
वसंत मोरे, इंदापूर
श्रावण (Shravan) महिन्यात शिवशंकराच्या मंदिरात भक्तगण आवर्जून जातात. आपली मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होण्यासाठी मनोभावे पूजा देखील करतात. दरम्यान, श्रावणातच नागपंचमी देखील साजरी केली जाते. त्यामुळे नागाचं दर्शन घेणं हे पवित्र मानलं जातं. दरम्यान, पुण्यातील (Pune) इंदापूरमधील (Indapur) एका नागाचा (Snake) व्हीडिओ खूपच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हीडिओमध्ये एक नाग चक्क एका मंदिरातील दत्ताच्या मूर्तीवर जाऊन फणा काढून बसलेल्या पाहायला मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने आता त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हीडिओ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात निरगुडे गावातील असल्याचं सांगण्यात येत आहे. येथील लिंबराज येथील मंदिरात मंगळवारी हा प्रकार भाविकांना पाहायला मिळाला. या मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी आमि मंगळवारी विशेष पूजा केली जाते. तसंच यात्रेचं देखील आयोजन केलं जातं. पण मागील 2 वर्ष कोरोनाचं संकट कायम असल्याने इथे यात्रा भरु शकलेली नाही.
कोरोना संकटामुळे यंदाही काही मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी पार पडल्या. या दरम्यान अचानक मंदिरातील दत्ताची मूर्ती असलेल्या एका छोट्या गाभाऱ्यात नाग फणा काढून बसलेला भाविकांना आढळून आला.
अचानक मंदिरात नाग आला कुठून आणि तो देखील देखील दत्त मूर्तीच्या वर जाऊन बसल्याने संपूर्ण गावात हा चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, ही बातमी समजताच गावातील अनेकांनी दत्त मंदिराकडे धाव घेतली. नेमका काय प्रकार पाहण्यसाठी गावातील अनेक जण धडपड करत होते.
दरम्यान, मंदिरातील सगळ्या पूजा विधी पार पडल्यानंतर एका सर्प मित्राला बोलवण्यात आलं. या सर्प मित्राने अवघ्या काही क्षणात नागाला पकडलं. ज्यानंतर त्याने नागाला सोबत नेलं आणि दूर वन विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या जंगलात नेऊन सोडलं.
मात्र, या सगळ्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने आता या घटनेची पंचक्रोशीमध्ये चर्चा रंगली आहे. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिरात नाग शिरलेला असल्याने कोणीही त्या नागास कोणत्याही प्रकारची इजा केली नाही. एवढंच नव्हे तर सर्प मित्राला पाचारण करुन वेळीच त्याला जंगलात सोडल्याने त्याचे प्राण देखील बचावले.