कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता अमरावतीमध्ये जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याबद्दल घोषणा केली. २२ फेब्रुवारीपासून १ आठवडा हा लॉकडाउन लागू असणार आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पॉजिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. रविवारी ७०९ जणांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
दरम्यान अमरावतीमधील लॉकडाउनसंदर्भात माहिती देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, “आपल्याला आज नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागत आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून हा लॉकडाऊन लागू होणार आहे. कारण आता तेवढा एकच पर्याय आमच्याकडे शिल्लक राहिला आहे. साधारण सात दिवसासाठी हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तू आणि एमआयडीसी सुरु राहणार आहेत. याव्यतिरिक्त सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. अमरावती शहर आणि अचलपूर हे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. सध्या प्रशासनाला कठोर राहावं लागणार आहे कारण त्याशिवाय पर्याय नाही.”
अमरावती शहर व नजिकच्या परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये लोकांकडून नियमांचं पालन होताना दिसत नव्हतं. मास्क न घालता रस्त्यावर फिरणं, सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासणं अशा गोष्टी सर्रास घडताना दिसत होत्या. याच गोष्टींमुळे जिल्ह्यात लॉकडाउन लावण्याची वेळ आल्याचा नाराजीचा सूरही यशोमती ठाकूर यांनी लावला होता. अमरावती शहरातील ६० टक्के भाग हा कोरोनाग्रस्त असून महापालिका प्रशासनाने जास्त रुग्णसंख्या असलेले भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत.
अवश्य वाचा – नाहीतर हजारो लोक रस्त्यावर मरतील, पाहा यशोमती ठाकूर काय म्हणाल्या