कोण आहेत डॉ. प्रमोद सावंत, साधे मंत्रीही नसलेले सावंत कसे बनले होते मुख्यमंत्री?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पणजी: देशाच्या पातळीवर जेव्हा भाजपमधील मोदी-शाह या जोडीचा उदय झाला तेव्हापासून त्यांनी आपल्या राजकीय खेळीने भल्याभल्यांना अचंबित केलं आहे. अगदी पक्षीय पातळीवरील राजकारणापासून त्यांनी प्रस्थापितांना धक्का देणारे निर्णय घेतले आहेत. असाच एक निर्णय त्यांनी आता पुन्हा एकदा गोव्याच्या निमित्ताने घेतला आहे.

ADVERTISEMENT

खरं म्हणजे गोव्याच्या निवडणुकीनंतर प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री होतील असं सगळ्यांना वाटत होतं. पण ऐनवेळी विश्वजीत राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. पण अखेर केंद्रीय नेतृत्वाने प्रमोद सावंत यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं. खरं म्हणजे जेव्हा पहिल्यांदा प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री झाले होते तेव्हाच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होता. कारण याआधी कधीही मंत्री पदही न भूषवलेल्या प्रमोद सावंतांवर थेट मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळेच मोदी-शाह यांचा हा निर्णय प्रस्थापितांना धक्का देणारा असाच होता.

आता पुन्हा एकदा प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. अशावेळी त्यांच्या विषयी पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे सावंत नेमके आहेत तरी कोण त्यांचा इथवरचा प्रवास कसा आहे ते जाणून घेऊयात सविस्तर.

हे वाचलं का?

प्रमोद सावंत नेमके आहेत तरी कोण?

प्रमोद सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी पांडुरंग आणि पद्मिनी सावंत या दाम्पत्याच्या घरी झाला. प्रमोद उच्च विद्याविभूषित आहेत. कोल्हापुरातील गंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी आयुर्वेद, औषध आणि शस्त्रक्रिया या विषयात पदव्युत्तर पदवी आणि पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून सामाजिक कार्य (Social Work) पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

ADVERTISEMENT

प्रमोद सावंत हे मराठा समाजातील असून त्यांचा विवाह श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय, बिचोलीम येथील रसायनशास्त्राच्या शिक्षिका सुलक्षणा सावंत यांच्याशी झालेला आहे. सुलक्षणा सावंत या देखील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत आणि सध्या भाजप महिला मोर्चाच्या गोवा युनिटच्या अध्यक्षा आहेत.

ADVERTISEMENT

प्रमोद सावंत यांनी डॉक्टरकीची पदवी मिळविल्यानंतर ते गोवा सरकारच्या वैद्यकीय सेवेत कार्यरत होते. पण राजकारणामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता.

प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेतील साखळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य आहेत. सावंत हे व्यवसायाने आयुर्वेद डॉक्टर आहेत. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना ते गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते आणि पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याचे मुख्यमंत्रीपद रिक्त झाले होते. त्यावेळी प्रमोद सावंत यांची विधानसभेत उपस्थित असलेल्या भाजप युतीच्या विधिमंडळाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांनी 19 मार्च 2019 रोजी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

कसा होता प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास

17 मार्च 2019 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झालं. गोव्यात आधीच इतरांच्या पाठिंब्यावर भाजपने सरकार स्थापन केलं होतं. मनोहर पर्रिकर हे सर्वमान्य नेतृत्व होतं. त्यामुळेच अवघ्या 13 जागा असून देखील गोव्यात 2017 साली भाजपने सत्ता स्थापन केली होती. पण मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर कोण मुख्यमंत्री होणार? अशी सगळीकडेच चर्चा सुरु होती. अशावेळी मोदी-शाह जोडीने अगदी नवखे असलेले प्रमोद सावंत यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली होती.

खरं म्हणजे प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री होतील हे त्यावेळी कुणाच्याही ध्यानीमनी देखील नव्हतं. कारण त्यावेळी ते गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते. पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यातील भाजपचं सरकार पडतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण केंद्रीय नेतृत्वाने झटपट निर्णय घेत प्रमोद सावंत यांना थेट 19 मार्च 2019 रोजी मध्यरात्री मुख्यमंत्रीपदाची शपथ देऊन टाकली होती.

खरं म्हणजे पर्रिकरांनंतर विश्वजीत राणे हेच गोव्याचे पुढील मुख्यमंत्री असतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. कारण विश्वजीत राणे यांचे वडील आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे मनोहर पर्रिकरांचे राजकीय गुरु होते. त्यामुळे विश्वजीत राणे हेच पुढील मुख्यमंत्री असं 2017 साली गोव्यात चित्र होतं. कारण पर्रिकरांमुळेच विश्वजीत राणे हे काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये आले होते. पण तरीही राणेंना मुख्यमंत्रीपद दिलं नाही.

प्रमोद सावंत हे सुरुवातीपासूनच भाजपची विचारसरणी मानणारे होते. पण सुरुवातीच्या काळात त्यांनी नेहरु युवा केंद्रातून सामाजिक कामांना सुरुवात केली होती. सावंत यांचे वडील हे मनोहर पर्रिकर यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळेच प्रमोद सावंत यांचे देखील पर्रिकरांशी चांगले संबंध होते. त्यांच्याच मुशीत प्रमोद सावंत हे तयार झाले होते.

भाजप पक्ष संघटनेत आल्यानंतर सावंत हे तात्काळ आरएसएसशी देखील जोडले गेले. त्यामुळे पक्ष आणि संघटना या दोन्ही पातळीवर त्यांनी स्वत:ला व्यवस्थितपणे रुळवून घेतलं. अशातच 2012 साली पर्रिकरांनी त्यांना साखळी मतदारसंघातून तिकट देऊ केलं. यावेळी प्रमोद सावंत हे तिथून निवडूनही आले. त्यानंतर पुन्हा एकदा 2017 साली ते याच मतदारसंघातून निवडून विधानसभेवर गेले.

Goa CM: अखेर गोव्याचा मुख्यमंत्री ठरला, ‘यांची’ करण्यात आली सभागृह नेतेपदी निवड

दुसऱ्यांदा निवडून गेलेल्या प्रमोद सावंत यांना विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. हे संविधानिक पद असल्याने प्रमोद सावंत यांना काही काळ पक्षाशी संबंधित कार्यक्रमांपासून स्वत:ला दूर ठेवावं लागलं होतं. पण विधानसभा अध्यक्षपद भूषवताना आणि अल्पमतातील सरकार चालवताना त्यांनी केलेली कामगिरी ही भाजपशी अत्यंत महत्त्वाची होती. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पर्रिकरांच्या निधनानंतर सावंत यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं.

प्रमोद सावंत हे खूपच तरुण नेते आहेत ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तसेच प्रशासनाशी सुसंवाद साधत त्यांनी गेल्या अडीच वर्षात गोव्याचा राज्यकारभार समर्थपणे सांभाळला आहे. तर पक्षीय पातळीवर देखील आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणून प्रमोद सावंत यांना आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे गोव्यातील सर्वमान्य नेतृत्व अशी आता त्यांची ओळख झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT