लोकांकडे धुणीभांडी नंतर झाल्या होमगार्ड, संघर्षातून मुलाला वैज्ञानिक बनवणाऱ्या आईची गोष्ट
– ज़का खान, वाशिम प्रतिनिधी एक महिला जिचं शिक्षण जेमतेच चौथी पास, वयाच्या १७ व्या वर्षी आई-वडील आणि नंतर दोन भाऊ जग सोडून गेल्यामुळे नशिबात आलेलं अनाथपण. पुढे लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या दारुमुळे सुखी संसाराच्या स्वप्नालाही तडा….एकामागोमाग एक धक्के पचवत असतानाही या महिलेने हार न मानता परिस्थितीचा सामना करत संघर्ष करायचं ठरवलं. आपल्या दोन्ही मुलांना घेऊन […]
ADVERTISEMENT
– ज़का खान, वाशिम प्रतिनिधी
एक महिला जिचं शिक्षण जेमतेच चौथी पास, वयाच्या १७ व्या वर्षी आई-वडील आणि नंतर दोन भाऊ जग सोडून गेल्यामुळे नशिबात आलेलं अनाथपण. पुढे लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या दारुमुळे सुखी संसाराच्या स्वप्नालाही तडा….एकामागोमाग एक धक्के पचवत असतानाही या महिलेने हार न मानता परिस्थितीचा सामना करत संघर्ष करायचं ठरवलं. आपल्या दोन्ही मुलांना घेऊन वेगळं राहिलेल्या या महिलेने स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर दोन्ही मुलांचं शिक्षण तर केलंच, पण आजही निवृत्तीनंतर त्या घरात न थांबता गावात सायकलवरुन कपडे विकायचं काम करतात. वाशिमच्या कमल इंगोले यांची ही कहाणी खरंच प्रेरणादायी आहे.
कमलताईंचा जन्म मराठवाड्यातील उखळी, ता. सेनगाव, जि. हिंगोली येथे झाला. आई देवकाबाई व वडील किसनराव शिरसाट यांनी मोलमजुरी करून तीन मुले आणि तीन मुलींसह संसाराचा गाडा मोठ्या कष्टानं सांभाळला. कमलताई बारा वर्षांच्या असताना वडिलांनी वाशीमला स्थलांतर केले. हलाखीची परस्थिति आणि दारिद्रय यामुळे कमलताईंना आपल्या दोन भावांचा मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहावा लागला. लहानपणापासूनच गरिबीचे चटके सोसत आलेल्या कमलाताईंनी जिद्दीच्या जोरावरच गरिबीचा चक्रव्यूह कसा भेदायचा याचे धडे घेतले. असं म्हणतात की, महिलांना आपली परिस्थिती आणि नशिब बदलण्याची एक संधी मिळते, ती म्हणजे लग्न! पण नियतीनं तिथेही कमलताईंना दगा दिला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वयाच्या सतराव्या वर्षी कमलताईंचं लग्न झालं. परंतू नवऱ्याला दारुचं व्यसन असल्यामुळे तो काहीच काम करायचा नाही. त्यामुळे पदरात असलेल्या दोन मुलांसाठी कमलताईंनी वेगळं रहायचं ठरवत संघर्ष सुरुच ठेवण्याचं ठरवलं. सुरुवीताला चार घरांमध्ये धुणी-भांडीचं काम करायला घेत कमलताईंनी घर चालवायला सुरुवात केली. परंतू मुलं मोठी व्हायला लागल्यानंतर त्यांचा खर्च, शिक्षण व इतर गोष्टींसाठी पैसे अपुरे पडायला लागले. मुलांच्या शिक्षणात अडसर होऊ नये म्हणून प्रसंगी कमलताईंनी शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे घरकाम केलं. वेळप्रसंगी शाळेत चपरासी म्हणूनही काम केलं परंतू आपल्या मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची त्यांनी काळजी घेतली.
महिला दिन विशेष: एसटी संपामुळे घरावर आर्थिक ताण, वाहन चालवून घरचा डोलारा सांभाळतेय रुपाली
ADVERTISEMENT
कालांतराने कमलताईंचा संबंध होमगार्ड विभागातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांशी आल्या. कमलताईंच्या कष्टाची कहाणी पाहून या अधिकाऱ्यांनी त्यांना होमगार्डमध्ये भरती करायचं ठरवलं. परंतू कमी शिक्षण यामध्ये अडसर ठरत होतं. कमलताईंनी यावरही उपाय काढत १७ नंबरचा फॉर्म भरत दहावीची परीक्षा दिली, आणि होमगार्डमध्ये नोकरी मिळवली.
ADVERTISEMENT
कमलताईंच्या दोन्ही मुलांनाही त्यांच्या कष्टाची जाण आहे. मोठा मुलगा विजेंद्रने लहानपणापासून अभ्यासात आपली चुणूक दाखवत हवामान वर्गणीकरण याविषयावर पी.एच.डी. चा अभ्यास केला. सध्या तो स्पेनमधील बार्सिलोना येथे इ्स्टिटट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ येथे संधोधक म्हणून कार्यरत आहे. कमलताईंचा लहान मुलगा मिलींदही तितकाच हुशार आहे.
विजेंद्रला लग्नासाठी महाराष्ट्रातील एका जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलीचं स्थळ आलं होतं. परंतू कोणत्याही आमिषाला बळी न पडता कमलताईंनी या स्थळाला नकार देत एकही रुपयाचा हुंडा न घेता अमरावतीमधील एका रिक्षाचालकाच्या सुशिक्षीत मुलीला आपली सून म्हणून पसंत केलं. आज कलमताईंची दोन्ही मुलं सुशिक्षीत आहेत, त्यांचा सांभाळ करत आहेत. परंतू होमगार्डमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही कमलताई शांत बसत नाहीत. आजही त्या सायकलवरुन गावात कपडे विकायचं काम करतात. ज्या घरातली स्त्री खंबीर त्या घराचा पाया हा नेहमी भक्कम राहतो याचं मूर्तीमंत उहाहरण कमलताईंनी घालून दिलं आहे.
मुख्याध्यापकापासून ते शिपायापर्यंत… सावित्रीच्या लेकी सांभाळत आहेत शाळेची धुरा
ADVERTISEMENT