आम्ही गद्दार नाही तुम्हीच गद्दार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना खणखणीत प्रत्युत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आम्ही गद्दार नाही तर तुम्हीच गद्दार आहात असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. तसंच गद्दारी आत्ता नाही झाली तर २०१९ लाच गद्दारी झाली.जनतेचा कौल नाकारून तुम्ही (उद्धव ठाकरे) जे वागलात ती गद्दारी आहे. आधी बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीवर डोकं टेकून त्यांची माफी मागा मगच आमच्यावर टीका करा असंही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे.

ADVERTISEMENT

आमचा उठाव योग्यच आहे, म्हणूनच जनता आमच्या सोबत

आम्ही जी भूमिका घेतली ती सगळ्या महाराष्ट्राला मान्य आहे. मला आज या ठिकाणी जो जनसागर दिसतो आहे त्यातला शेवटचा माणूस दिसत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात लोक इथे आले आहेत. कारण महाराष्ट्राला आमची भूमिका मान्य झाली आहे असं एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात म्हटलं आहे. खरी शिवसेना कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर फक्त महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाला मिळालं. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार कुठे आहेत हा प्रश्न कुणालाही पडणार नाही हेच या गर्दीने सिद्ध केलं आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

शिवाजी पार्क मिळवलं पण तिथे बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?

तुम्ही (उद्धव ठाकरे) न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवलं. मी राज्याचा मुख्यमंत्री आहे तरीही मी ठरवलं होतं की मैदानाच्या विषयात जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यात हस्तक्षेप करायचा नाही. या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला कायदा सुव्यवस्थाही राखायची होती. त्यामुळे मी बीकेसी मैदान निवडलं. सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मूठमाती, तिलांजली देण्याचं काम तुम्ही (उद्धव ठाकरे) दिली. मग तुम्हाला शिवतीर्थावर उभं राहून बोलण्याचा नैतिक अधिकार उरला आहे का? असा प्रश्नही एकनाथ शिंदे यांनी विचारला.

हे वाचलं का?

काँग्रेस राष्ट्रवादीकडे उद्धव ठाकरेंनी शिवसेना गहाण टाकली

हजारो शिवसैनिकांनी घाम गाळून, रक्त सांडून शिवसेना पक्ष उभा केला. मात्र तुम्ही (उद्धव ठाकरे) तो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे गहाण टाकला. तुम्ही (उद्धव ठाकरे) स्वतःच्या स्वार्थासाठी या पक्षाचा उपयोग केला. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी, हिंदुत्वासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भूमिका घेतली. जाहीरपणे घेतली, लपून छपून घेतली नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

मी मुख्यमंत्री झाल्यापासून मागचे तीन महिने राज्यात फिरतो आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. आम्ही जर बेईमानी केली असती तर इतका मोठा प्रतिसाद आम्हाला दिला असता का? शिवसेना ना एकनाथ शिंदेंची ना उद्धव ठाकरेंची आहे. ही शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंची आणि त्यांच्या विचार मानणाऱ्यांचीच आहे अशीही घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.

ADVERTISEMENT

वारसा विचारांचा असतो, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपणारे

वारसा हा विचारांचा असतो, आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा जिवापाड जपला आहे. विचारांचे पाईक आणि विचारांचे शिलेदार कोण ? हे महाराष्ट्राला कळलं आहे. गद्दारी झाली आहे गद्दारी झाली आहे हे सातत्याने ऐकवलं जातं आहे. मात्र ती गद्दारी आत्ता नाही तर २०१९ ला झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी झाली, लोकांच्या जनमताशी गद्दारी झाली ती २०१९ ला झाली आहे असाही टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. गद्दार आणि खोके याशिवाय आता तुमच्याकडे (उद्धव ठाकरे) बोलण्यासारखं काहीही नाही.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या जनतेशी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली

महाराष्ट्राच्या जनेतेशी तुम्ही (उद्धव ठाकरे) गद्दारी केली आहे. तुम्ही आम्हाला गद्दारी नाही तर आम्ही केलेला गदर आहे. गदर म्हणजे क्रांती आणि उठाव आहे. आम्ही गद्दार नाही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत हे अभिमानाने सांगतो आहोत. बापाचे विचार कुणी विकले आहेत? सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली. खरे गद्दार कोण? हे जनतेला समजलं आहे. किती मोठ्या प्रमाणावर लोक आलेत. जेवढे लोक आत आहेत तेवढेच बाहेरही आले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी आम्ही कायम आहोत. तुम्ही मात्र भरकटलात. सत्तेसाठी तुम्ही लाचार झालात असाही टोला एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

याकूबची फाशी रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद दिलं

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खुश करण्यासाठी हिंदुत्ववादी राजकारण केलं हे चुकीचं केलं असं तुम्ही (उद्धव ठाकरे) म्हणालात. याकूब मेमन मुंबईचे बॉम्बस्फोट ज्याने घडवले. न्यायालयाने याकूबला फाशीची ठोठावली. ती फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्याला तुम्ही मंत्रिपद दिलं? मुंबईकरांचा तुम्ही किती अंत पाहणार? ज्यांच्या नावाशिवाय तुम्ही आम्ही शून्य आहोत त्या बाळासाहेबांच्या नावाला तुम्ही विसरलात. आम्ही गद्दार नाही तुम्ही गद्दार आहात. जनतेने ठरवलं आहे गद्दारांना साथ द्यायची नाही तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला साथ द्यायची त्यामुळेच हा जनसागर या ठिकाणी लोटला आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिली

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही जे वागलात त्याबद्दल तुम्हाला जनता क्षमा करणार नाही. वैचारिक व्याभिचार तुम्ही केला आहे. तुम्ही जे पाप केलं आहे त्याबद्दल आधी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवतीर्थावरच्या समाधीवर गुडघे टेका, त्यांची माफी मागा आणि मग आमच्यावर टीका करा. मी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो शिवसेना तळागाळात पोहचवण्यासाठी ४०-४० वर्षे संघर्ष करणारे लोकं इथे व्यासपीठावर बसले आहेत. या सगळ्यांनी आंदोलनं केली, लाठ्या खाल्ल्या, पोलीस केसेस अंगावर घेतल्या अशांना तुम्ही गद्दार म्हणता? बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहेत. तुम्ही त्यांचा अंश आहात म्हणून आम्ही अडीच वर्षे गप्प बसलो होतो. सरकार बनत असतानाच अनेक आमदार सांगत होते की ही आघाडी राज्याला खड्ड्यात घालणारी आहे. त्यावेळी आदेश आम्ही पाळला. पण बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि हिंदुत्व तुम्ही गुंडाळून टाकलं तेव्हा आम्हाला भूमिका घ्यावी लागली असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सर्वसामान्य आमदार खासदार मलाच भेटायचे कारण…

सर्वसामान्य आमदार, खासदार आहेत ते मला भेटायचे कारण मीच त्यांना भेटायचो. ते मला व्यथा सांगायचे… आमच्याकडे राष्ट्रवादीच्या माणसाला ताकद दिली जाते, काँग्रेसच्या माणसाला ताकद दिली जात आहे हे सांगत होते. पुढचा आमदार काँग्रेसचा होणार हे आम्हाला सांगितलं जात होतं. आपण बोलतो आहे असं मी त्यांना सांगितलं मी उद्धव ठाकरेंशी पाच वेळा चर्चा केली. राज्यातल्या जनेतची इच्छा काय तेदेखील आम्ही सांगितलं. तर मला विचारलं गेलं की आमदारांना लाज वाटत नाही का? मग मात्र मला त्यांनी सांगितलं, टोकाचं सांगितलं. त्यामुळेच आम्हाला उठाव करावा केला.

उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज

५० आमदार आणि १२ खासदार यांनी तुम्हाला का सोडलं? १४ राज्यातले पदाधिकारी, लाखो शिवसैनिक यांनी मला पाठिंबा दिला. आमच्या नावाने गद्दार गद्दार टाहो फोडण्यापेक्षा जरा आत्मपरीक्षण करा असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी दिला. आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे किती लोकं गेली शिवसेनेतून. आता आम्ही भूमिका घेतली आहे. तुम्ही याचं कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही? चौकडीचं किती काळ ऐकणार? तुम्हाला जे सांगितलं ते राज्याच्या हिताचं होतं ते तुम्ही (उद्धव ठाकरे) ऐकलं नाही. तुम्हाला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भुषवायचं होतं त्यामुळे तुम्ही शिवसेनेचा उपयोग केला असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

आम्ही निर्णय घेतला तेव्हा वेदना आमच्याही मनात होती

आम्ही जो उठावाचा निर्णय घेतला तो घेताना आम्हालाही वेदना झाला. पण अडीच वर्षे जी खदखद होती त्याचा उद्रेक होणारच होता. त्यामुळे तीन महिन्यापूर्वी हा उद्रेक झाला. या उद्रेकाची दखल जगातल्या ३३ देशांनी घेतली. आम्ही क्रांती केली. इंग्रजांना १८५७ ला उठाव केला तेव्हा ती गद्दारीच वाटली होती. आम्हाला अन्यायाच्या जोखडातून महाराष्ट्र मुक्त करायचा होता त्यामुळे आम्ही धाडसी पाऊल उचललं. हा एकनाथ शिंदे जनतेसाठी अखंड काम करणारा माणूस आहे. वेडे लोकच इतिहास घडवत असतात त्यामुळे तु्म्ही सांगत आहात की भाजपसोबत जायचं होतं तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा. मला सांगा २०१९ ला जो निर्णय तुम्ही घेतला तेव्हा तुम्ही राजीनामे दिले का? अडीच वर्षांच्या काळात अडीच तास मंत्रालयात गेलात. मग कसं राज्य चालणार? कोविड कोविड करून बाजारपेठा बंद केल्या, दुकानं बंद केली लोकांना घरात बसवलं तुमची दुकानं तुम्ही सुरू ठेवली. कसली होती ती मला माहित आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेबांचा उल्लेख हिंदूहृदय सम्राट करणं का सोडलं?

गर्व से कहो हम हिंदू है हा नारा बाळासाहेब ठाकरेंनी बुलंद केला. मात्र राज्याचं नेतृत्व करताना आमच्या प्रमुखांना हिंदुत्व सोडू लागलं. बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही हिंदूहृदय सम्राट करतानाही तुमची जीभ कचरू लागली. मग मला सांगा विचारांची कास कुणी सोडली?तुम्ही (उद्धव ठाकरे) की आम्ही. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री म्हणून तुमच्या नावाची पाटी लागली यातच तुम्हाला समाधान मिळालं होतं असाही टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

सेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादीचा अजेंडा हेच सुरू आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या त्याबाबत चकार शब्द तुम्ही काढला नाहीत. आज मी उघडपणे सांगतोय आपल्या देशात अशा घोषणा देणाऱ्या पिलावळीला चिरडलं जाईल. खरी शिवसेना ही इथेच आहे. इतर समाजाचा आणि इतर धर्माचा आदर करणारे आम्ही आहोत. आमच्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार आहेत. या देशाच्या एकात्मतेला, अखंडतेला नख लावण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

PFI बाबत काही भूमिका घेतली का?

PFI बाबत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेला निर्णय़ योग्यच आहे. देशविरोधी कारवाया कुणी करणार असेल तर सोडणार नाही. तुम्ही काही भूमिका घेतली का? का काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला वाईट वाटेल म्हणूनच का? असाही प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला. PFI वर बंदी घातल्यानंतर RSS वर बंदी घालायची मागणी केली गेली. ही खूपच हास्यास्पद मागणी आहे. देशाच्या उभारणीत RSS चं मोठं योगदान आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आपत्तीच्या वेळी धावून येतो. संकट आल्यावर काम करण्यासाठी संघ पुढे असतो. राष्ट्रउभारणीच्या कार्यात संघाचा मोठा वाटा आहे. या संघावर बंदीची मागणी करत आहात. थोडी तरी लाज बाळगा.

बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणात कधीच पवारांना जवळ केलं नाही

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची चांगली मैत्री होती. मात्र राजकारणात त्यांनी कधीही शरद पवारांना सोबत घेतलं नाही. बाळासाहेबांनी अनेक मुलाखती आणि भाषणांमध्ये त्यांनी काय सांगितलं ते तुम्ही विसरलात. २०१९ ला तुम्ही तुमच्यासोबत आमचीही फरफट केली. हे लोक आपलाच गळा कापायला निघाले तरीही तुमचे डोळे उघडले नाहीत. मुख्यमंत्री शिवसेनेचा पण शिवसेना संपवण्याचं काम आघाडीतले दोन पक्ष करत होते. शिवसेनेचे खच्चीकरण होतं होते. पक्ष नेतृत्व मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत सांगून संजय जेवढं सांगेल तेवढंच ऐकत होता. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालतो आहोत. प्रबोधनकारांनी एक शिकवण दिली होती त्यात ते म्हणाले होते की आत्मबल असेल तर कुणाचीही तमा बाळगण्याची आवश्यकता नाही.

शिवसेना तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही

धनुष्य बाण माझ्याकडे आहे असं तुम्ही म्हणालात तुम्हाला सांगू इच्छितो की शिवसेना ही काही तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. शिवसेना तुम्हाला कुणाच्या दावणीला बांधता येणार नाही. त्यामुळेच आवाज उठवला आहे. आम्हाला काय काय म्हटलं गेलं? ४० रेडे, गटारातली घाण, टपरीवाला, रिक्षावाल अमका-तमका हे सगळं म्हणणारे आता कुठे आहेत? ज्यांनी इतिहास घडवला काँग्रेस राष्ट्रवादीचे किल्ले जमीनदोस्त केले त्यांन तुम्ही हिणवत आहात का? हे शिवसैनिक आहेत तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख हे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. लाखो लोक गेले, आमदार गेले, खासदार गेले तरी मीच आहे असं म्हणत आहात आता तरी डोळे उघडा असाही सल्ला एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT