-प्रवीण ठाकरे, नाशिक
एबी फॉर्म देऊनही उमेदवारी अर्ज दाखल न केल्यानं काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर सुधीर तांबे यांनी ट्विट (Tweet) करत काँग्रेसच्या निलंबनाच्या निर्णयावर भूमिका मांडली आहे. (Sudhir Tambe tweet after congress action)
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये अतंर्गत वाद निर्माण झालाय. डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा एकदा काँग्रेसकडून नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. मात्र, सुधीर तांबे यांनी मुलगा सत्यजित तांबेंसाठी माघार घेतली. काँग्रेसच्या शिस्त पालन समितीकडून सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
काँग्रेसनं सुधीर तांबेंनी अर्ज न भरल्याच्या प्रकरणाची चौकशी लावली असून, चौकशीपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर सुधीर तांबे यांनी ट्विट करत त्यांची भूमिका मांडली आहे.
सुधीर तांबे यांनी पक्षाच्या निलंबनाच्या कारवाईनंतर एक ट्विट केलं. ज्यात ते म्हणतात, "माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे", अशी भूमिका सुधीर तांबे यांनी मांडली आहे.
सुधीर तांबे यांनी अर्ज न भरण्याच्या भूमिकेवरून काँग्रेसनं कारवाई केली. मात्र, ही कारवाई चुकीची असल्याचंच अप्रत्यक्षपणे सुधीर तांबेंनी म्हटलंय. सुधीर तांबे यांनी त्यांच्या ट्विट मध्ये स्पष्ट केलंय की, काँग्रेसची भूमिका ही न्यायाला धरून नाही. ते पुढे असंही म्हणतात चौकशीअंती सत्य समोर येईल. त्यामुळे काँग्रेसनं कारवाई केली असली, तरी या कारवाईबद्दल सुधीर तांबेंची नाराजी लगेच समोर आलीये. त्यामुळे चौकशीवेळी सुधीर तांबे काय भूमिका मांडणार आणि त्यातून काय निष्पन्न होणार हे आगामी काळात कळेल.