Narayan Rane आणि शिवसेना या संघर्षापेक्षाही नाईक विरूद्ध राणे संघर्ष का होता चर्चेत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेलं नाव म्हणजे नारायण राणे. जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर महाराष्ट्रात राडा झाला. नारायण राणेंना अटकही झाली. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेना विरूद्ध नारायण राणे असा संघर्ष पाहण्यास मिळाला. मात्र या संघर्षापेक्षा एक संघर्ष जास्त चर्चेत होता. काय होता तो संघर्ष? जाणून घेऊ.

ADVERTISEMENT

2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव झाला. आपल्या बालेकिल्ल्यात नारायण राणे यांना पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. हा पराभव केला होता वैभव नाईक यांनी. जेवढी चर्चा शिवसेना आणि नारायण राणेंच्या संघर्षाची झाली आहे तितकीच किंवा त्याहून जास्त चर्चा झाली आहे ते नाईक विरूद्ध राणे वादाची. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा टोकाचा संघर्ष होता.

हा संघर्ष इतका टोकाचा होता की यावरून थेट नारायण राणेंवर खुनाचे आरोपही झाले. साधारणतः 1990 च्या काळात नारायण राणे आमदार होते. त्यानंतर कणकवलीतले एक युवा नेते श्रीधर नाईक यांची हत्या झाली. श्रीधर नाईक काँग्रेसचे नेते होते. त्या काळात नुकताच तिथे शिवसेनेचाही जम बसू लागला होता. कोकणात त्याआधी समाजवादी आणि काँग्रेस या पक्षांचा जोर होता. मात्र शिवसेना जशी वाढली तसा तिचा जोर कोकणातही वाढला.

हे वाचलं का?

श्रीधर नाईक यांची कणकवलीत झाली. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याची चर्चा तेव्हा झाली होती. या खुनाची प्रचंड चर्चा त्यावेळी झाली होती कारण कोकणच्या भूमित असा प्रकार तोपर्यंत घडला नव्हता. पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली होती. राजकीय हत्येतून कोकणची लाल माती आणखी लाल झाली. यामध्ये आऱोपपत्र दाखल झालं ते 13 जणांच्या विरोधात. यातलं महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे नारायण राणे.

नारायण राणेंनी हे आरोप फेटाळले. मात्र सुमारे पाच वर्षे हा खटला सुरू होता. श्रीधर नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वारंवार हे सांगितलं की ही हत्या राजकीय वैमनस्यातूनच झाली आहे. सत्र न्यायायसमोर हा खटला सुरू होता. मार्च 1997 मध्ये या खटल्याचा निकाल लागला 13 पैकी 4 जणांना शिक्षा झाली आणि 9 जणांची पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता झाली. या नऊ जणांमध्ये नारायण राणे होतेच. नारायण राणे सांगतच होते की माझा या प्रकरणाशी संबंध नाही. मात्र नारायण राणेंना मंत्री असतानाही या प्रकरणी कोर्टात जावं लागलं होतं.

ADVERTISEMENT

यानंतरही हा संघर्ष संपला नाही. नाईक कुटुंबीयांनी या सगळ्या प्रकारानंतर काही काळ राजकारणापासून दूर राहणंच पसंत केलं. मात्र 2005 मध्ये गोष्टी पुन्हा बदलल्या. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंविरोधात आपला राग व्यक्त केला आणि आपली घुसमट होते आहे असं सांगितलं. त्यांनी शिवसेना सोडली, शिवसेनेने राणेंवर कारवाई करत त्यांची हकालपट्टी केली. नारायण राणेंनी त्यानंतर थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तुम्हाला मुख्यमंत्री केलं जाईल असं आश्वासन दिलं गेलं होतं असं नारायण राणेंनीच वारंवार सांगितलं आहे. मात्र त्यांनी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना महसुलमंत्री पद देण्यात आलं.

ADVERTISEMENT

मालवणमध्ये पोट निवडणूक झाली. त्यामध्ये नारायण राणे विजयी झाले.शिवसेनेचं डिपॉझिट जप्त झालं इतका दारूण पराभव झाला. नारायण राणेंच्या रूपाने काँग्रेसला पहिल्यांदाच इतका मोठा विजय कोकणात मिळाला. काही दिवसांनी असं झालं की नाईक परिवार कट्टर काँग्रेसीच होता. श्रीधर नाईक यांची पुढची पिढी राजकारणात आली होती.

श्रीधर नाईक यांचे पुतणे वैभव नाईक यांनी काँग्रेसला हात दाखवला आणि शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना विरूद्ध काँग्रेस हा संघर्ष तसाच राहिला पण जे परिवार होते त्यांचे संदर्भ बदलले. राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले आणि नाईक काँग्रेसमधून शिवसेनेत. 2009 मध्ये वैभव नाईक यांना नारायण राणेंच्या विरोधात पहिल्यांदा उमेदवारी देण्यात आली. नारायण राणेंनी तेव्हाही मोठा विजय मिळवला. वैभव नाईक यांचा पराभव जरी राणेंनी केला होता तरीही त्या निवडणुकीत वैभव नाईक यांना ४८ हजार मतं पडली होती.

2009 मध्येच नारायण राणे यांचा काँग्रेसमध्येही वेगळा संघर्ष सुरू झाला. ते जेव्हा काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांना तुम्हाला मुख्यमंत्री केलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्यांचं ते स्वप्न स्वप्नच राहिलं. 2008 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2009 ला विधानसभा निवडणूक पार पडली.

या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांनाच मुख्यमंत्री करण्यात आलं. यामुळे नाराय़ण राणे नाराज झाले आणि त्यांनी पक्षश्रेष्ठींवर म्हणजेच सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्यावरच टीकेची तोफ डागली. काँग्रेसने यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. काही काळासाठी त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. हा सगळा काळ नारायण राणे यांचा काँग्रेसमधील संघर्षाचा काळ मानला जातो. नारायण राणे यांचं या काळात कोकणाकडे दुर्लक्ष झालं. काँग्रेसमध्ये जी घुसमट होत राहिली त्याबद्दल राणे बोलत राहिले.

नारायण राणे राज्याच्या राजकारणात गुंतलेत हे पाहून वैभव नाईक यांनी कोकणात जम बसवला. एक प्रकारे आपला खुंटा आणखी बळकट केला. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निलेश राणे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव झाला. नारायण राणेंना त्यांच्या बालेकिल्ल्यात हरवणं सोपं नव्हतं पण वैभव नाईक यांनी ते करून दाखवलं.

नारायण राणेंच्या समोर शिवसेनेला उमेदवार कुणाला द्यायचं हा प्रश्न होता तिथे राजकारणात आणि पक्षात तसे नवखे असलेले वैभव नाईक यांनी नारायण राणेंना पराभवाची धूळ चारली. कुठे तरी राजकारणात ही चर्चा सुरू झाली की श्रीधर नाईक यांच्या हत्येनंतर जी जिल्ह्याच्या राजकारणात कटुता निर्माण झाली होती. ती कायम राहिली. 2014 मध्ये निवडणूक झाली त्यामध्ये जो राणेंचा पराभव झाला त्याचा संदर्भ थेट श्रीधर नाईक प्रकरणाशी अनेकांनी जोडला.

2015 मध्ये नारायण राणे यांनी बांद्रा येथून एक पोटनिवडणूकही लढवली त्यातही त्यांचा पराभव झाला. तो संघर्षही शिवसेना विरूद्ध राणे असाच होता. पण शिवसेना विरूद्ध राणे या संघर्षापेक्षाही राणे विरूद्ध नाईक हा संघर्ष अत्यंत टीपेला गेला होता. राणे विरूद्ध नाईक या संघर्षाची चर्चा अजूनही होते आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT