'दुबे तुम मुंबई आओ.. तुझे समुंदर में दुबे, दुबेकर मारेंगे...', भर सभेत राज ठाकरेंचा खासदार दुबेंवर ठाकरी प्रहार!
Raj Thackeray vs BJP MP Nishikant Dubey: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरारोड येथील जाहीर सभेतून भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना थेट आव्हान दिलं आहे. जाणून घ्या राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मिरारोड: हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अत्यंत आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. आज (18 जुलै) मिरारोड येथे आयोजित सभेत बोलताना राज ठाकरेंनी आधी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आणि नंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा खरपूस आणि ठाकरी शैलीत समाचार घेतला. (raj thackeray criticized bjp mp nishikant dubey at a public meeting in mira road challenged him to come to mumbai)
'राज ठाकरे तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारमध्ये या.. तुम्हाला (पटक.. पटक के मारेंगे) आपटून-आपटून मारू.' असं म्हणत निशिकांत दुबेने राज ठाकरेंना डिवचलं होतं. ज्यानंतर आजच्या मिरारोड येथील सभेत राज ठाकरेंनी निशिकांत दुबेंना अत्यंत आक्रमक शैलीत खडे बोल सुनावले.
हे ही वाचा>> 'फडणवीसजी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, फक्त दुकानं नाही... ', राज ठाकरेंचं खुलं आव्हान
'दुबेलाच मी सांगतो... दुबे तुम मुंबई मे आ जाओ.. मुंबई के समुंदर में दुबे.. दुबेकर मारेंगे..' अशा मश्किल शैलीत राज ठाकरेंनी निशिकांत दुबेंना खुलं आव्हान दिलं.
पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले..
'सव्वाशे वर्ष या मराठेशाहीने जे राज्य केलं ज्याला आपण म्हणतो ना.. अटकेपार झेंडे फडकवले. आजही मला असं वाटतं की, पाकिस्तानाच्या वायव्येला की नैऋत्येला अटक नावाचा किल्ला आहे. त्या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकला. त्या अटकेपार झेंडे फडकवले आम्ही.. तिथपर्यंत पोहचले होते मराठे.'
हे ही वाचा>> महाराष्ट्रातील जनतेला डिवचणारे भाजपचे दुबे आहेत तरी कोण? दुबेंचं ते विधान जसंच्या तसं...
'तो महाराष्ट्र हतबल आहे? तो महाराष्ट्र यांच्यासमोर हात पसरतोय? आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून? अरे तुम्ही (मराठी लोकं) या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक.. बाकीची लोकं बाहेरून आली. ती तुमच्यावर रुबाब करणार.. आणि हतबलतेने त्यांच्यासमोर बोलणार. 'अरे नही नही भाईसाहब ऐसा मत..' का?'
'स्वत:हून आपल्याला काही करायची गरज नाही. पण जर अशाप्रकारे माज घेऊन समजा अंगावर आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचाच..'
'त्यादिवशी कोणतरी तो भाजपचा खासदार कोणतरी दुबे नावाचा.. काय बोलला.. 'मराठी लोगो को हम यहा पर पटक, पटक के मारेंगे...' झाली का ओ केस त्याच्यावर?, हिंदी चॅनलवाल्यांनी दाखवलं का? पुढे चालवलं का? काही नाही.. बघा कसे असतात.. तू आम्हाला पटक.. पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो... दुबे तुम मुंबई मे आ जाओ.. मुंबई के समुंदर में दुबे.. दुबेकर मारेंगे..'
'याला हिंमत बघा कशी होते.. तुम्ही काही अमराठी माणसाबद्दल बोललात की, राष्ट्रीय बातमी होते. पण हे ज्या वेळेस बोलतात तेव्हा त्यांना माहिती असतं की, सरकार आमच्या पाठिशी आहे.'
'कारण सरकारच या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच..' असं घणाघाती भाषण राज ठाकरेंनी यावेळी केलं आहे.
'पटक.. पटक के मारेंगे', असं म्हणत निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंना डिवचलेलं...
'जर तुमच्यात (राज ठाकरे) हिंमत आहे.. जर तुम्ही हिंदी भाषिकांना मारत आहात तर उर्दू भाषिकांनाही मारा.. तामिळींना देखील मारा.. तेलगू भाषिकांना पण मारा. तुम्ही जी घाणेरडी कृत्य करत आहात.. मी नेहमी म्हटलंय की, तुम्ही तुमच्या घरात आहात, महाराष्ट्रात आहात.. खूप मोठे बॉस आहात ना.. तर चला बिहारला, चला उत्तर प्रदेशला.. चला तामिळनाडूला.. तुम्हाला आपटून-आपटून (पटक.. पटक के मारेंगे) मारू..' असं निशिकांत दुबे म्हणाले होते.
दरम्यान, आता राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने निशिकांत दुबेंना आव्हान दिलं आहे ते पाहता हे संपूर्ण प्रकरण अधिक तापण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.