ही आपल्या अंत:करणाची दारं उघडी केलीत तरच अस्पृश्यांची अंत:करणं तुम्ही जिंकू शकाल, नाही तर ते तुमच्या स्वातंत्र्याच्या मार्गात आडवे पडल्याखेरीज राहणार नाहीत.

म्हणून मी बडव्यांना म्हणतो की, तुमच्या हातात केवळ साने गुरूजींचे प्राण नाहीत तर भारतीय स्वातंत्र्याचे प्राण तुमच्या ताब्यात आहेत (टाळ्या). हे स्वातंत्र्याचे प्राण वाचवा अशी बडव्यांच्या पायांवर डोकं ठेवून महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो. आता वेळ फार थोडा आहे. गुरूजींची प्राणज्योत आता मंद होऊ लागलेली आहे. दिव्यात तेल फार थोडं उरलेलं आहे. आता वाटाघाटी आणि चर्चेत फार वेळ घालवू नका. ह्या प्राणांतिक उपोषणात गुरूजींचं जर काही बरं वाईट झालं तर पुढं काय होईल ह्याची मला कल्पनाच करवत नाही! गुरुजींवाचून ओसाड आणि वैराण झालेल्या महाराष्ट्राचं जीवन किती असह्य होईल ह्याचा विचारही मला करवत नाही. मी बडव्यांना तळमळून सांगतो की, हे ब्रम्हहत्येचं पातक तुम्ही आपल्या डोक्यावर घेऊ नका. तुमच्या घरांत तुमची मुलबाळं आज खेळत आहेत. तुमचा वंशवृक्ष अजून वाढतो आहे. का तुमचे सुखाचे संसार तुम्ही विनाकारण धुळीला मिळवता? बरं, एवढ्यानंही भागत नाही. साने गुरुजी जर ह्या उपोषणात बळी पडले तर त्यांच्या मागोमाग महाराष्ट्रातली चार डोंगरांएवढी माणसं इथं धावत येतील, – आणि गुरुजींसाठी आपले प्राण देतील ! त्या सर्वांच्या हत्येचं पातकही मग तुमच्याच डोक्यावर बसेल. ज्या महाराष्ट्रानं ब्रिटीश साम्राज्यशाहीचे दरवाजे फोडताना आपल्या प्राणाची पर्वा केली नाही, तो महाराष्ट्र विठ्ठल मंदिराचे दरवाजे उघण्यासाठी आपले प्राण गहाण टाकल्यावाचून थोडाच राहील? (टाळ्या). प्राणांतिक उपोषण करणाऱ्यांची पंढरपूरपर्यंत एकसारखी मालिका लागून राहील, लक्षात ठेवा! (टाळ्या). गुरुजी जर गेले तर त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचं सारं ओज, तेज, पावित्र्य आणि सामर्थ्य लयाला जाईल. सारा महाराष्ट्र दीनवाणा आणि बापुडवाणा होईल. आमच्या काँग्रेस सरकारचं तर नैतिक अधिष्ठानच नाहीसं होईल (टाळ्या).

काही काँग्रेसजन म्हणतात की, हे उपोषण करण्यात गुरुजींचा काही डाव आहे. काय सांगावं ह्या लोकांना? हे उपोषण करून गुरुजींना काय मिळवायचंय? त्यांना मंत्री व्हायचंय का प्रधान व्हायचंय? (हशा). बायको ना पोर,- घर ना संसार! देश हेच माझे घर, अशा वृत्तीनं राहणारा हा माणूस दुसऱ्याच्या तुळशीपत्राला देखील शिवायचा नाही. चंदनाप्रमाणं यानं महाराष्ट्राकरता आपला देह झिजवला आहे. ह्यानं काँग्रेसकरता आपल्या रक्ताचं पाणी केलं आहे, आणि हाडाची काडं केली आहेत. निवडणुकीची व्याख्यानं देऊन हा माणूस उरी फुटला आहे हो! नका हे महाराष्ट्रातलं मोलाचं धन असं वाया घालवू. फुलपाखराच्या पंखाला धक्का लावायलादेखील ज्याला भय वाटतं, अशा या निष्पाप आणि निरागस जीवाबद्दल नका असं भलतं सलतं बोलू.

एकदा एका सभेत गुरुजी गेले होते. त्यांच्या सदऱ्याच्या खिशामधे हजार रुपयांची नोट होती. गर्दीमधे कुणा तरी डावऱ्यानं खिसा कापून ती नोट उडवली! (हशा). ‘डावरे’ हा शब्द सामान्यनाम म्हणून मी इथं वापरतो आहे (अधिक हशा). कुणा तरी गरीब किंवा अनाथ कुटुंबाच्या पालनपोषणासाठी गुरुजी ते हजार रुपये वापरणार होते. पण ते चोरीला गेल्यानंतर गुरुजींपुढं प्रश्न पडला,-आता काय करावं? शेवटी त्यांनी मला पत्र लिहिलं की, तुमच्या साप्ताहिकास मी लेखनसाह्य करीन. मला हजार रुपये पाठवून द्या. मी हजार रुपये पाठवून दिले. त्या गोष्टीला सहा महिने होऊन गेले. गुरुजींकडून एक ओळ देखील मला लिहून आली नाही. एके दिवशी गुरुजींकडून मला एक पत्र आणि त्या पत्राबरोबर हजार रुपयांचा चेक माझ्या हाती पडला. “तुमच्यासाठी गेल्या सहा महिन्यांत मला काहीही लिहितां आलं नाही म्हणून पैसे घेण्याची मला लाज वाटते,” असं गुरुजींनी त्या पत्रात लिहिलं होतं! (टाळ्या). हातात पैसे पडल्यानंतर ते न वापरता तसेच परत करणारा एखादा नि:स्वार्थी साहित्यिक ह्या महाराष्ट्रात कुणी आहे काय? (हशा).

साने गुरुजी ही महाराष्ट्राची फार मोठी दौलत आहे. हिला एवढासुद्धा धक्का लागता कामा नये. ह्या ठिकाणी जमलेल्या लहान मुलांना आणि विद्यार्थ्यांना मला मुद्दाम सांगायचं आहे की, त्यांनी उद्यापासून बडव्यांच्या दारांशी जाऊन धरणं धरावं आणि स्वातंत्र्याच्या गोड गोड गोष्टी सांगणारे आमचे गुरुजी तुम्ही वाचवा हो,-असा त्यांच्यापाशी हट्ट धरावा. मुलींनी आणि स्त्रियांनीही बडव्यांना गराडा घालून हेच सांगावं. बडवे इतके कठोर अंत:करणाचे नाहीत. मला माहीत आहे, मुलं आणि स्त्रिया यांच्या डोळ्यांतले अश्रू बघून त्यांचीही काळजं विरघळून जातील ! उद्या दहा मे आहे. सत्तावन सालच्या क्रान्तियुद्धाला उद्या नव्वद वर्ष पूर्ण होतात. ह्या मंगल दिवशी विठ्ठल मंदिराची दारं हरिजनांना मोकळी करून बडवे या महाराष्ट्रात नवी क्रांती घडवून आणतील अशी मला आशा आहे! (प्रचंड टाळ्या). पण असं जर न होईल, तर गुरुजींचे प्राण वाचवण्यासाठी सारा महाराष्ट्र ह्या पंढरपूरला धावून येईल. नागपुरापासून आणि गोव्यापासून इथपर्यंत एकसारखी रीघ लागून राहील. पावसाळा नसतानाही ह्या चंद्रभागेला प्रचंड पूर येईल. आणि त्या पुराचं पाणी पायऱ्या ओलांडून मंदिरात शिरू लागलं, की मग परमेश्वर जरी खाली उतरला तरी मंदिराचे दरवाजे उघडल्याखेरीज राहणार नाहीत! (टाळ्यांचा प्रचंड कडकडाट)

जय हिंद!

आचार्य प्र. के. अत्रे

(‘साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा’ या सुधा साने बोडा यांनी संकलित केलेल्या पुस्तकातील लेख)

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT